-->
संपादकीय पान गुरुवार दि. ३० ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
देवेंद्रयुगास शुभेच्छा
--------------------------------
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आता शपथविधी घेतील. गेले आठवडाभर त्यांच्याच नावाची चर्चा होती, अखेर भाजपाच्या नवनिर्वाचीत सदस्यांनी फडणवीस यांची निवड केली आणि त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. ज्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण बसले त्यावर आता देवेंद्र फडणवीस विराजमान होतील. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी असले तरीही आपल्याकडे मराठा मुख्यमंत्री असण्याची एक परंपरा आहे. त्यात अपवाद काय तो वसंतराव नाईक, बॅ. ए.आर. अंतुले व मनोहर जोशी यांचा. बॅ. अंतुले यांना इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदी बसवून ८०च्या दशकात  मराठा समाजाला जोरदार धक्का दिला होता. तर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहरपंतांना या खुर्चीवर बसवून ब्राह्मण जातीतील या नेत्याला सर्वोच्च स्थानावर बसविले. अगदीच जातीचा विचार केल्यास आता पुन्हा एकदा फडणवीसांच्या रुपाने राज्याला एक ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला आहे. असो. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणारा माणूस हा कोणत्या जाती-धर्माचा आहे असा विचार करणे म्हणजे त्या खुर्चीचा आपमान ठरावा. परंतु ज्या भाजपाचा मुख्य तोंडावळा बब्राह्मणांचा पक्ष म्हणून होता त्यांचा पहिला मुख्यमंत्री हा ब्राह्मणच व्हावा हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. अर्थात सुरुवातीला असलेला आपला हा तोंडावळा भाजपाने बदलला आणि बहुजनांचा पक्ष म्हणून गोपीनाथ मुंडेनी भाजपाचा चेहरा बदलला. गोपीनाथ मुंडे जर आज असते तर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय कोणताच अन्य पर्याय भाजपापुढे नसता हे देखील तेवढेच खरे आहे. परंतु तसे काही झाले नाही हा देखील एक दुदैवविलास. पुरोगामी महाराष्ट्राची धुरा फडणवीसांच्याव्दारे पहिल्यांदाच एका कट्टर स्वयंसेवकाकडे येते आहे. नागपुरातील प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी फडणवीसांची जी स्तुती केली होती ते पाहता भाजपाची सत्ता आल्यास फडणीसच मुख्यमंत्री होणार हे नक्कीच होते. फडणवीसांच्या रुपाने राज्याला आणखी एक तरुण मुख्यमंत्री लाभला आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचे नय ३७ वर्षांचे होते तर फडणवीस हे ४४ वर्षाचे आहेत. तरुण असण्याबरोबर देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे एक अभ्यासू आणि व्यासंगी आहेत आणि विदेशात शिकलेला एक गोंडस चेहरा, जो एकेकाळी मॉडेलिंग करायचा आता राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. अर्थात फडणवीस यांची मोठी कसोटी भविष्यात लागणार आहे. अल्पमतातील सरकार चालविताना सत्तेचे सिंहासन भल्याभल्यांच्या नाकी नऊ आणते. निवडणुकांमध्ये पक्षप्रचाराची नियोजनबद्ध आखणी करून विजय मिळवून देणार्‍या प्रदेशाध्यक्षाकडेच सत्तेचे सुकाणू यावे, हा देखील लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा संकेत आहे. स्वतंत्र विदर्भाच्या कडव्या समर्थकाकडे अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद येणे, ही बाब लक्षवेधी ठरावी. स्वतंत्र विदर्भ की उर्वरित महाराष्ट्र हा तिढा माझ्यापुढे आलाच तर माझी व्यक्तिगत आस्था विदर्भाकडेच झुकेल असे उद्गार देवेंद्र यांनी काढले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे नेतृत्व सांभाळताना या विदर्भवादी व्यक्तिमत्त्वाचा कस लागणार आहे. त्यातून आता राज्याची पावले आता वेगळा विदर्भ करण्याच्या दिशेने पडतील हे देखील तेवढेच खरे आहे. अर्थात हे करताना फडणवीसांचे कौशल्य कामी येणार आहे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याचे अल्पमतातील सरकार बहुमतात आणण्याची किमया फडणवीस करुन दाखवितील का, असाही प्रश्‍न आहे. भाजपाकडे सध्या असलेले १२३ आमदार अन्य पक्षातील फोडाफोडीतून २४५ वर नेऊन सरकार स्थिर करण्याची किमया फडणवीस करु शकतात. निवडणुकीआधी पक्षाचे व्हिजन डॉक्युमेन्ट साकारण्यात देवेंद्र यांची महत्त्वाची भूमिका होती. विकासाच्या त्या दृष्टीचे समन्यायी वाटप नवे सरकार कसे करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र यांची पारंपरिक प्रतिमा पिढीजात संघ स्वयंसेवकासारखी कधीच नव्हती. वडील गंगाधरराव फडणवीस यांनी पक्षाला बहुजन समाजापर्यंत पोचविण्याचा चंग बांधला होता. देवेंद्र यांनी आपल्या खडतर प्रयत्नांनी तो परीघ अधिकाधिक विस्तारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. मोझरी येथील तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाकडे वळलेल्या वक्रदृष्टीवर प्रहार करण्याचे काम त्यांनीच केले. संत जगनाडे महाराजांच्या स्मारकासाठीची त्यांची धडपडही अनेकांनी बघितली. जनसंघाचे दिवंगत नेते रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितलेल्या स्वयंमूल्यांकनाचे दाखले देवेंद्र यांनी अनेकदा दिले आहेत. कामावरून लोकप्रतिनिधी ओळखला जावा, ही भूमिका जाहीरपणे मांडणे सोपी नाही. नवनवे काम ओढवून घेणे आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देणे हे देंवेद्र यांचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास, प्रश्न धसास लावण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि अशक्यप्राय वाटणार्‍या मर्यादांना लंघून एक पाऊल पुढे टाकण्याची चैतन्यदायी वृत्ती त्यांनी जोपासली आहे. गेली १५ वर्षे त्यांच्यातील आक्रमक विरोधक महाराष्ट्राने पाहिला. त्यांच्या सचोटीवर विरोधकांनीही शंका घेतली नाही. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा सर्वांच्या स्मरणात आहे. वीजदरवाढी विरोधातील आंदोलन, महानिर्मितीच्या निकृष्ट कोळसा खरेदीवरील अभ्यासू विवेचन, ओबीसी आरक्षणासाठी विधिमंडळात तसेच रस्त्यांवरील संघर्ष, झोपडपट्टीवासीयांच्या मालकीहक्काची तळमळ अशा अनेक अंगांनी त्यांच्यातील झुंजार कार्यकर्ता सतत दिसत राहिला. अल्पमतातील सरकार चालविण्यासोबत शिवसेनेच्या वेदना समजून घेण्याचे मोठेपण त्यांना आता दाखवावे लागेल. कामगिरीचे मूल्यमापन करण्याचा जनतेचा अधिकार मी कधीही अमान्य करणार नाही, ही भूमिका मांडणारा उत्साही नेता म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी जे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे, ते प्रत्यक्षात उतरविण्याची संधी आता त्यांना मिळाली आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा!
-------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel