-->
सीमेवरील अस्वस्थता

सीमेवरील अस्वस्थता

संपादकीय पान बुधवार दि. 2 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सीमेवरील अस्वस्थता
आपल्या देशात दिवाळीचा सण साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्यांकडून कुरापती वाढल्या आहेत, ही खेदाची बाब म्हटली पाहिजे. अजूनही सीमेवर तणावाची स्थिती आहे. अशी तणावाची स्थिती गेले तीन महिने आहे. पाकिस्तानी सैन्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि मेंढर सेक्टरमध्ये रविवारी रात्री केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद आणि एक महिलेचा मृत्यू झाला, तसेच पाक सैनिकांनी मेंढरमधील बोलाकोट येथे देखील शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात दोन भारतीय सैनिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. भारतात दिवाळी साजरी केली जात असताना रविवारी सीमेवर रात्रीपासूनच मोठया प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आर.एस. पुरा सेक्टरमध्ये तुफान गोळीबार करण्यात आला. रात्री 8 वाजता सुरू झालेला हा गोळीबार मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत सुरू होता. भारतात सण साजरा केला जात असताना मुद्दाम पाकिस्तानने मुहूर्त साधून हा निशाणा लगावला आहे. पाकिस्तानने तुफान गोळीबार करत भारतीय पोलीस चौक्यांना, नागरिकांना लक्ष्य केले. भारतीय जवानांनीही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. आर.एस.पुरा सेक्टरमध्ये दोन ठिकाणी स्वयंचलित शस्त्रांनी मॉर्टार डागले. येथूनच जवळच असलेल्या सुचेतगड भागातही गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सोमवारी मेंढरमधील बालाकोट आणि मनकोट भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाक सैनिकांनी सुरक्षा चौक्या व नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. त्यात एक महिलेचा मृत्यू झाला. राजौरी भागातही गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला आहे. गेल्या काही दिवसांत वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे सीमा भागात राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. केवळ आपल्याच बाजूचे नाहीत तर पाकिस्तानच्या भूमीवरीलही नागरिक त्रस्त झाले आहेत. उभय देशातील चकमकींमुळे त्यांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. सीमेवरील गावांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. पाकिस्तानाकडून होत असलेल्या सततच्या गोळीबारामुळे सीमा भागात तणावाची स्थिती असून भारत आणि पाकिस्तानाचे संबंध आणखी ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शहीद झालेले जवान नितीन कोळी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मूळगावी दुधगावात त्यांच्या आर्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. उरी हल्ल्यानंतर आपले अर्ध्याहून जास्त डझन सैनिकांना विरगती प्राप्त झाली आहे. यात मनदीप सिंग रावत, नितीन कोळी, संदीपसिंग रावत, जितेंद्र सिंग, सुशीलकुमार, गुरमनसिंग, सुदेश कुमार यांचा समावेश आहे. यापाठोपाठ नकळत नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी आता परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाणार आहे. सैन्याच्या प्रयत्नांना पाकिस्तानकडून दाद मिळत नसल्याने आता मोदी सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने चव्हाणला भारतात परत आणण्याची तयारी सुरु केली आहे. भारताने 29 सप्टेंबररोजी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उध्दस्त केले होते. दुर्दैवाने याच दिवशी चंदू चव्हाण हा जवान पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेला आणि पाकच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. सर्जिकल स्ट्राईक आणि चंदू चव्हाणचा संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते. चव्हाणच्या सुटकेसाठी भारताच्या लष्करी कारवाई प्रमुखांनी  पाकिस्तानमध्ये त्यांच्या समकक्ष अधिकार्‍यांशी चर्चादेखील केली. सुरुवातीला या चर्चेतून परराष्ट्र मंत्रालयाला लांब ठेवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानी सैन्यासोबतच्या चर्चेला फारशी गती मिळत नसल्याने आता मोदी सरकारने परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला तर पाकिस्तानने चंदू चव्हाणबाबत इन्कार केला होता. नंतर मात्र तो आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले होते. चव्हाणच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालय पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे. पण परराष्ट्र खात्याच्या पत्रांना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय उत्तर देणार का असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. कुलभूषण जाधव यांनादेखील पाकिस्तानने दहशतवादाच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यांच्या सुटकेसाठीही परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न केले होते. पण त्याला पाकिस्तानने अद्याद दाद दिलेली नाही. चंदू चव्हाण हे 23 वर्षांचे असून ते मुळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहेत. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये ते जवान म्हणून कार्यरत आहेत. आपला नातू पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्याचा धक्का सहन न झाल्याने चंदू चव्हाण यांच्या आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले होते. चंदू चव्हाणचा पाकिस्तानमध्ये अमानूष छळ केला जाईल, त्यामुळे त्याला परत आणावे अशी आर्त मागणी चव्हाण कुटुंबीयांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी आपल्या जीवाची बाजी लावाली लागणार आहे. सध्या उभय देशांचे संबंध बिघडलेले असल्यामुळे चव्हाण यांची सुटका करणे वाटते तेवढे सोपे नाही. कदाचित भारताला त्यासाठी आन्तरराष्ट्रीय पातळीवरही दाद मागावी लागेल. भागरताने सध्या चर्चेचे तसेच विविध पर्याय उरीच्या हल्ल्यानंतर एका झटक्यात बंद केले आहेत. अगदी वाघा सीमेवर दररोज ज्या कवायती होतात त्यावेळी दिवाळीत मिठाई देण्याची आजवर असलेली प्रथाही यावेळी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानात नाराजी तर आहेच शिवाय उभय देशांच्या सीमेवर तणाव वाढत चालला आहे. ही परिस्थीती निवळण्यासाठी आता भारताने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------------------------------------

0 Response to "सीमेवरील अस्वस्थता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel