-->
संपादकीय पान मंगळवार दि. १ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
कोकण रेल्वेत नावच फक्त कोकणाचे!
-------------------------------
कोकण रेल्वे ही रोह्यापासून कन्याकुमारीपर्यंत पार जोडली असली तरी कोकणी माणसाने मोठ्या आपुलकिने ही रेल्वे आपली आहे असे म्हटले तरीही त्यावर अन्य राज्यातील नागरिकांचाच जास्त दावा झाला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल अशी स्थिती आहे. कारणही तसेच आहे. कोकण रेल्वेची मूळ संकल्पना बॅ. नाथ पै यांनी मांडली आणि त्यानंतर मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडीस यांनी ही रेल्वे प्रत्यक्षात उतरण्यासाठी जीवाची बाजी लावली. अशा प्रकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्यावर कोकणी माणूस मोठ्या अभिमानाने आता आपण रेल्वेने गावी जाणार अशी स्वप्ने रंगवू लागला. परंतु कोकण रेल्वेवर गणपतीच्या हंगामात नेमके त्याला तिकिट न मिळाल्याने कोकणी माणूस संतापणे स्वाभाविक आहे. कोकण रेल्वेच्या बुकिंगवर पूर्णपणे दलालांचे वर्चस्व स्थापन झाले असून ही सर्व बुकिंगची यंत्रणा दलालांनी काबीज केली आहे. त्याबाबत सरकार काय करणार आहे, हा सवाल आहे. कोकणात गणपतीसाठी जाणार्‍या कोकण रेल्वेच्या गाड्या रेल्वे दलालांच्या बुकिंग सॉफ्टवेअरमुळे रविवारी काही मिनिटांतच हाऊसफुल्ल झाल्यामुळे रात्रभर रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभ्या असणार्‍या लाखो गणेशभक्तांना तिकीट मिळू शकले नाही. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. २९ ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी असून रेल्वेचे तिकिट बुकींग ६० दिवस आधी सुरू होते. कोकणात जाणार्‍या लाखो गणेशभक्तांनी कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी  आदल्या दिवशी रात्रीपासूनच प्रत्येक रेल्वे स्थानकातील बुकिंग विंडोसमोर मोठ्या रांगा लावल्या होत्या. पण रविवारी प्रत्यक्ष बुकिंग सुरू झाल्यानंतर या रांगेतील पहिल्या प्रवाशाला ३००हून अधिक वेटिंग लिस्ट असलेले तिकीट मिळाल्यामुळे त्याची निराशा झाली. अवघ्या काही मिनिटांतच कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोकणात प्रत्येक वर्षी गणेशचतुर्थीला आवर्जून जाणार्‍या हजारो मुंबईकरांच्या उत्साहावर पाणी फिरले. तिकीट दलालांच्या रॅकेटमुळेच ही परिस्थिती ओढवली आहे. दलालांकडे असलेल्या एका विशिष्ट सॉफ्टवेअरमुळे ते ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वीच त्याचा वापर करून तिकिटे आरक्षित करतात. परिणामी सर्वसमान्यांना तिकीट मिळत नाही, हा प्रकार गंभीर असून यासंदर्भात तातडीने चौकशी करून कोकणवासीयांवर होणारा अन्याय दूर करण्याची गरज आहे. कोकण रेल्वेचा उपयोग हा प्रामुख्याने कोकणातील प्रवाशांना झाला पाहिजे. कोकणातून जरुर गाड्या उत्तरेत व दक्षिणेत जाव्यात मात्र कोकणातील चाकरमन्यांवर अन्याय होता कामा नये. कारण कोकण रेल्वे व्हावी यासाठी कोकणातील जनतेने आपल्या जमीनी दिल्या आहेत. तसेच कोकणात रेल्वे आली तरी कोकणाचा म्हणावा तसा फायदा येथील विकास होण्यासाठी झालेला नाही, ही वस्तुस्थिती कुणाला नाकागरता येणार नाही. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे कोकण रेल्वे ही फक्त कोकणातून जाते मात्र सर्व फायदे अन्य राज्यातील जनतेला मिळतात. तिकिट बुकिंगचे याहून काही वेगळे नाही. कोकणी जनतेवर नेहमीच अन्याय होत आला आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यावर आता आपल्याला चांगले दिवस दिसतील असे वाटत होते, किमान प्रवासाचा त्रास तरी कमी होऊन रडेल्वेचा सुखाचा प्रवास करुन आपल्या गावी जाता येईल अशी कोकणी माणसाची अपेक्षा होती. मात्र या अपेक्षांनाही रेल्वेतील दलालांनी सुरुंग लावला आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे. कोकण रेल्वेचे बुकिंग कोकणी माणसाला मिळालेच पाहिजे. यासाठी रेल्वेने त्यांना दलालांना आवर घालण्याची गरज आहे.
---------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel