-->
रविवार दि. ३० नोव्हेंेबर २०१४ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
झोपडपट्टीवासियांचा मसिहा
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून बिरुद मिरविणार्‍या धारावीतील अर्धवट रिडेव्हलप झालेल्या एका छोट्याश्या इमारतीतील तळमजल्यावर एक साधे कार्यालय...या कार्यालयाच्या बाहेर नेहमीची गर्दी असते. त्यात महिलांचा भरणा जास्त. या कार्यालयात आतमध्ये गेल्यास तिथे ना खुर्च्या ना टेबल. हे कसले कार्यालय असे कुणासही वाटेल. जो कुणी येईल त्याने खालीच सतरंजीवर बसायचे. एका बाजूला एका गादीवर समोर छोटे टेबल आणि त्यासमोर सर बसलेले. हे सर कोण? त्यांचे नाव जोकीन सर उर्फ अर्पुतम जोकीन! काळा सावळा रंग... उंची पाच फुटापेक्षा किंचिंत असवी... नाकावर चशमा. जोकीन सरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा माणूस सतत माणसांच्या घोळक्यात दिसतो. बरे ही माणसे म्हणजे कोण? झोपडपट्टीतील सर्वसामान्य माणसे. त्यांना भेडसाविणार्‍या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांना जोकिन सरांचाच आधार. आलेल्या प्रत्येकाशी जोकीन दक्षिणात्य टोनमधील हिंदीत नाहीतर तोडक्या मोडक्या मराठीत बोलून त्यांच्या समस्यांचे निवारण करीत असतात. त्यांच्या या कार्यालयात झोपडपट्टीतील नागरिक येवो किंवा कुणी मोठा साहेब येवो त्याला मात्र जोकीन यांच्या समोर जमिनीवरच बसावे लागते. या कार्यालयातील भींतीवर तीन प्रमाणपत्रे लटकवलेली आढळतात. यातील पहिले आहे त्यांना मॅगासेसे मिळालेला पुरस्कार, दुसरे त्यांना मिळालेली मानद पी.एच.डी. आणि तिसरे म्हणजे भारत सरकारची मिळालेली पद्मश्री. जोकिनसरांचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या नावावर कसलीही संपत्ती नाही. ना कुठे घर... ना वाहन...ना बँक खाते...फक्त लोकांसाठी मोठ्या निष्ठेने काम करावयाचे. सध्या त्यांची आठवण येण्याचे निमित्त म्हणजे आगामी वर्षातील नोबेल पुरस्काराच्या यादीत नॉमिनेशनसाठी त्यांचे नाव आले आहे. हा जर पुरस्कार त्यांना मिळाला तर एका झोपडपट्टीवासियांच्या महिसाचा जागतिक पातळीवरील एक मोठा सन्मान होईल. तसेच एका भारतीयास नोबेल मिळाल्यास प्रत्येक भारतीयाची छाती गौराने फुगेल.
नोबेल पुरस्कारांसाठी ज्यांचे नॉमिनेशन झाले आहेत ते ए. जोकिन आहेत तरी कोण असा प्रश्‍न अनेकांना पडेल. जोकिन हे प्रामुख्याने झोपडपट्टीवासियांच्या कल्याणासाठी काम करतात. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणे, विविध झोपडपट्यांमध्ये शोचालये बांधणे ही कामे त्यांनी केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगातील प्रमुख झोपडपट्यांमध्ये केली आहेत. त्यांनी देशात नॅशनल स्लम ड्वेलर्स फेडरेशनची स्थापना केली तर स्लम ड्वेलर्स इंटरनॅशनल या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. शहरातील सर्वात तळागाळातील घटक हा झोपडपट्टीत राहतो हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांना संघटीत केले. झोपडपट्टीतील महिलांना आपले घर अधिक चांगल्यारितीने चालविता यावे म्हणून महिलांना संघटीत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी मदत केली. आपल्या देशातील सुमारे साडे सहा कोटी लोक झेपडपट्टीत राहातात. एकट्या मुंबईतील सव्वा कोटीच्या घरात असलेल्या लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहातात. त्यावरुन आपल्याकडे झोपडपट्टयांचा प्रश्‍न किती गंभीर आहे याची कल्पना येते. जोकिन यांच्या बालपणापासून सर्व आयुष्य हे झोपडपट्टीत गेले असल्यने त्यांना या प्रश्‍नांची जाण आहे. दक्षिण भारतातील बंगलोर जवळ असलेल्या कोलार सोन्याच्या खाणींच्या जवळ त्यांचा जन्म झाला. रोजीरोटीसाठी त्यांनी वयाच्या १८वव्या वर्षी मुंबई गाठली. त्यावेळी त्यांना सुतारकामाची पहिला नोकरी मिळाली. त्यावेळी तर त्यांच्याकडे झोपडपट्टीतही राहाण्याची एैपत नव्हती. त्यामुळे मुंबईतील मानखुर्द येथील जनता कॉलनीतील एका झोपडीच्या बाहेर ते झोपत. काही काळ त्यांनी भाभा संशोधन केंद्राच्या अणूभट्टीच्या उभारणीसाठी मजूराचे काम केले. झाडूमारण्यापासून जे काम मिळाले ते करत होते. १९७० साली ही झोपडपट्टी खाली करण्यासाठी सरकारने नोटीसा पाठविल्या आणि आपल्या डोक्यावरचे छत जाणार याची भीती येथील झोपडपट्टीवासियांमध्ये निर्माण झाली. त्यावेळी जोकिन यांनी पुर्नवर्सन झाल्याशिवाय ही झोपडपट्टी हलवायची नाही अभी भूमीका घेऊन आंदोलन उभारले. त्यांचा हा लढा प्रदीर्घ काळ चालला. १९७५ साली त्यांनी संसदेच्या बाहेर १८ दिवस आंदोलन केले. इंदिरा गांधींनी त्यांना झोपडपट्टी न हलविण्याचे आश्‍वासन दिले. मात्र १७ मे १९७६ साली जोकिन यांना अटक करण्यात आली आणि १२ हजार पोलिसांचा फौजफाटा आणून रातोरात झोपडपट्टी साफ करण्यात आली. येथील रहिवाशांना चार कि.मी दूर असलेल्या चित्ता कॅम्प येथे हलविण्यात आले. येथे ही वस्ती आजही आहे. जोकिन यांनी दिलेल्या या लढ्यातून मात्र त्यांच्या रुपाने झोपडपट्टीवासियांच्या प्रश्‍नाकडे देशाचे लक्ष वेधले गेले. जोकिन यांचे नेतृत्वही यातून पुढे आले. जोकिन यांना झोपडपट्यांच्या प्रश्‍नी आजवर तब्बल ६० वेळा अटका झाल्या आहेत. झोपडपट्टीवासियांना किमान पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जोकिन यांनी एक प्रकारचे जनआंदोलनच उभारले. त्यासाठी त्यांनी आपली संघटना मजबूत केली. त्यांच्या स्वयंसेवी संघटनेने शौैचालये उभारणे, पाणी उपलब्ध करुन देणे, सांडपाण्याची सोय करणे वीज पुरविणे य सोयींसाठी जंगजंग पछाडून काम केले. त्यातून लाखो झोपडपट्टीवासियांना मोठी मदत झाली. त्यांच्या स्पार्क या संस्थेने अनेक झोपडपट्यांचे पुनर्वसन केले. मध्यंतरी थंडीच्या दिवसात रस्त्यावरील लोकांना निवारा उपलब्ध करुन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णयाव्दारे दिले होते. या निर्णयानुसार त्यांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या छावण्या उभारुन रस्त्यावरील लोकांना मोठा दिलासा दिला होता. शहरातील या गरीबांना आपला जीनवस्तर सुधारता यावा यासाठी त्यांनी घराघरातील महिलांना एकत्र केले. त्या महिलांसाठी गुंतवणुकीची योजना सुरु केले व त्यातून त्यांनी स्वयंरोजगार उपलब्ध करुन दिला. त्यांच्या स्वयंसेवी संघटनेने केवळ भारताच नव्हे तर जगात शौचालये उभारली आहेत. प्रामुख्याने आफ्रिकेतील अनेक देशात त्यांचे माठे कार्य चालते. झोपडपट्यात राहाणार्‍यांनी स्वच्छता कशी पाळावी, शौचासाठी उघड्यावर बसू नये यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर उपाय केले. नरेंद्र मोदींनी आता स्वच्छता मोहीमेचा गाजावाजा केला आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत जोकीन यांचे काहीही न बोलता शांतपणे काम गेली दोन दशके सुरु आहे. १९९५ साली त्यांनी स्लम ड्वेलर्स इंटरनॅशनल ही संस्था स्थापन केली. आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका या देशातील झोपडपट्टीवासियांच्या संघटनांना त्यांनी या संघटनेच्या छत्राखाली एकत्र आणले. ३३ देशातील झोपडपट्यांच्या विविध संघटना त्यांच्या सदस्य झाल्या आहेत. या झोपडपट्टीवासियांच्या प्रश्‍नांसाठी त्यांची जगभर भ्रमंती सुरु असते. वयाच्या सत्तरीतही असले तरीही जोकिन आजही झपाटल्यासारखे काम करीत असतात. झोपडपट्यांच्या पुनर्वसनाचा एक ज्वलंत प्रश्‍न. तसेच सध्या मुंबईत झोपड्यांच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रश्‍नी अनेकांची फसवणूक होत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. ते काम जोकीन व त्यांचे सहकारी करीत असतात. धारावीचे पुर्नवसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी प्रदीर्घ काळ पडून आहे. त्यातील काही भागाचे काम आपली संस्था करु शकेल असे जोकिन यांनी सरकारला सांगितलेही होते. परंतु शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. आता नवीन सरकार तरी त्यासंबंधी कोणता निर्णय घेते ते पहायचे. कदाचित भविष्यात धारावीच्या पुनऱ्वसनात जोकिन महत्वाची भूमिका निभावू शकतात. एक निस्वार्थी, स्वच्छ प्रतिमेचा झोपडपट्टीवासियांचा मसिहा अशी जोकिन यांची प्रतिमा आहे. त्यांच्या या कामाची गुणगौरव म्हणून त्यांच्या कामाची आन्तरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. त्यांना भविष्यात जर नोबेल पुरस्कार मिळाला तर तो सर्वोच्च सन्मान ठरेल. त्यांचा तो वैयक्तिक सन्मान असेलच तसेच देशाचाही मोठा सन्मान ठरेल, यात काही शंका नाही.
--------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel