-->
क्रौर्याची परिसीमा

क्रौर्याची परिसीमा

बुधवार दि. 06 फेब्रुवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
क्रौर्याची परिसीमा
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी 72 तास तिच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. सोमवारी विकी नगराळे याने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना पसरताच सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हजारो लोक उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरले. राज्याचे गृहमंत्री मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टारंनी टीम घेऊन तेथे दाखल झाले आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचारांचा खर्च मुख्यमंत्री निधीतून करण्यात येईल, असे जाहीर केले. आरोपी विकी नगराळे याला न्यायालयाने 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी संप्तत प्रतिक्रिया जनसमुदायातून व्यक्त होणे स्वाभाविकच आहे. सध्या पिडीता मृत्यूशी झुंज देत असून ती यातून बाहेर येऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभी राहील अशी अपेक्षा आहे. हिंगणघाट येथील एका कॉलेजमध्ये सदर शिक्षिका वनस्पतिशास्त्र शिकवते. कॉलेजच्या गॅदरींगमध्ये ती अतिशय उत्साहाने सहभागी झाली होती. परंतु हे गॅदरींग संपल्यावर विकी नगराळे या नराधमाने हे कृत्य केले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तिच्या शरीरावरील भाजल्याच्या जखमा अतिशय गंभीर आहेत. आगीच्या ज्वाळांनी तिचे शरीर वेढले गेल्यावर ती बराच वेळ किंचाळत होती. आगीच्या ज्वाळा आणि वाफा तिच्या तोंडाद्वारे श्‍वसन व अन्ननलिकेपर्यंत पोहोचल्याने झालेली दुखापत गंभीर आहे. श्‍वास घेणे शक्य नसल्याने तिला गळ्यातून नळीद्वारे प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. त्वचेचे थर जळाले असल्याने तिला जंतुसंसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे. तिच्यासाठी म्हणूनच पुढील 72 तास खूपच आव्हानात्मक असतील. जिवाच्या दृष्टीने पुढील दोन ते तीन आठवडेदेखील चिंताजनक असतील. त्या दृष्टीने डॉक्टरांची तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांशी शर्थ सुरू आहे. ही घटना पाहिल्यावर आपल्या देशातील महिला किती असुरक्षीत आहेत त्याचे विदारक चित्र दिसते. अशा घटना म्हणजे केवळ हिंसाचार किंवा गुन्हेगारी म्हणून याकडे पाहता येणार नाही तर महिलांकडे समातील लोकांचा बघण्याच दृष्टीकोन कसा आहे ते यावरुन समजते. आपल्याकडे महिला कितीही शिकली, मोठी झाली तरी तिला आजही दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तिला स्वत:चे निर्णय स्वत: घेता येत नाहीत. अगदी शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचे सर्व निर्णय तिच्यावर लादले जातात. यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. मुलीने लग्नास नकार दिल्याने किंवा प्रेमास नकार दिल्याने प्रियकराने तिच्यावर अ‍ॅसिड फेकल्याच्या घटना आपल्याकडे गेल्या काही वर्षात घडल्या होत्या या घटना काय दर्शवितात? स्त्री ला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. पुरुषांकडून तिच्यावर निर्णय लादले जातात आणि यासाठी आपला सर्वच समाज जबाबदार आहे. भारतात दरवर्षी बलात्कारांचे प्रमाण वाढत असताना 2017 मध्ये पहिल्यांदाच हे प्रमाण घटले. 2017 च्या अहवालानुसार वर्षभरात 32,559 बलात्कारांची नोंद झाली. हे प्रमाण घटले असताना आणखी एक समाधानाची बाब म्हणजे अशा प्रकरणांतील गुन्हे निश्‍चितीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. 2010 मध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 26.56 टक्के होते. 2017 मध्ये ते 32.20 टक्के झाले. महिलांवरील अत्याचार हे केवळ आपल्याच देशात होतात असे नव्हे तर विकसीत देशातही बलात्काराचे प्रकार घडतात. जगभरातील 36 टक्के महिलांना लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. तर जगभरातील 36 टक्के महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला आयुष्यात सामोरे जावे लागते. देशाच्या एक लाख लोकसंख्येमागे होणार्‍या बलात्काराच्या घटनांच्या आधारावर 2018 ची जगातील सर्वाधिक बलात्कारी देशांची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा पाचवा क्रमांक आहे. आपल्यासाठी ही आकडेवारी भूषणावह नाही. महिलांवरील गुन्हे निश्‍चितीकरणाचे प्रमाण वाढले ही समाधानकारक बाब असली तरी आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. 2013 मध्ये आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाण 95.4 टक्के होते. 2017 मध्ये ते 86.6 टक्के राहिले. 2017 मध्ये 1,46,201 बलात्काराच्या प्रकरणांवर न्यायालयात सुनावणी झाली. त्यापैकी 18,099 प्रकरणे निकाली लागली. यापैकी 5,822 प्रकरणांत आरोपीला शिक्षा तर 11,453 प्रकरणांत निर्दोष सुटका झाली. अनेकदा महिलांवरील बलात्काराचे गुन्हे नोंदविलेच जात नाहीत. यामागे राजकीय दबाव, गावची इज्जत, भविष्यात विवाह न होण्याची भीती, बदनामीची भीती, जातीय भेदभाव ही कारणे असतात, असे आढळले आहे. पिंपरी चिंचवड या पुण्याच्या शेजारी असलेल्या महानगरात तर गेल्या दोन वर्षात साडे तिनशे कुमारी माता आढळल्या आहेत. ही आकडेवारी आपल्या समाजाच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे. सध्या मुलांना सोशल मिडिया, व्हॉटस अ‍ॅप यावर अर्धवट व अवैज्ञानिक लैगिंक शिक्षण मिळते व त्यातून अनेक प्रश्‍न उद्दभवतात असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्याकडे बाल विवाह, सती प्रथा यांना बंदी घालून शतक लोटले असले तरी आता नव्याने यासंबंधी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडे बघण्याचा जोपर्यंत दृष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यावर होणार्‍या हिंसेत घट होणार नाही. यासंबंधी आरोपींना कठोर शिक्षा जशी झाली पाहिजे तसेच महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. महिलांना केवळ देवीचा दर्जा देऊन उपयोग नाही तर तिला समानतेच्या मखरात बसविले पाहिजे. तरच अशी कौर्य होणार नाहीत.
------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "क्रौर्याची परिसीमा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel