-->
सत्ताधार्‍यांतील तुंबळ युध्द

सत्ताधार्‍यांतील तुंबळ युध्द

संपादकीय पान सोमवार दि. १३ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सत्ताधार्‍यांतील तुंबळ युध्द
शिवसेना व भाजपा हे सध्या सत्तेत मांडीला मांडी लाऊन बसलेले असले तरी शिवसेना अजून काही आपण सत्तेत नसल्याच्या अविर्भावात आहे. कारण रोजच्या रोज काही तरी निमित्त काढून हे दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. मुंबईतील मेट्रो ३ च्या प्रश्‍नावरुन तर पालिकेत शिवसेनेने विरोधी पक्षांना आपल्या हाताशी धरुन हा प्रकल्प मार्गी लागण्यास खोडा घातला. निमित्त केले ते पुनर्वसनाचे. या प्रकल्पामुळे गिरगावातील सुमारे हजारभर कुटुंबे बेघर होणार असल्याने त्यांचे अगोदर पुनर्वसन करा ही मागणी शिवसेनेने केली. अर्थात ही मागणी रास्तच आहे. मात्र त्याला राजकीय रंग देऊन या प्रकल्पालाच सुरुंग लावला जात आहे. त्याचबरोबर वांद्रे येथील रेल्वे टर्मिनस उद्घघाटन कार्यक्रमात शिवसेनेच्या खासदारांनी दाखवलेले काळे झेंडे, काळे दुपट्टे घालून कार्यक्रमात घेतलेला सहभाग आणि वरती निषेधाच्या घोषणा यामुळे भाजपाचे नेते संतप्त झालेले आहेत. एवढेच नव्हे तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर भाजपा सरकारला निजामाचे बाप या शब्दांत शिव्या घातल्यामुळे या असल्या सहकार्‍यांना मंत्रिमंडळातून हाकलून लावा, इतका संताप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार मधू चव्हाण यांनी तर शिवसेनेच्या नेत्यांना स्पष्टपणे प्रश्न विचारला आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसायचे आणि बाहेर पडल्यानंतर भाजपा सरकार, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत फिरायचे हे धंदे आता बंद करा, नाही तर सत्तेतून बाहेर पडा. खरोखरीच शिवसेना आजही विरोधकाप्रमाणे वावरत व वागत असल्याने त्यांनी सत्तेतून बाहेर पडणे हेच शहाणपणाचे ठरेल. किंवा त्यांच्या अशा प्रकारच्या बेताल बोलण्याचा वजन प्राप्त होऊ शकेल. शिवसेनेला एकीकडे सत्ता सोडण्याचा मोह आवरत नाही तर दुसरीकडे भाजपालाही पाण्यात पहायचे, हे दुहेरी अस्त्र त्यांनी उगारले आहे. त्यापेक्षा सत्ता पूर्णपणे सोडण्याचे धारिष्ट्य शिवसेनेने दाखवावे. सेनेचेमंत्री भाजपाविरोधात आक्रमक झालेले आहेत. एवढेच नव्हे तर खडसेंच्या भोसरी येथील जमिनीबाबत ती जमीन एमआयडीसीची असल्याचा खुलासा करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपाचे मंत्री एकनाथ खडसे यांना मुद्दाम अडचणीत आणले, अशीही जोरदार चर्चा आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती तोडायला खडसे आग्रही होते. त्यामुळेच ही युती तुटली, असा ठाम समज सेनेच्या नेत्यांचा झाला असून, त्यामुळे खडसे यांना टार्गेट करावे, असे आदेश मातोश्रीहून देण्यात आले होते. त्यामुळेच जळगावमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून खडसेंच्या राजीनाम्याचा आनंद व्यक्त केला, तर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी जिल्हा आता दहशतवादातून मुक्त झाला, अशी प्रतिक्रिया दिली होती. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सेना-भाजपा युती तुटली होती. आताही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय केल्यामुळे शिवसेना-भाजपाची जोरदारपणे जुंपलेली आहे. भाजपाला मुंबई महानगरपालिकेत एकहाती सत्ता पाहिजे आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेनेची संगत सोडण्याचे यापूर्वीच ठरविले आहे. ही एकदाची युती तुटावी व आपण स्वतंत्र निवडणूक लढविण्यास मोकळे असे भाजपाला वाटते. त्यासाठीच ही दोन्ही पक्षांची धडपड झाली आहे. मात्र अशा धमक्या देण्यापेक्षा शिवसेनेने सत्ता सोडावीच.

0 Response to "सत्ताधार्‍यांतील तुंबळ युध्द"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel