-->
संपादकीय पान सोमवार दि. ९ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
नवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार
---------------------------
गेल्या आठवड्यात दोन महत्वाच्या बातम्या वाहन उद्योगाविषयी प्रसिध्द झाल्या होत्या. यातील पहिली बातमी म्हणजे आपल्या देशातील सर्वात जुने असलेले व एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले ऍम्बेसिडर हे मॉडेल आता आपले उत्पादन बंद करणार आहे. तर दुसरी बातमी म्हणजे गुगल या कंपनीने चालकाविना असलेली मोटार यशस्वीरित्या चालविली. या दोन बातम्या तशा पाहता परस्पराशी संबंधीत आहेतही आणि नाहीही. कारण एका लोकप्रिय मॉडेलचा अस्त झाला असताना एका नव्या अद्भूत चमत्कार ठरावा अशा मॉडेलचा जन्म झाला आहे. चालकाविना मोटार हे आपल्याला कदापी शक्य वाटणार नाही ही बाब आता या नवीन गुगलच्या मॉडेलमुळे आता शक्य झाले आहे. आपल्याकडे ज्या कंपनीने आपल्या तंत्रज्ञानात बदल केला नाही त्या कंपन्या काळाच्या पडद्याआड गेल्या ही उदाहरणे आपल्यासाठी काही नवीन नाहीत. ऍम्बेसिडर मोटार हे देखील त्याच पंक्तीत बसणार वाहन ठरले आहे. एकेकाळी ज्या मोटारीने बाजारपेठ काबीज केली होती ती मोटार तंत्रज्ञानात मात्र मागासच राहिली. बदलत्या काळाची हाक या कंपनीने ओळखली नाही. त्यामुळे त्यांना स्वाभाविकपणे काळाच्या पडद्याआड जावे लागले. मात्र गुगलसारख्या नव्या पिढीतील कंपनीने नव्या तंत्रज्ञानाचा अविष्कार दाखवित विना चालक मोटार बाजारात आणली आणि भविष्यात तंत्रज्ञान माणसाला किती सुखात ठेवणार आहे त्याची एक झलक दाखविली. औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिक मोटारींचे उत्पादन सुरू झाले. मोटारींप्रमाणेच विमाने असोत, रेल्वेगाडी असो की जहाजे, या सार्वांंना नियंत्रित करणारे सुकाणू म्हणजे स्टिअरिंग व्हील व ते सावरणारा चालक यांच्या जबाबदार्‍या आणि महत्त्व उलट वाढतच गेले. परिणामी, सुकाणूविना धावणारे वाहन हे एक नवीन काळातील आकर्षण बनून राहिली. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे दृश्य ठरावे. परंतु चित्रपटातील अनेक कथीत बाबी आता तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्षात उतरल्या आहेत. स्टिअरिंग व्हील, ब्रेक व ऍक्सिलरेटर असे काहीही नसलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे प्राथमिक स्वरूपाचे मॉडेल गुगलने नुकतेच सादर केले आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी गुगलने या संकल्पनेवर काम सुरू केले. त्यानुसार आता दोन जण बसू शकतील अशी छोटेखानी मोटार आकारास आली आहे. इलेक्ट्रिक मोटार असलेली ही कार सेन्सरच्या माध्यमातून चालू शकते. हे सेन्सर रडार आणि कॅमेर्‍याच्या मदतीने सभोवतीच्या ६०० फुटांपर्यंतच्या पल्ल्यावर ३६० अंशांतून नजर ठेवते. त्यामुळे मार्गातील अडथळे, माणसे, वस्तू यांचा अचूक अंदाज येतो. शिवाय त्यातील सॉफ्टवेअर्स ट्रॅफिक सिग्नल्स, वाहतुकीच्या खुणा यांचाही वेध घेतात. जी.पी.एस.च्या मदतीने ती कोठे आहे ते ठिकाण समजू शकते. स्टिअरिंग व्हील व अन्य नियंत्रण साधनांच्या ऐवजी ही सारी कामे चोखपणे पार पाडण्यासाठी या अत्याधुनिक मोटारीमध्ये केवळ एक स्टार्ट बटण आहे. अगदी अचानकपणे गाडी थांबवण्यासाठी रेड बटणचीदेखील तजवीज केलेली आहे. आरामदायी आसनव्यवस्था आणि इतर सुरक्षिततेच्या सर्व यथायोग्य सुविधा त्यात दिली जाणार आहे. सध्या निर्मितीच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात असलेली ही कार ताशी पंचवीस किलोमीटर अंतराने धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे. रस्त्यावरून प्रत्यक्ष धावण्यासाठीच्या संबंधित अन्य चाचण्या, इतर सुधारणा अद्याप बाकी आहेत. त्यामुळे अशी कार बाजारात येण्यास अद्याप चार-पाच वर्षांचा तरी अवधी लागेल. तंत्रज्ञानाचे असे अनेक आविष्कार आपण गेल्या काही वर्षांत केवळ पाहिलेच आहेत. दैनंदिन जीवनात त्याची अनुभूतीसुद्धा घेत आहोत. अवघ्या वीस वर्षांपूर्वी आपल्याला इंटरनेट ही काय चीज आहे, त्याविषयी फारशी माहिती नव्हती. आज गुगलशिवाय तर आपले पानही हलेनासे झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वी मोबाइल फोनचेसुद्धा मोठे अप्रूप होते. पाच  वर्षांपूर्वीपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि एवढेच कशाला, अगदी दीड वर्षापूर्वी व्हॉट्स ऍप हे सारेच आपल्याला माहित नव्हतेे. पण, आज पाच मिनिटेही आपण त्यापासून दूर राहू शकत नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या सोशल मीडियाने व विशेषत: व्हॉट्स ऍपने बजावलेली भूमिका अत्यंत कळीची असल्याचे पुढे आले आहे. त्यावरचा खर्च वाढत असला तरी तो आता कौटुंबिक खर्चाचा भाग समजला जातो. पूर्वी माणसाला फोन घेणे ही एक श्रीमंती बाब वाटे. आता मात्र मोबाईलही सर्वसामान्य माणसे घेत आहेत आणि त्याच्यावर होणारा खर्च ही किमान गरज झाली आहे. माणसाने जीवनाचा वेग एवढा वाढवला आहे की, त्याला दिवसाचे २४ तास पुरेनासे झाले आहेत. त्यामुळे जी अत्यावश्यक कामे आहेत, त्यातून सुटका करून घेण्याच्या मागे तो लागला आहे. सेल्फ ड्रायव्हिंगच्या तंत्रज्ञानात त्याला प्रवासाचा वेळ थेट स्वत:साठी तर मिळेलच, पण आणखी वैयक्तिक स्वातंत्र्य मिळेल. शिवाय, रस्त्यांची रचना मुळातून बदलून जाईल. तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात नेहमीच बदल केले आहेत. अगदी बैलगाडीपासूनचा माणसाचा विकास पाहिला तर गरजेनुसार माणून नवीन तंत्रज्ञनाचा स्वीकार करीत आला आहे. आता तर तंत्रज्ञान एवढ्या झपाट्याने बदलत चालले आहे की माणसाचे आयुष्य त्यातून अधिक सुखाचे होत चालले आहे. विना चालक वाहन हा त्यातील एक महत्वाचा टप्पा ठरावा. तंत्रज्ञानाने माणसाची नेहमीच प्रगती झाली आहे. जुने ते सोने हे खरे असले तरीही नवीन ते पूर्वीहून जास्त चांगले अशी म्हण तयार करण्याची आता वेळ आली आहे.
--------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel