-->
संपादकीय पान शनिवार दि. ७ जून २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
कृषीवल चळवळीचा एल्गार
-----------------------------
कृषीवल आज ७८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गेल्या ७८ वर्षाच्या या वाटचालीत कृषीवल अनेक घटनांचा मूर्तीमंत साक्षिदार होताच तसेच अनेक घटनांचा शिल्पकारही होता. चळवळीचे हत्यार काय असते, त्याची ताकद सर्वसामान्यांच्या कशी कामी येते हे कृषीवलने आपल्या कामातून दाखवून दिले आहे. शेतकर्‍यांचे उद्गाते नारायण नागू पाटील यांनी कृषीवल सुरु केला त्यावेळी शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ पाहिजे होते. देशात त्यावेळी देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवलेला नव्हता. एकीकडे स्वातंत्र्यांचा संग्राम आणि त्यासोबत शेतकरी कष्टकर्‍यांच्या हक्काची लढाई, सामाजिक सुधारणांसाठी जागृती ही एकत्र लढविली जात होती. अशा या लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर कृषीवलचा जन्म झाला. त्यावेळी असलेली वृत्तपत्रे ही समाजप्रबोधनाचा वसा म्हणूनच निघायची. वृत्तपत्र हा व्यवसाय म्हणून करण्याचे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. अर्थातच कृषीवल त्याला अपवाद नव्हता. सुरुवातीला साप्ताहिक त्यानंतर छोट्या आकारातील दैनिक व नंतर मोठ्या आकारातील दैनिक असे विविध टप्पे कृषीवलने पार केले. सुरुवातीला कृष्णधवल व त्यानंतर रंगीत छपाई करुन कृषीवलने काळाशी सुंसंगतपणा राखला आणि स्पर्धेच्या युगात आपण कधी कमी पडणार नाही हे पाहिले. कृषीवलच्या बरोबरीने सुरु झालेली व ऐवढी वर्षे टिकलेली वृत्तपत्रे आज महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहेत. कृषीवलने काळाच्या ओघात आपल्या विचाराशी तडजोड न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी नाते जुळवित आपली ही ८७ वर्षांची वाटचाल यशस्वीरित्या सुरु ठेवली. नारायण नागू पाटल यांचा वारसा प्रभाकरभाऊ पाटील यांनी सुरु ठेवला आणि तिसर्‍या पिढीतील जयंतभाई पाटील यांनी हीच बांधिलकी कायम राखत कृषीवलची नाळ आधुनिकतेशी जोडली. ऐवढेच नव्हे तर आपली पुढील पिढी हे काम अविरत सुरु ठेवील यांची दखल घेतली. यातून कृषीवल ही केवळ कंपनी म्हणून कार्यरत नाही तर ती एक संस्था म्हणून नावारुपाला आली. यातूनच कृषीवलमध्ये तीन-तीन दशके काम करणारी कर्मचार्‍यांची फौज उभी राहिली. आम्ही कृषीवलमध्ये काम करतो याचा त्यांचा रास्त अभिमान वाटतोे. येथे प्रदीर्घ काळ काम करणारे गावोगावचे प्रतिनिधी अल्प मानधनातही कृषीवलचे काम करताना धन्यता मानतात. त्याचबरोबर जनसामान्यांच्या अनेक प्रश्‍नांना वाचा फोडून कृषीवलने आपला एक दरारा निर्माण केला आहे. गाव पातळीपासून ते  शहरातील अनेक प्रश्‍नांची दखल घेऊन कृषीवलने लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषीवलने हीच पुण्यायी आपल्या पदरी गेल्या ७८ वर्षात जमविली आहे. आजच्या काळात ज्याला ब्रँड म्हणतात तो ब्रँड कृषीवल आता खर्‍या अर्थाने आपले चळवळीचे हत्यार म्हणून आजही तेवढ्याच समर्थपणे उभा आहे. कृषीवलच्या कामकाजात पाटील कुटुंबियांनी व्यवसायिकता जरुरर आणली तरी त्याच्याकडे धंदा म्हणून कधीच पाहिले नाही, ही सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. गेल्या दशकात वृत्तपत्रांचे स्वरुप झपाट्याने बदलले. संगणाकाच्या आगमनानंतर तर वृत्तपत्रांचा सर्वस्वी चेहरामोहरा बदलण्यास मोठी मदत झाली. तंत्रज्ञानातील हे बदल होत असताना वृत्तपत्रांचा समाजप्रबोधनाचा वारसा संपुष्टात येऊन त्याच्याकडे धंदा म्हणून पाहाण्याचा एक नवा दृष्टीकोन व्यवस्थापनाचा सुरु झाला. पेड न्यूज हे त्याचे एक गाठलेले शिखर म्हटले पाहिजे. वृत्तपत्रातल्या बातम्या विकत घेण्याच्या या प्रकारापासून कृषीवलने स्वत:ला चार हात दूर ठेवणेच पसंत केले. कृषीवलच्या ध्येय धोरणात पेड न्यूज हे धंदेवाईक स्वरुप कधीच बसू शकणार नाही. कृषीवलकडे आज केवळ कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनता एक आधारवाडाच्या नात्याने पाहते ते यासाठीच. कारण कृषीवलने वाचकांशी नेहमीच बांधीलकी मानली आहे. पैसे मोजून बातम्या देण्याची प्रतारणा वाचकांशी कृषीवलने कधी केली नाही आणि यापुढेही करणार नाही. कृषीवलची डाव्या चळवळीशी असलेली नाळ कधीच तुटणार नाही. सध्या कृषीवलचा पसारा रायगड जिल्ह्यापुरताच मर्यादीत असला तरीही भविष्यात शेजारच्या जिल्ह्यात विस्तार करण्याची योजना आहे. याचाच एक भाग म्हणून कृषीवल आता रत्नागिरीतही उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झाली आहे. कृषीवलचे स्वरुप हे धंदेवाईक नसल्यामुळे विस्तार करण्यास वेळ लागेलही. परंतु आम्ही धीमेगतीने पण निश्‍चितपणाने  विस्तार करु यात काहीच शंका नाही. कृषीवलने वेळोवेळी आधुनिकीकरणाचा ध्यास घेतला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान नेहमीच अवगत केले आहे. सध्याच्या काळात सोशल मिडिया हे चर्चेत असलेले एक प्रभावी माध्यम झाले आहे. अलिकडेच झालेल्या निवडणुकीच या माध्यमाचे महत्व पटले आहे. या माध्यमाला हाताशी घेऊन त्याचा उपयोग कृषीवलच्या वाचकांना व्हावा म्हणून कृषीवल व्हॉटस् ऍप सेवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु केली आहे. याव्दारे वाचक आपली गार्‍हाणी, तक्रारी, गावोगावच्या बातम्या, फोटो आमच्याकडे पाठवू शकतील. आमचे असंख्य वाचक या उपक्रमात सहभागी होतील याचा आम्हाला विश्‍वास वाटतो. अशा प्रकारे सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणारे कृषीवल हे राज्यातील पहिलेच दैनिक ठरेल असा आम्हावा विश्‍वास वाटतो. सहा महिन्यांपूर्वी कृषीवलने आपली ई आवृत्ती सुरु केली. गेल्या सहा महिन्यात या आवृत्तीला साडे सहा लाख हिटस् मिळाल्याने आमचा उत्साह वाढला आहे. जगभरातील ६४ देशातून दररोज कृषीवलचे वाचक ही ई आवृत्ती वाचत असतात. आता देखील कृषीवलच्या व्हॉटस् ऍप सेवेला असाच उत्कृष्ट प्रतिसाद लाभेल असा विश्‍वास आम्हाला वाटतो. कृषीवलच्या असंख्य वाचक-लेखक, जाहीरातदार, विक्रेते, गावोगावचे प्रतिनिधी, यांचे ऋण आम्ही व्यक्त करीत आहोत. आमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील त्याची जबाबदारी संपादक या नात्याने मी स्वीकारतो. कृषीवल चळवळीचा एल्गार असाच जाज्वल्य राहिल असाही विश्‍वास व्यक्त करतो.
-------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel