-->
संपादकीय पान गुरुवार दि. ६ नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
दिल्लीत पुन्हा निवडणुकांचा बिगुल
---------------------------------------
दिल्लीत अखेरीस कोणत्याच पक्षाला सत्ता स्थापणे शक्य झालेले नाही. गेल्या डिसेंबरमध्ये दिल्लीत निवडणुका झाल्यावर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र त्याला अन्य कोणाचाही पाठिंबा मिळविता न आल्याने त्यांच्या हातून सत्ता निसटली. शेवटी त्याखालील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी कॉँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापले खरे परंतु त्यांना ५० दिवसही ते चालविता आले नाही. शेवटी त्यानंतर राज्यपालांची राजवट लागू करण्यात आली होती. आता मात्र दिल्लीची ७० सदस्यांची विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणूक घेण्याच्या नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या शिफारसीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरीची मोहर उमटविली. साधारणतः नव्या वर्षाच्या सुरवातीला दिल्लीकरांना नवे सरकार मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींच्या लाटेने हरियाना व काही प्रमाणात महाराष्ट्र सर केल्यावर उत्साहित झालेल्या भाजपसाठी सध्याचे दिल्लीतील थंडगार वारे अतिशय अनुकूल असल्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहरमच्या सुटीच्या दिवशीही मंत्रिमंडळाची बैठक बोलावली तेव्हा बैठकीच्या अजेंड्यावर फक्त दिल्ली निवडणूक हाच ठळक विषय होता. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी सर्व पक्षांशी चर्चा करून केंद्राला आपला अहवाल दिला होता. दिल्लीत सरकार स्थापन करण्यापासून भाजपने अधिकृतरीत्या पळ काढल्यावर नजीब जंग यांनी दिल्ली विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणूक घेण्याची शिफारस केंद्राला केली होती. मंत्रिमंडळाने ही शिफारस मंजूर केली. यानंतर ही शिफारस औपचारिक मंजुरीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविली जाईल. राष्ट्रपतींची सही झाल्यावर लगेचच केंद्रातर्फे विधानसभा विसर्जित केल्याची अधिसूचना जारी होईल. त्यानंतर निवडणूक आयोग केंद्राच्या सूचनेप्रमाणे पुढील तारखा जाहीर करेल. हरियाना व महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतही भाजप निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही. येथे कमळ आणि नरेंद्र मोदी हाच भाजपचा चेहरा असेल व विकास हाच प्रचाराचा मुद्दा असेल, असे दिल्लीचे प्रभारी प्रभात झा म्हणाले. मात्र, येथेही मोदी ठरवतील तोच मुख्यमंत्री होणार हे नक्की असून, त्यादृष्टीने जगदीश मुखी यांच्या तुलनेत सध्याचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांचे नाव अग्रक्रमावर आहे. सध्याचे वातावरण पाहता; हरियानातील भाजपच्या विजयाचे स्पष्ट प्रतिबिंब दिल्लीत उमटेल, असे मानले जाते. दिल्लीतील हवेचा अंदाज आल्याने आपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. वर्षभरापूर्वी कार्यकर्त्यांत दिसणारा उत्साह आता मावळल्याचे वातावरण आहे. आयती हाती आलेली सत्ता सोडून पलायन केलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर राजकीय द्वेषाचे वातावरण पसरविण्याचा आरोप केला. त्यांच्या सांगण्यानुसार, निवडणुकीसाठी विजय म्हणजे समाजात परस्पर द्वेष भावना निर्माण करणे हे भाजपचे समीकरण असते व दिल्लीतही या पक्षाने तीच व्यूहरचना सुरू केली आहे. अंदाजानुसार जानेवारी २०१५ अखेर किंवा फेब्रुवारीच्या प्रारंभी दिल्लीत निवडणूक होऊ शकते व हीच वेळ दिल्लीत सरकार आणण्यासाठी योग्य असल्याचे दिल्ली भाजपचे मत आहे. त्यावेळेस जम्मू- काश्मीर व झारखंडच्या निवडणुका होऊन गेल्याने दिल्लीतूनच देशाचा गाडा हाकणार्‍या मोदींना दिल्लीचा कानाकोपरा ढवळून काढणे शक्य होईल, असे भाजपला वाटते. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने दिल्लीत आपल्याला सत्ता स्थापता येते का त्याची चाचपणी गेल्या दोन महिन्यात केली होती. त्यासाठी त्यांनी आपमध्ये फुटाफुटी करुन सत्तेची समीकरणे जुळविता येतात का त्याची आखणी केली होती. मात्र आप फोडत असल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी बोंबाबोंब केली व भाजपाचा डाव फसला. आपला देखील पुन्हा कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेत रस राहिलेला नाही. कदाचित कॉँग्रेस पुन्हा आपला पाठिंबा देणारही नाही हे वास्तव आता त्यांनी स्वीकारले असावे. अशा या गोंधळात भाजपाने आपमध्ये फूट पाडून बदनाम होऊन सत्ता काबीज करण्यापेक्षा सध्या आपली हवा आहे तर स्वबळावर निवडणूक लढवावी असे ठरविले आणि त्यातूनच या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दिल्लीत कॉँग्रेस पूर्णपणे आता खिळखिळी झाली आहे. माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचा दिल्लीतील विकासाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या शिला दिक्षीत यांनी आपले राज्यपालपद टिकविण्यासाठी मोदींची स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यामुळे कॉँग्रेसला आता पुढे नेईल असा दिल्लीत कुणी नेता राहिलेला नाही. भाजपाच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे नुकत्याच त्यांनी महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच केंद्रातही भाजपाचे सरकार असल्याने भाजपा दिल्ली काबीज करण्यासाठी यावेळी जंगजंग पछाडणार आहे. आपने गेल्या निवडणुकीत अनपेक्षीतरित्या जागा मिळविल्या होत्या. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आपची हवा होती. लोकांनी केजरीवाल यांच्यावर विश्‍वास टाकला होता. भ्रष्टाचार व दिल्लीतील सुरक्षा या मुद्यावर आपने निवडणुका लढवून कॉँग्रेसचा पराभव केला होता. मात्र सत्तेत येण्यासाठी त्यांना शेवटी ज्या पक्षाशी वैग होते त्यांच कॉँग्रेसबरोबर सत्तेत सहभाही होण्यासाठी त्यांचा पाठिंबा घेतला. लोकांना ही बाब प्रामुख्याने खटकली होती. त्यामुळे आपला मोठ्या अपेक्षेने जनतेने सत्तेत बसविले खरे परंतु त्यांना तो विश्‍वास वृंध्दींगत करता आला नाही. यात अनेकदा आपचे नेते व तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हेकट स्वभाव कारणीभूत ठरला. आता यावेळी दिल्लीतील जनता त्यांच्यावर पुन्हा विश्‍वास टाकते ते का पहायचे. भाजपाला यावेळी सत्ता संपादन करण्याचा विश्‍वास वाटतो. परंतु त्यांचा तो फाजिल आत्मविश्‍वास ठरु शकतो. असो. पुढील दोन महिन्यात आता दिल्लीत भर थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. यात कोण बाजी मारतो ते पहायचे.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel