-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २५ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
लाल तारा निखळला
-----------------------------
भाई मोहन पाटील यांच्या निधनामुळेे कामगार, कष्टकर्‍यांचा लाल तारा निखळला आहे. जवळपास गेले दहा महिने ते आजारी होते. गेल्या वर्षी २ ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत त्यांचे खणखणीत आवाजात झालेले भाषण कार्यकर्त्यांच्या कानात आजही घुमते आहे. यावर्षीच्या शेकापच्या पुढील आठवड्यात होणार्‍या वर्षापन दिनाला ते उपस्थित नसणार याची खंत कार्यकर्त्यांना लागून राहिल्याशिवाय राहाणार नाही. आयुष्यभर ज्यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले आयुष्य वेचले ते भाई मोहन पाटील आज आपल्यात नाहीत. मात्र गेल्या चाळीस वर्षातील आपल्या राजकीय कारकिर्दीत कष्टकर्‍यांसाठी त्यांनी जे लढे उभारले, जी आंदोलने केली व त्यांना न्याय मिळवून दिला ते केवळ पेण या त्यांच्या कर्मभूमितच नव्हे तर संपूर्ण रायगडवासियांच्या मनात घर करुन आहे. राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. परंतु त्यांनी मंत्रिपदावर असताना कधीच गर्व केला नाही. आपले मंत्रिपद हे स्वत:च्या फायद्यासाठी नाही तर तळागालातल्या जनतेचे भले करण्यासाठी आहे असे गृहीत धरुन त्यांनी लोकांची कामे केली. म्हणूनच ते पेण मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम करु शकले. ते १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी त्यांच्याकडे मोटारही नव्हती. आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते एस.टी.तून प्रवास करायचे. शेवटी कार्यकर्त्यांनी पैसे जमवून त्यांना मोटार घेऊन दिली. सध्याच्या काळात असे नेते, मंत्री सापडणे अशक्यच आहे. परंतु शेकापच्या डाव्या विचाराच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते असोत किंवा नेते असेच सापडतील. भाई मोहन पाटील हे त्यातील एक. भाईंची पेण ही कर्मभूमी. जन्मापासून ते शालेय शिक्षण त्यांचे तेथेच झाले. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुन्हा पेणला आले आणि त्यांनी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेतला तो शेवटपर्यंत. त्यांनी राजकारण, समाजकारण केले ते कष्टकर्‍यांच्या जीवनात सुधारणा व्हावी यासाठी. तरुणपणात घेतलेले हे त्यांनी हे व्रत शेवटपर्यंत पाळले. आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी १९७७ साली समाजकारण करण्यास सुरुवात केली, तो काळ म्हणजे नुकतीच आणीबाणी उठलेली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधी देशात एक झंझावात निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांनी कॉँग्रेस विरोधाच्या आपल्या विचारधारेला सुरुवात केली ती शेवटपर्यंत. १९८० साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि पेणमधील जनतेला त्यांच्या रुपाने खराखुरा लोकप्रतिनिधी गवसला. या देशात कष्टकर्‍यांचे राज्य यायचे असेल तर कष्टकर्‍यांचे राजकारण करायला सुरुवात केली पाहिजे, त्यांचे प्रश्‍न सोडवित असताना त्यांचे खरेखुरे राज्य कसे येईल याचा विचार त्यावेळी शेकापच्या माध्यमातून डाव्या चळवळीच्या रुपाने रुजविला जात होता. स्वातंत्र्य मिळवून त्यावेळी ३५ वर्षे झाली होती. परंतु जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची सोडवणूक काही कॉँग्रेसला करता आली नव्हती. त्यामुळे हे काम डावी चळवळ आणि शेकापच करु शकतो यावर भाईंचा ठाम विश्‍वास होता. त्यामुळे सलग पाच वेळा पेण विधानसभा मतदारसंघातून जनतेचे प्रतिनिधीत्व करीत असताना सर्वसामान्य जनतेची कामे कशी होतील, गावोगावी रस्ता, वीज, पाणी कशा प्रकारे पोहोचतील यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. जनतेनेही त्यांच्या या कामाची पोचपावती त्यांना वेळोवेळी विजयी करुन दिली. पेण तालुक्यातील खार बंदिस्तीचे प्रश्‍न, हेटवणे धरणाचा प्रश्‍न, पूरग्रस्तांचे प्रश्‍न, विविध योजनांतील पुनर्वसनाचे प्रश्‍न त्यांनी विदानसभेत जोमदारपणे मांडले व ते सोडविण्यासाठी शासनाला पावले उचलण्यास भाग पाडले. गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या सेझ विरोधी आंदोलनात त्यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व करुन त्यांच्या हातातून जाणार्‍या जमिनी वाचविल्या. केवळ सेझच नव्हे तर सरकारची विविध शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात ज्या ज्या वेळी शेकापने आंदोलने केली त्यात भाई मोहन पाटील अग्रभागी होते. हेटवणे धरणाच्या निर्मितीत तसेच पेणच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात भाई मोहन पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. हेटवणे धरणाचे पाणी नव्या मुंबई सिडकोला देण्याचा शासनाने निर्णय घेतला तेव्हा त्यांनी विरोध दर्शविला धरणाचे पाणी धरणाची उंची वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर सिडकोच्या पाईपलाईनवरुन लगतच्या ४२ हून अधिक गावांना पाणी पुरवठा करण्यास सरकारला त्यांनी भाग पाडले. आदिवासी आश्रमशाळा सुरु करण्यासाठी  पुढाकार घेतला. शेतीमालाला हमी भाव देण्याचा निर्णय पदरात पाडून घेतला. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन इमारत व वाणिज्य संकुलाची उभारणी त्यांच्याच यशस्वी प्रयत्नातून साकार झाली आहे. शेकापक्षाचे पेण येथील भव्य संपर्क कार्यालय देखिल त्यांनी सुरु केलेे. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे एक हक्काचे ठिकाण म्हणून या कार्यालयाकडे जनता बघते. खारभूमी विकास परिषद, पाणी परिषद, अश्या मूलभूत प्रश्‍नावर त्यांच्या कारर्कीदीत परिषदांचे आयोजन करण्यात आले. खारभूमी विकास योजना, पाणी पुरवठा योजनांच्या कामाला त्यांनी गती देण्याचे काम केले. आपण स्वत: कामे करीत असताना त्यांनी तरुण कार्यकर्त्यांची फळी तयार करुन शेकापमध्ये तरुण रक्ताला वाव दिला. आपले चिरंजीव धैर्यशील पाटील यांना घडविले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकीत धैर्यशीलदादांनी कष्टकर्‍यांची साथ देत त्यांचे प्रश्‍न रस्त्यावर व विधानसभेत जोरदारपणे मांडले आहेत. अशा प्रकारे आपण एकीकडे संपूर्ण आयुष्य कष्टकर्‍यांच्या भल्यासाठी वेचले असताना आपल्या घरात त्याच विचाराचा वारस तयार केला आहे. आपण जो विचार आयुष्यभर रुजविला त्याची पाठराखण पुढील पिढीतही होईल याची दखल घेत भाई मोहन पाटील यांनी अखेरचा लाल सलाम केला आहे.
---------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel