-->
संपादकीय पान मंगळवार दि. ०३ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पावसाचा अवकाळी शिमगा
नव वर्षाची थंडी संपून आता कुठे उन्हाचा तडाखा वाढत असताना शनिवारपासून अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणानंतर काही वेळातच पावसाला सुरवात झाली. मुंबई, रत्नागिरी, सांगली, पुणे आदी जिल्ह्यांत अवकाळी पावसाला सुरवात झाली. रविवारी तर संपूर्ण राज्यालाच अवकाळीने झोडपून काढले. पावसाचा हा अवकाळी शिमगा पाहून केवळ बळीराजाच नव्हे तर सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. हवामान खात्याने काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने बळिराजा अधिक चिंतेत पडला. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिके, फळबागा आणि भाजीपाल्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माम झाली. हरभरा, मका आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणाचा द्राक्ष, आंबा, काजू, डाळिंब, केळी आदी फळांवर मोठा परिणाम झाला आहे. या नुकसानीचा अंदाज सध्या व्यक्त होत असून कोकणातील ६० टक्के फळबागांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आंबा बागायदारांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे फळांची गळ आणि पिकावर काळे डाग पडल्याने आंबा बागायतदारांना फटका बसणार आहे. रायगड जिल्ह्यातील पांढर्‍या कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसात अपेक्षित आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील गहू, ज्वारी, मका, नाचणी, आंबा मोहोर, द्राक्षासह इतर पिकांवर पावसाचा परिणाम झाला आहे. तसेच, साखर कारखान्यांच्या तोडण्या जोरदार पावसामुळे सक्तीने थांबवल्या आहेत. कशामुळे पावसाचा हा अवकाळी शिमगा झाला? बिहारपासून विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. पाकिस्तान ते गुजरातचा समुद्रकिनारा या दरम्यान चक्रीय स्थिती निर्माण झाली. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तर भारतातून येणारे थंड व कोरडे वारे हे महाराष्ट्रात एकत्र आले आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यासह उत्तर भारतात पाऊस सुरू झाल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. सध्याचे वारे पूर्वेकडून पश्‍चिमेकडे वाहत आहेत. ते एकमेकांना भिडत असल्याने पाऊस पडत आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये कच्छ-सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडला. आर्द्रा नक्षत्रातील पाऊस हा होळीनंतरच्या शिंपणाचा पाऊस मानला जातो. मात्र शनिवारपासून झालेला हा अवकाळी पाऊस काही ठिकाणी ५३ मिलिमीटरपर्यंत झाला! यात शेतकर्‍यांचे यंदाही मोठे नुकसान झालेे आहे आणि आधीच स्वाइन फ्लूच्या साथीने बेजार झालेल्या शहरवासीयांच्या धास्तीतही भर घातली. गेल्या वर्षीच्या तुलनेत अवकाळीने यंदा जवळजवळ संपूर्ण कोकण व्यापले. परिणामी आंबा बागायतदारांच्या तोंडचे पाणी यामुळे पळाले. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस हा मराठवाडा व विदर्भात प्रामुख्याने पडला होता. यंदाच्या अवकाळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच त्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशही व्यापला आहे. देशातील इतर राज्यातही गारपिटीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, पाऊस केव्हा येईल, कधी येईल, हे सांगणे शक्य असले, तरी त्याचे प्रमाण आणि निश्‍चित स्थळाचा अंदाज लावण्यात आपल्याकडील विज्ञानाला अद्याप यश आलेले नाही. दुसरे म्हणजे, हवामान विभागाच्या अत्याधुनिकीकरणाच्या नुसत्या घोषणाच झाल्या. संकट आले, की प्रत्येक वेळी त्या जोमाने केल्या जातात; परंतु साध्य काहीच होत नाही. संबंधित विषयांवर संशोधनही होताना दिसत नाही. परकी यंत्र-तंत्राचा आधार घेण्याचा प्रयत्न शाश्‍वत व्यवस्था निर्माण करण्यात कितपत उपयोगी होईल, हे सांगणे कठीण आहे. अजूनही आपण हवामानाच्या अंदाजात कुठेतरी मागे पडत आहोत हे स्पष्ट जाणवत आहे. शेतीकरिता तापमान बदल हा पाऊस, वादळ आणि गारपिटी यांच्यापुरता मर्यादित नसतो. यातील तापमानातील चढ-उतार हे रोग-किडींचे पोषणहार असते. यातून पीकसंरक्षणाची शेतकर्‍यांची जोखीम वाढते आणि खर्चातही वाढ होते. आपल्याकडे तापमानानुषंगिक कृषी संशोधनाला प्राधान्य दिले जात नाही. किंबहुना रोजच्या तापमान आणि त्याचा पिकांवरील परिणामाचीही दखल घेताना कृषी विद्यापीठे दिसत नाहीत. प्रगत देशांत दिवसभरात दहा वेळा तरी तापमानातील बदल आणि पिकांवरील परिणाम यांचा आढावा घेतला जातो. त्याचा अहवाल तत्परतेने तयार करून पुढील अभ्यास आणि कार्यवाहीसाठी तो विद्यापीठे व सरकारला कळविला जातो. परंतु आपल्याकडे पीक कालावधीत निर्माण होणार्‍या दोषांचा अभ्यास करताना कोणी दिसत नाही. मॉन्सूनमधील बदल आणि अवेळी पावसात झालेली वाढ हा सर्वांनाच इशारा आहे. शेतकरी असुरक्षित होण्यामागे या महत्त्वाच्या कारणाचा मागोवा घेण्याचे आणि यास पर्याय देण्याचे काम आता सरकार आणि संशोधनकर्त्यांचे आहे. तूर्त तरी कृषी आणि महसूल विभागाने तातडीने पंचमाने करावेत, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. त्यानंतर सरकारने नुकसानभरपाई तेवढ्याच तातडीने देण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या सरकारपुढे हे एक मोठे आव्हानच ठरावे. अवकाळी पाऊस हा कुणाच्याच हातात नाही. मात्र यातून आपण धडा घेऊन आपली भविष्यातील वाटचाल करणे गरजेचे आहे. एक तर अवकाळी पावसाचा इशारा अगोदर मिळण्यासाठी आपल्याकडे विशेष संशोधन केले जाणे आवश्यक आहे. सध्या आपण आधुनिक जगात जगत आहोत आणि संशोधनामुळे माणसाचे जीवनमान उंचावले आहे. परंतु हवामानाविषयी संशोधन झाल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होऊ शकतो. अवकाळी पावसाच्या या शिमग्याचा अंदाज अगोदर आल्यास आपल्याला होणार्‍या नुकसानीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. यातून बळीराजा सुखावू शकतो. त्याचबरोबर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पीक विमा योजना सरकारने आता प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. पीक वीमा योजना ही सर्वसाधारणपणे सर्वच पिकांना लागू केल्यास त्याचाही चांगल्या प्रमाणात उपयोग होईल. मात्र याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करुन त्यादिशेने पावले टाकल्यास अवकाळी पावसाचे नुकसान पुढील वेळेपासून तरी टाळता येईल.
----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel