-->
संपादकीय पान मंगळवार दि. १० जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
आपचे मेकओव्हर यशस्वी होईल का?
-----------------------------------------
आम आदमी पक्षाने आता मेकओव्हर करण्याची घोषणा केली आहे. पक्ष म्हणजे एखादी कंपनी असावी आणि त्या कंपनीला नव्याने साज चढवून त्याचा मेकओव्हर करण्याचा हा प्रकार वाटेल. परंतु आम आदमी पक्षाचे केजरीवाल हे आपला पक्ष एखाद्या कंपनी प्रमाणेच चालवित आहेत. पक्षनेतृत्वावरील एकाधिकारशाहीचे आरोप व अंतर्गत कलहांनी पोखरत चाललेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या मेकओव्हरचे केलेले सूतोवाच म्हणजे नेमके काय असा सवाल उपस्थित होईल. पक्षाचा पाया विस्तारणे व त्याची धोरणे तळागाळापर्यंत पोचविणे यासाठी आपतर्फे मिशन विस्तार योजना लवकरच देशभरात सुरू होईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. गॅसच्या प्रस्तावित दरवाढीवरून मोदी सरकारविरुद्ध लढण्याचे पहिले हत्यार आपला मिळाल्याचे केजरीवाल यांनी सूचित केले. गॅस दरवाढ, दिल्लीतील विजेची दरवाढ यासारख्या मुद्द्यांवर आप मोदी सरकारला घेरणार, हेही स्पष्ट झाले. जाणकारांच्या निरीक्षणानुसार आपचा गड असलेल्या दिल्लीच्या निवडणुका तोंडावर असल्याने पक्षाचा नव-विस्तारवाद राजधानीतील ७० विधानसभा मतदारसंघांतूनच जोमाने सुरू होणार हे स्पष्ट आहे. केजरीवाल यांच्या मते मिशन विस्तार योजनेअंतर्गत आपच्या धोरणांचे पुन्हा आत्मपरीक्षण करणे, पक्षाचा पाया विस्तारणे, पक्षाची ध्येयधोरणे व आदर्शवाद सर्व जनतेला पटवून देणे, बूथ पातळीवर संघटना मजबूत करणे यांंचा समावेश आहे. गावागावांत जाऊन पक्षकार्यकर्ते प्रामाणिक राजकारणाचे महत्त्व पटवून देतील. लोकसभा निवडणुकीत आपच्या ४३० उमेदवारांतील चार उमेदवार विजयी होणे ही केजरीवाल यांच्या मते लक्षणीय कामगिरी आहे. एकोणीस महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या आपच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर बोलताना केजरीवाल यांनी ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्या नाराजीच्या वृत्ताचे खंडन केले. यादव यांनी ई-मेलद्वारे पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा उठविला होता. केजरीवाल यांनी काल यादव व शाजिया इल्मी यांच्याशी समेट करण्याची इच्छा दाखविली होती व नंतर यादव यांनीही सारे काही आलबेल असल्याचे सांगितले होते. यादव हे आपले प्रिय मित्र आहेत, असे काल सांगणारे केजरीवाल यांनी आज नव्या कुटुंबात वादाचे मुद्दे येणारच अशा शब्दांत यादव नाराजी प्रकरणाचे वर्णन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही केजरीवाल यांनी अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत मार खाल्लेल्या बहुतांश उमेदवारांचे पुनर्वसन करताना आपने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. यात आशुतोष व आशिष खेतान या पत्रकारांचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत राजकारण्यांनी पक्षभेद विसरून उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्यातील तरुणाच्या हत्येबाबत केंद्राने कडक उपाय करून खुन्यांना कठोर शिक्षा लवकरात लवकर केली पाहिजे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. गॅसच्या प्रस्तावित दरवाढीवर अरविंद केजरीवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या केंद्र सरकारने ही वाढ रोखावी, अन्यथा सामान्य नागरिक निष्कारण भरडला जाईल. दरवाढ झाली तर आप त्याविरुद्ध उभा राहील. ल्यूटन्स झोन वगळता दिल्लीच्या बहुतांश भागात सध्या विजेचा जो गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे त्याबाबत बोलताना केजरीवाल यांनी, यापेक्षा तर आपच्या ४९ दिवसांच्या शासनकाळातही चांगली स्थिती होती. तेव्हा दिल्लीत २४ तास अखंडित वीजपुरवढा होत होता, असा टोला लगावला. मात्र आपने जर जी हातात सत्ता होती ती न सोडता जर चांगल्या रितीने राबवून एक चांगला आदर्श घालून दिला असता तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. यातूनच आपचा मेकओव्हर चांगल्या रितीने करता आला असता, आता नव्हे.
-----------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel