-->
संपादकीय पान गुरुवार दि. ०५ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बंडोबा राणे थंडावणार
कॉंग्रेसच्या संघटनात्मक फेरबदलांच्या मालिकेत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची; तर मुंबई विभागीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरूपम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्यात व केंद्रात सत्ता नसल्याने गलितगात्र झालेली कॉंग्रेस सध्या संघटनात्मक पातळीवर आपल्या हातात शिल्लक राहिलेले पत्ते पिसण्याचे काम करीत आहे. अशा प्रकारच्या बदलामुळे कॉँग्रेस पक्षाला फार काही मोठी संजिवनी मिळेल व एकदम पक्ष उभारी घेईल असे काही नाही. मात्र पराभवाचे खापर कुणाच्या तरी माथी फोडून नेतृत्वात बदल करण्याची ही कॉँग्रेसची जुनी स्टाईल आहे. या बदलानंतर कॉँग्रेस पक्षात फार काही मोठे वादळ उठेल असे कुणी राजकीय भविष्यही वर्तविले नसेल. मात्र शिवसेनेतून कॉँग्रेसमध्ये आठ वर्षांपूर्वी डेरेदाखल झालेल्या नारायण राणे यांनी मात्र या नियुक्त्यांच्या विरोधात दंड थोपटून आपण या स्पर्धेत होतो परंतु आपल्याकडे श्रेष्ठींनी दुर्लक्ष केले असे सांगितले आहे. अर्थात राणेंच्या या बंडाला फारशी किंमत नाही. एक तर नारायणरावांचा त्यांच्याच कर्मभूमी मालवणमध्ये झालेला पराभव धक्कादायक होता. त्यातून राणेंना सावरायलाही वेळ लागला. आत्ता कुठे ते मिडियापुढे दिसू लागले होते. त्यात कॉँग्रसेने पिसलेल्या पत्यात त्यांचा पत्ता गायब झाला. त्यामुळे राणेंची कोकणी बंडखोर वृत्ती जागी होणे शक्य आहे. परंतु आता त्यांच्या बंडाला काहीच किंमत राहिलेली नाही. परंतु राणेंनी आपले अस्तित्व या निमित्ताने पक्षाला व मिडियाला दाखवून दिले आहे. कॉँग्रेस पक्ष श्रेष्ठी राणेंच्या या बंडाची फारशी दखल घेतील असे नाही. कारण आत्ता राणेंची त्यांना फारशी गरजही वाटत नाही. अगदीच टोकाचे गृहीत धरुन राणेंनी पक्ष जरी सोडला तरी सध्या कॉँग्रेस पक्षाचा वाडाच कोसळला आहे त्यात राणेंसारखा एक खांब कोसळल्याने फारसा काही उपयोग होणार नाही असा विचार पक्ष श्रेष्ठी करतील. बरे सध्याच्या स्थितीत राणे जाऊन जाऊन कोणत्या पक्षात जाणार, असाही प्रश्‍न निर्माण होतो. स्वत:चा पक्ष काढण्याची कल्पना त्यांनी कॉँग्रेसमध्ये आल्यानंतर केलेल्या पहिल्या बंडापासून रचली होती. परंतु त्यात आपण काही यशस्वी होणार नाही याची खात्री असल्याने हे पाऊल राणे उचलणार नाहीत. त्यामुळे सध्या राणेंनी कॉँग्रसे पक्षातच राहून आपले राजकारण करणे हे शहाणपणाचे ठरणारे आहे. दोन्ही नेत्यांच्या निवडीवर नाराजी दर्शवित कॉंग्रेसमध्ये गुणवत्तेवर पदे मिळत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. परंतु कॉँग्रेसमध्ये हे काही नवीन नाही. गेल्या आठ वर्षाच्या कॉँग्रेसमधील वास्तव्यात राणेंना ही बाब आता समजावी, हे काही पटत नाही. महाराष्ट्रातील आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणानंतर कॉंग्रेसश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांची तडकाफडकी मुख्यमंत्रिपदावरून उचलबांगडी केली. पण, सलग चार वर्षे चव्हाण यांनी अत्यंत निष्ठा आणि संयमाने कॉंग्रेसची सोबत केली आणि आज त्यांना राजकीय पुनर्वसनाची संधी मिळाली. त्यातच त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून मोदी लाटेतही आपण कॉँग्रेसचा किल्ला शाबूत राखू शकतो हे कॉँग्रेस श्रेष्ठींना दाखवून दिले. पण, नाराज झालेल्या राणेंनी अशोक चव्हाण यांची क्षमता पाहूनच त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलेले असू शकते, अशी खोचक टिप्पणी केली. अशोक चव्हाण यांची निवड करताना राज्यातल्या नेत्यांना विश्‍वासात घेतले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदी निरूपम यांची निवड केल्याचे मानले जाते. मात्र, यामुळे कॉंग्रेसमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय या नव्या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे. स्वत: नारायण राणे यांनी मुंबईला मराठी नेताच अध्यक्षस्थानी हवा होता, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदातील बदलाबाबत गेली अनेक दिवस चर्चा, गाजावाजा सुरू होता. माणिकराव ठाकरे यांनी सात ते आठ वर्षे सलग प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपद सांभाळले होते आणि त्यामुळेच बदल हा अत्यावश्यक झालेला होता. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा अत्यंत वाईट असा पराभव झाला आणि त्यामुळेच प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वमान्य अशा नेत्याकडे देण्याची निकडही वाढलेली होती. अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा जवळपास लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू होती; परंतु ते स्वतः निवडणूक लढविणार असल्याने ते होऊ शकले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांची चर्चा होती; परंतु त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे ते होऊ शकले नाही. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संजय निरुपम यांची वर्णी लागली आहे. मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची असलेली हक्कंची मते कॉँग्रेस यावेळी गमाविण्याची शक्यता होती. मुंबईतली मराठी माणसे ही कॉँग्रेसला फार कमी प्रमाणात मतदान करतात असा इतिहास आहे. अशा वेळी कॉँग्रसेने आपल्या हक्क्कांच्या उत्तर भारतीय मतदारांवर भीस्त ठेवली आहे. त्यासाठी संजय निरुपम यांचे चलन वापरण्याचा कॉँग्रेसचा इरादा आहे. नारायणरावांनी आपल्या बंडाची पहिल्या दिवशी भाषा केली मात्र दुसर्‍याच दिवशी हे त्यांचे बंड सौम्य झाले. आता आठवड्याची विश्रांती घेऊन पुन्हा बंड पुकारले जाणार आहे. म्हणजेच तोपर्यंत या बंडाची हवा निघून गेलेली असणार. सध्या तरी नारायण राणेंनी बंडाच्या फंदात न पडता, आपला मुक्काम कॉँग्रेसमध्येच ठेवावा व पुढील पाच वर्षांनंतर येणार्‍या निवडणुकीत कसे जिंकू याची आखणी करावी, असा आम्हाला त्यांना सल्ला द्यावासा वाटतो.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel