-->
कॉँग्रेसला नवसंजिवनीची आवश्यकता

कॉँग्रेसला नवसंजिवनीची आवश्यकता

रविवार दि. १२ जून २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कॉँग्रेसला नवसंजिवनीची आवश्यकता
----------------------------------
एन्ट्रो- कॉँग्रेस पक्ष हा समुद्रासारखा आहे. कॉँग्रेसने आजवर विविध विचारांच्या माणसांना आपल्यासोबत नेत वाटचाल केली आहे. वेळो वेळी कॉँग्रेस पक्षात डाव्या किंवा उजव्या विचारांचा प्रवाह वाढलेला दिसतो. मोरारजी देसाईंनी पक्षाला उजव्या विचारसारणीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंदिरा गांधींनी तो प्रयत्न उधळून लावला होता. इंदिरा गांधी डावीकडे झुकल्यावर कम्युनिस्टांनाही त्यांच्यासोबत जाण्याचा मोह आवरता आला नव्हता. १९९१ नंतर उदारीकरणाचे युग हे कॉँग्रेसनेच सुरु केले असले तरीही पूर्ण भांडवलशाहीच्या दिशेने वाटचाल केली नाही. उदारीकरण ही त्याकाळची गरज होती. म्हणजेच कॉँग्रेसने आपल्या मूलभूत तत्वाशी तडजोड केलेली नाही हे इतिहास सांगतो. आता कॉँगग्रेस एका नव्या वळणावर येऊन थांबली आहे. पक्ष संपणार नाही हे खरे असले तरी त्याला उभारी कधी मिळणार आणि कोण देणार हा सवाल आहे...
-----------------------------------------------------
वयाची शंभरी पार केलेल्या देशातील सर्वात जुन्या व सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या कॉँग्रेस पक्षापुढे असध्या अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत. भाजपाने तर कॉँग्रेसमुक्त भारत करण्याचा विडाच उचलला आहे. अर्थातच भाजपा त्यात काही यशस्वी ठरणार नाही हे सत्य असले तरी सध्याच्या मृतप्रय अवस्थेला पोहोचलेल्या कॉँग्रेसला नवसंजिवनी देण्याची आवश्यकता आहे. अर्थात असा प्रकारचे प्रसंग कॉँग्रेसवर यापूर्वीही येऊन गेले आहेत आणि त्यातून तालावून सुखाऊन कॉँग्रेस यशस्वीरित्या बाहेर पडली आहे. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत कॉँग्रेसची धुळधाण उडाली होती, त्यावेळी जनता पक्षाची सत्ता येणे हे देशातील बिगर कॉँग्रेसचे पहिले सरकार होते. मात्र त्यावेळच्या संकटावर तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांनी मात केली व १९८० साली पक्षाला सत्तेच्या दारात पुन्हा उभे केले. त्यावेळी जी हिंमत व धैर्य इंदिरा गांधींनी दाखविले तसे नेतृत्व आज कॉँग्रेसकडे नाही हे वास्तव आपण स्वीकरले पाहिजे. तसेच सध्याच्या नेतृत्वाकडे अनेक उणीवाही आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांचे निकाल कॉँग्रेससाठी फारसे काही अनुकूल नव्हते. मात्र ज्या आक्रमकपणे भाजपा देशात आपला विस्तार करीत आहे, ते पाहता त्याच्याशी दोन हात करायला कॉँग्रेस दुबळी ठरली आहे. पराभवाच्या छायेतून अजून कॉँग्रेस बाहेर आलेली नाही. त्याचबरोबर अनेक नेते आता पक्षात काही भविष्य नाही अशी खूणगाठ बांधून पक्षाला रामराम ठोकीत आहेत. आसामातील एकेकाळचे कॉँग्रेस नेते हिमांत विश्‍व शर्मा यांनी पक्षाला बाय बाय केले आणि भाजपाचे दरवाजे ठोठावले. हेमंत विश्‍व यांनी राहूल गांधींची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना ते कुत्र्याशी खेळण्यात कसे मग्न होते याची वर्णने प्रसिध्द झाली आहेत. यातील वस्तुस्थिती नेमकी काय हे सांगणे कठीण असले तरी यात कॉँग्रेसचे नेतृत्व पूरते बदनाम झाले हे मात्र नक्की. छत्तीसगढमधील नेते अजित जोगी यांनीही बंडाचे निशाण फडकाविले आहे. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे. अशा प्रकारे हे दोन नेते हातातून निसटले असताना मुंबई कॉँग्रेसचे नेते व पाच वेळा खासदार असलेले पक्षाचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी चक्क राजकीय संन्यास घेतला आहे. त्यांच्या या संन्यासामुळे मुंबई कॉँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यासारखी स्थिती आहे. पक्ष नेतृत्वाने कामत यांच्या भावनांनाही केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे मानसिक उद्वेगामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मुळातच कॉँग्रसचे नेतृत्व हतबल झाल्यासारखी स्थितीत असल्याने कार्यकर्ते तरी काय करणार? त्यातच राहूल गांधींना पक्षाचे अध्यक्षपद देण्याच्या हालचाली जोरात सुरु झाल्या आहेत. त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधींकडे सर्व सरचिटणीसांनी राजीनामे सुपूर्द केले आहेत. राहूल गांधी अनेक म्हातार्‍यांना घरी बसवून तरुणांना पक्षातील महत्वाची पदे देणार असल्याचे समजते. त्यामुळे पक्षातील वयस्क मंडळींना जोरदार धक्का लागणार आहे. त्यात कदाचित कामत हे देखील असू शकतात. अर्थात अशा प्रकारे सर्वच ज्येष्ठांना डावलले जाणार नाही हे खरे असले तरीही अनेकांच्या विकेट पडणार आहेत. कामतांची मुंबईतील पक्षाची ताकद मोठी आहे व त्यांना भविष्यात निवडणुका जवळ आल्या असताना डावले अशक्यच होते. राहुल गांधी यांनी संजय निरूपम यांच्याकडे मुंबईचे अध्यक्षपद सोपविल्यापासून कामत यांच्या गटाचे खच्चीकरणाचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे राजीव व सोनिया गांधी यांच्याशी जवळिक राहिलेल्या व कॉंग्रेसचे निष्ठावान अशी ओळख असलेले कामत यांची सध्या पक्षात घुसमट होत होती. त्यातच येत्या काही महिन्यांत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहुल गांधी विराजमान होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राहुल गांधी आपल्या नवीन व तरुण टीमसह पक्षाचा विस्तार करू पाहात आहेत. दीर्घकालीन विचार करून राहुल यांनी तरुणांना संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे जुन्या जाणत्या व अनुभवी नेत्यांना राहुल यांच्या टीममध्ये स्थान असणार नाही. मुंबई कॉंग्रेसमध्ये सध्या देवरा गट, कामत गट व आता निरुपम गट असे तीन गट प्रामुख्याने सक्रिय आहेत. यात गटातून परस्परांचे काटे काढण्याचे उद्योग सुरु असतात. सध्याचे अध्यक्ष संजय निरुपम हे शिवसेनेतून आलेले आहेत. त्यांच्याकडे अजूनही बाहेरून आलेले नेते म्हणून पाहिले जाते, तसेच निरुपम यांची आक्रमक शैली असल्यामुळे ते फक्त आपल्याच गटातील मंडळींना पुढे करीत असतात. अलीकडेच त्यांनी अनेक ब्लॉक समित्यांच्या नियुक्त्या परस्पर कोणालाही विश्‍वासात न घेता केल्या. त्यातून पक्षात नाराजी आहे. निरुपम हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते नाहीत. यापूर्वी मुरली देवरा व गुरुदास कामत यांनी गटांचे राजकारण केले असले, तरीही प्रत्येक गटातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाऊन राजकारण केले आहे. अर्थात, अशा प्रकारे निवृत्ती स्वीकारण्याची कामत यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी मंत्री असतानाही राजीनामा दिला होता. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचा आदर राखून ते आपला निर्णय बदलतील व आपला मुंबईतील कार्यकर्त्यांचा दबाव गट आगामी निवडणुकांसाठी तयार करतील, असा अंदाज आहे. मात्र, एक बाब स्पष्ट आहे की, गुरुदास कामत आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर कॉँग्रेसला आगामी निवडणूक कठीण जाईल, हे मात्र नक्की. राहूल गांधी यांच्याकडे पक्षाची सुत्रे आल्यावर पक्षात फार मोठे चैतन्य सळसळेल असे काही नाही. सध्याची पक्षाची होत असलेली पडझड कॉँग्रेसने रोखणे हे सध्या गरजेचे आहे. त्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. तसेच भाजपाच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात आंदोलने करावी लागणार आहेत. केवळ संसदेतील लढाई पुरेशी नाही तर त्यासाठी रस्त्यावर येऊन लढण्याची तयारी कॉँग्रेसजनांनी केली पाहिजे. भाजपा सरकारचे अनेक पोकळ दावे उघड करण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडियावर जेवढ्या आक्रमकतेने भाजपा वावरत आहे त्याहून जास्त आक्रमक वाटचाल कॉँग्रेसला करावी लागेल. राहूल गांधी हे लेफ्ट टू सेंटर आहेत असे सध्यातरी ददिसते आहे. निदान त्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये डाव्यांबरोबर आघाडी केल्याने तरी तसे दिसले. पण इकडचा त्यांचा नेेम चुकला हे नक्की. सर्वधर्मसमभावावरील ठाम विश्‍वास, लोकशाहीतील मुक्त वातावरण, जनविरोधी धोरणांच्या विरोधात लढाई उभारुनच कॉँग्रेसला त्यांची ताकद भविष्यात वाढवावी लागणार आहे. त्याहीपेक्षा पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर यावे लागणार आहे. भाजपाचा ज्या प्रकारे खोटेपणा रेटून नेण्याचा जो प्रकार सुरु आहे त्याला आळा घालण्यासाठी त्यांचा खोटारडेपणे उघड करण्याची आवश्यकता आहे. कॉँग्रेस पक्ष हा समुद्रासारखा आहे. कॉँग्रेसने आजवर विविध विचारांच्या माणसांना आपल्यासोबत नेत वाटचाल केली आहे. वेळो वेळी कॉँग्रेस पक्षात डाव्या किंवा उजव्या विचारांचा प्रवाह वाढलेला दिसतो. मोरारजी देसाईंनी पक्षाला उजव्या विचारसारणीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इंदिरा गांधींनी तो प्रयत्न उधळून लावला होता. इंदिरा गांधी डावीकडे झुकल्यावर कम्युनिस्टांनाही त्यांच्यासोबत जाण्याचा मोह आवरता आला नव्हता. १९९१ नंतर उदारीकरणाचे युग हे कॉँग्रेसनेच सुरु केले असले तरीही पूर्ण भांडवलशाहीच्या दिशेने वाटचाल केली नाही. उदारीकरण ही त्याकाळची गरज होती. म्हणजेच कॉँग्रेसने आपल्या मूलभूत तत्वाशी तडजोड केलेली नाही हे इतिहास सांगतो. आता कॉँग्रेस एका नव्या वळणावर येऊन थांबली आहे. पक्ष संपणार नाही हे खरे असले तरी त्याला उभारी कधी मिळणार आणि कोण देणार हा सवाल आहे.
-------------------------------------------------------------------------------------

0 Response to "कॉँग्रेसला नवसंजिवनीची आवश्यकता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel