-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
साहित्यातील अवलिया
------------------------------------
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत गेल्याची बातमी आली आणि मनाला चटका लागला. एक ज्येष्ठ साहित्यिक गेल्याचे वाईट वाटलेच परंतु त्यापेक्षाही हा साहित्यातील अवलिया माणूस गेले काही वर्षे आपल्याला स्वत:चे एक मालकीचे छप्पर असावे यासाठी नटसम्राट नाटकातील गणपतराव बेलवकरांसारखा कुणी घर देता का घर? असा टाहो फोडित होता. परंतु त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना दहा टक्क्यात घर देण्याविषयी कुणी पुढे आला नाही. एव्हरी मुख्यमंत्र्यांच्या दारी अनेकजण फेर्‍या घालून आपल्या पदरी हे सवलतीचे घर पाडून घेत असतात. मात्र शेवटपर्यंत खोतांना घर कुणी दिले नाही. गेले कित्येक वर्षे मुंबईतील चिचंपोकळी येथील साईबाबा मंदिरात त्यांचे वास्तव्य होते. शेवट देखील त्यांचा त्याच मंदिरात झाला. येथे येणार्‍या साईबाबा भक्तांना या दाढीवाल्या बाबांचा परिचय असणे कठीण होते. त्यांना तो देवळातला साधूबाबा वाटे. मराठी साहित्यातील एका ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या या साहित्यिकास असे उपेक्षित जिणे जगावे लागणे हे मराठीच्या प्रचार व प्रसाराचा वसा घेतलेल्यांना शरमेची बाब नाही काय, असा प्रश्‍न पडतो. ज्यांनी मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्याच्या अवलियावर अशी पाळी यावी ही दुदैवी बाब म्हटली पाहिजे. असो. मराठी ज्या प्रकारे आक्रसत चालली आहे तसे त्याचे पुजारीही आता संपत चालले आहेत, असेच खोतांच्या निधनाच्या निमित्ताने म्हणावेसे वाटते. चंद्रकांत खोत म्हणजे कवी, लेखक, कादंबरीकार आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे मराठी सारस्वतातील एक अग्रणी चळवळ्या माणूस. त्यांच्या कथा, कांदबर्‍यातून कोकण दिसे. कोकणाचे सौंदर्य, कोकणी माणसाचे प्रेम हळूवारपणे मांडलेले दिसत असे. कोकणाच्या लाल मातीवर प्रेम करणारा हा अवलिया. सिंधुदुर्गच्या भूमीत जन्मलेला हा लेखक अस्सल मालवणी भाषेत बोलत असे तसेच मराठी धारदार भाषेत लिही. मराठी साहित्याचे अफाट वाचन केले. कवितेवर निस्सिम प्रेम करणारा हा माणूस. त्यांची कविता डावी नसे किंवा उजवी नसे परंतु हृदयाला हेलकावे देणारी असायची. त्यांच्या कवितेची भल्याभल्या समिक्षकांना चिरफाड करणे कठीण जायचे. अबकडई हा त्यांचा दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी एक साहित्यिक खाद्यच असे. नामदेव ढसाळांना लिहिते करणे कुणाही संपादकांना जमत नसे, मात्र खोत ते शक्य करुन दाखवित. स्वत:च्या अडअडचणी बाजूला सारुन दुसर्‍याच्या मदतीला धावणारे खोत म्हणजे एक वेगळेच रसायन होते. दुसर्‍या साहित्यिकाचे भरभरुन कौतुक करणे आणि चांगल्या गोष्टाला चांगले म्हणायचे त्याचबरोबर वाईट गोष्टीला ठामपणे वाईट म्हणण्याचे धाऱिष्ट्य हे केवळ खोतांमध्येच होते. मराठी साहित्यिकांमध्ये असा गुण असणारे हाताच्या बोटावर मोजून सापडतील. चंद्रकांत खोतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सत्ताधीशांचे लांगूनचालून करुन आपल्या पदरात पाडून घेण्याचे कधीच पाप केले नाही. मुळातच ते सन्यासी वृत्तीचे होते आणि शेवटपर्यंत तसेच राहिले. मध्यंतरी काही काळ खोत बेपत्ता होते. काहींना वाटले खोत या जगातूनच निघून गेले. मात्र अचानक तीन वर्षांपूर्वी पुन्हा अवतरले आणि साईबाबा मंदिरात राहू लागले. वय झालेले असले तरीही लिहिण्याची उर्मी कधीच संपली नव्हती. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. अर्थात केवळ साहित्यिकच नव्हे तर ज्यांचा मराठी साहित्याशी काही संबंध नव्हता असेही त्यांचे दोस्त होते. कुमासीही गप्पा मारुन मैफल जमविणे त्यांना जमत असे. सत्तरीत असले तरी मुलांमध्येही ते सहजरित्या रमत. एकेकाळी त्यांच्या उभयान्वयी अवयव, बिनधास्त या बोल्ड कादंबर्‍यांनी खळबळ माजून गेली होती. अशा प्रकारे बोल्ड कादंबर्‍या लिहिणारे खोत हे तेवढ्याच सफाईतरित्या आध्यात्मिक लिखाणाकडे वळले. त्यांनी कोणत्याही विषयावर लिहिले तरी त्यांच्या लिखाणावर प्रेम करणारा वाचकांचा एक वर्ग होता. रामकृष्ण परमहंस- शारदादेवी यांच्यावरील दोन डोळे शेजारी, स्वामी विवेकानंदांवरील संन्याशाची सावली व साईबाबांवरील अनाथांचा नाथ या त्यांच्या आगळ्यावेगळ्या लिखाणाने मराठी साहित्य विश्‍वात ते चर्चेत आले. १९९५ नंतर तब्बल १५ वर्षे ते कुठे होते याचा पत्ता कुणालाही नव्हता. एवढ्या प्रदीर्घ काळात मराठी साहित्यात ते चर्चेत राहिले असले तरी पावलोपावली त्यांची अनुपस्थिती जाणवत असे. एक अवलिया, कलंदर, मोकळा-ढाकळा, सन्यासी वृत्तीचा साहित्यिक अशीच त्यांची ख्याती सर्वत्र झाली होती आणि त्यात खोटे काहीच नव्हते. मराठी साहित्य विश्‍वात त्यांनी आपला एक दरारा निर्माण केला होता. खोत म्हणून ते आपले आयुष्य जगले नसले तरीही साहित्यातील खोत अशी त्यांची ओळख जनमानसात होती. दुदैवाची बाब म्हणजे राज्य सरकार व साहित्य वर्तुळाने त्यांची उपेक्षाच केली. अबकडई हा दिवाळी अंक बंद पडला होता. अलिकडे डिंपल प्रकाशनाने त्यांच्या काही पुस्तकांचे पुर्नप्रकाश केले होते. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी थोडेसे विचित्र हे २१ खंडांचे आत्मचरित्र  लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. स्वत:विषयी सांगताना ते प्रांजळपणे म्हणत, करु करुन भागलो आणि देवपुजेला लागलो. त्यांच्या या सांगण्यातच बरेच काही येऊन जायचे. मात्र हे त्यांचे आत्मचरित्र काही प्रसिध्द व्हावे हे नियतीला मान्य नव्हते. त्यामुळे मराठी साहित्यातील हा पुजारी अचानकपणे काळाच्या ओघात निघून गेला. मात्र त्यांनी मराठीच्या साहित्य संपदेत जी मोलाची भर घातली ते अजरामर राहाणार आहे.
----------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel