-->
संपादकीय पान बुधवार दि. १७ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
डॉ. मनमोहनसिंग... पराभूताचे जीणे
-----------------------------------------------
पराभूताचे जीणे हे मरणाहून वाईट असते असे म्हणतात. हे जसे युध्दातील पराभूताला लागू आहे तसेच आधुनिक काळातील लोकशाही राज्यातील निवडणुका हरल्यावरही पराजिताची स्थीती अशीच वाईट होते. नुकत्याच केंद्रातील निवडणुका कॉँग्रेस पक्ष हरला. आता या पक्षाचे सरकार चालविणारे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची स्थिती युध्दातील पराजितासारखी झाली आहे. आता त्यांच्यावर विविध पातळ्यांवरुन टीका होऊ लागली आहे. अर्थात त्यांच्या निष्कियतेबाबत ते सत्तेत असतानाही टीका होतच होती. आता मात्र प्रत्येक जण त्यांच्या कारभाराबाबत बोलू लागला आहे. देशाच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी महालेखापरीक्षक विनोद राय यांनी टू जी स्पेक्ट्रम, कोळसा आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळ्यांमध्ये डॉ. मनमोहन सिंग मूकदर्शक बनल्याचा ठपका आपल्या पुस्तकात ठेवला आहे. मनमोहन सिंग यांचे एकेकाळचे प्रसिद्धी सल्लागार डॉ. संजय बारु, सिंग यांच्या अखत्यारीतील कोळसा मंत्रालयाचे निवृत्त सचिव पी. सी. पारीख, यूपीए-१ मध्ये सिंग यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री असलेले कुंवर नटवर सिंह यांच्यापाठोपाठ परखड लेखापरीक्षण करणारे मुनीमजी विनोद राय यांनीही आपल्या नव्या पुस्तकातून मनमोहन सिंग यांनाच लक्ष्य केले आहे. सिंग सरकारच्या कारकीर्दीत सुमारे पाच लाख कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेतेही करीत होते. मनमोहन सिंग या घोटाळ्यांमध्ये लाभार्थी असल्याचे शिंतोडे मात्र त्यांच्यावर कोणीही उडविले नाहीत. सिंग यांच्या देखरेखीखाली कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशार्‍यावर हे घोटाळे घडवून आणल्याचे आरोप करण्याचे धारिष्ट्यही अद्याप एकाही लेखकाला दाखविता आलेले नाही. विनोद राय यांच्या काळात टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्यावरील कॅगच्या अहवालांना संसदेत मांडण्यापूर्वीच पाय फुटले होते आणि त्यांना मिळालेल्या वारेमाप प्रसिद्धीमुळे चार वर्षांपूर्वीच मनमोहन सिंग सरकारबद्दल देशवासीयांचा मूड नकारात्मक होऊन भाजपचा सत्तेकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. राजीव गांधी पंतप्रधान असतानाही बोफोर्स घोटाळ्यावरील कॅगच्या अहवालांमुळे असेच नकारात्मक वातावरण तयार झाले होते आणि तत्कालीन महालेखापरीक्षक टी. एन. चतुर्वेदी यांना कालांतराने सत्तेत आलेल्या भाजपने राज्यपालपदाची बक्षिसीही दिली होती. राय यांच्याबाबतीत अद्याप तसे काहीही घडलेले नसले, तरी मनमोहन सिंग यांच्यावर पुस्तकाचा पहिला वार करणारे संजय बारु लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या वर्तुळात प्रस्थापित झाले होते. बारु आणि पारीख यांची पुस्तके मोदींनी पुरस्कृत केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते सुरुवातीपासूनच करीत आहेत. नटवर सिंह यांची राजकीय कारकीर्द संपली असली, तरी त्यांचे पुत्र जगत सिंह आज भाजपचे आमदार आहेत. पण हे चारही लेखक मनमोहन सिंग आणि कॉंग्रेसविरोधी आहेत, असे गृहित धरले, तरी गेल्या दहा वर्षांतील यूपीए सरकारचा नाकर्तेपणा झाकला जाऊ शकत नाही. मनमोहन सिंग व्यक्तिशः भ्रष्ट नसले, तरी त्यांनी पंतप्रधानपद शाबूत राखण्याच्या वैयक्तिक स्वार्थापोटी तडजोडी केल्या असे म्हणण्याला वाव आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या इतिहासात सलग दहा वर्षे पंतप्रधान राहण्याचा चमत्कार मनमोहन सिंग यांनी करुन दाखविला. सोळाव्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारात जीवाचे रान करुन पंतप्रधानपद पटकाविणारे नरेंद्र मोदी यांचेही पहिले लक्ष्य किमान दहा वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचेच आहे. मनमोहन सिंग यांना या चमत्काराचे कोणते मोल मोजावे लागले याची कल्पना आता देशवासीयांना येऊ लागली आहे. यूपीए सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत पंतप्रधानपदाला धक्का लागू नये म्हणून मनमोहन सिंग यांनी अनेक तडजोडी केल्या. आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन इतिहासच करेल, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. पण त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास या घोटाळ्यांसाठी केंद्रातील राजकीय आघाडीची अपरिहार्यताही कारणीभूत ठरली आहे.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel