-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २५ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
गुगल आपले जीवनमान बदलणार
----------------------------------
आता आपले जीवनमान गुगल बदलणार आहे. गुगलने एक असा गॉगल तयार केला आहे की, तुम्ही शब्द उच्चारताच तो फोटो काढेल. थोडक्यात म्हणजे गुगल गॉगल म्हणजे एक प्रकारचा तुमच्या डोळ्यावर असलेला एक संगणकच असेल. सध्या संगणकाचा आकार अगदी लहान झाला आहे आणि त्याच वेळी इंटरनेटच्या माध्यमातून तो प्रचंड वेगवानही झाला आहे. पण तरीसुद्धा वापर करताना दोन्ही डोळे त्याकडे रोखून ठेवावे लागतात आणि दोन्ही हात व्यग्र राहतात. गुगल ग्लासमुळे नेमकी ही मर्यादा मोडीत निघणार आहे. कारण त्याची रचनाच मुळात वेअरेबल कॉम्प्युटर अर्थात धारण करता येण्याजोगा संगणक या संकल्पनेवर बेतली आहे.ऑप्टिकल हेड माउंटेड डिस्प्ल हे त्याचे वैशिष्ट्‌य आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या तंत्रज्ञानाने युक्त असा गॉगल विकसित करण्यात आला आहे. ज्याच्या उजव्या काचेवर भुवईला समांतर असा एक अगदी पिटुकला स्क्रीन असेल. वापरणार्‍याच्या व्हॉइस कमांड अर्थात मौखिक आदेशांद्वारे अथवा टचस्क्रीन प्रणालीसदृश स्पर्शज्ञानाद्वारे या उपकरणातील संगणक त्वरित कार्यरत होईल आणि त्यानुसार पिटुकल्या स्क्रीनवर तो प्रतिसाद देईल, असे सर्वसाधारणपणे हे तंत्रज्ञान आहे. म्हणजे आजच्या  तंत्रज्ञानाच्या  भाषेत बोलायचे तर गुगल ग्लास हा एक प्रकारचा हँड्सफ्री स्मार्ट फोनच असेल. ज्याद्वारे अनेक कल्पना वास्तवात उतरणार आहेत. परंतु त्याच्या वापराला अनेक मर्यादाही आहेत. मुख्य म्हणजे हे उपकरण आणि त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तूर्त तसे बाल्यावस्थेत आहे. पण तंत्रज्ञानाच्या वाढीचा झपाटा पाहता येत्या काळात त्यातील उणिवा हां हां म्हणता दूर होऊ शकतील. कारण याबाबतीत आपल्यासमोर संगणक अथवा मोबाइल फोनची अगदी ठळक उदाहरणे आहेत. संगणक जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा त्याचा आकार एखाद्या मोठ्या हॉलएवढा होता, पण सध्या तो लॅपटॉप वा पामटॉप सारखे छोटेरूप धारण करून आहे. त्याचप्रमाणे  साधारणत: दीड-पावणेदोन दशकांपूर्वी जेव्हा मोबाइलचा प्रसार व्हायला लागला तेव्हा त्याविषयी सर्वत्र अनेक शंका-कुशंका व्यक्त होत होत्या. हे तंत्रज्ञान खूप महागडे आहे, सर्वसामान्यांच्या आवाक्यातले नाही, त्याचा वापर करणे बरेच किचकट आहे, त्यामुळे भारतासारख्या देशात त्याच्या वापरावर बर्‌याच मर्यादा असतील, असा एक मोठा मतप्रवाह होता. पण आजचे चित्र त्याहून पूर्णपणे विपरीत दिसते. इथल्या अगदी ग्रामीण अथवा दुर्गम भागातसुद्धा मोबाइलचा वापर सर्रास होताना दिसतो. अगदी तळागाळातल्या मंडळींनाही तो अप्राप्य राहिलेला नाही. बहुतेकांसाठी तर मोबाइल ही अत्यावश्यक गरज बनून गेली आहे. हे पाहता, उद्या तुमच्या-आमच्या सर्वांच्या डोळ्यावर गुगल ग्लास दिसू लागणे काहीच कठीण नाही. अर्थात, हे तंत्रज्ञानसुद्धा सवयीचे होण्यास काहीसा वेळ लागणे अपेक्षित आहे. शिवाय, व्हॉइस कमांडची भाषा, त्या भाषेतील उच्चारांची लकब वगैरेंतील तफावत हे त्यातील अडथळे आहेत. मात्र, ते दूर करणे फार काही कठीण आहे असे म्हणता येणार नाही. इंटरनेट जोडणीची अथवा वाय-फायची अनिवार्यता हीदेखील गुगल ग्लासच्या वापरातील एक  मर्यादा आहे. कारण इंटरनेटचा पुरवठा नसेल तर मॅप्स नाही की ऍप्स नाही अशी त्याची स्थिती होईल. पण ही मर्यादा दूर  करण्यासाठीच कदाचित गुगलने अलीकडेच टायटन एअरोस्पेस ही मानवरहित ड्रोन विमाने निर्मिती करणारी कंपनी आपल्या पंखाखाली घेतली आहे. सध्या जगाच्या पाठीवर ज्या ठिकाणी इंटरनेट सेवा पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी हवेत उडणार्‌या ड्रोनच्या माध्यमातून ही सेवा पोहोचवण्याचा भविष्यवेधी विचार त्यामागे आहे. अशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. यातूनच मानवाची प्रगती होत चालली आहे.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel