-->
संपादकीय पान बुधवार दि. १८ जून २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
पोलिस भारतीचे उशीरा सुचलेले शहाणपण
-----------------------------
यंदाच्या पोलिस भरतीच्या वेळी चार तरुणांचे बळी गेल्यावर सरकारला शहाणपण सुचले आहे. यापुढे पोलीस भरती हिवाळ्यातच करण्याचे आश्‍वासन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिले आहे. तसेच मृत्यू पावलेल्या घटनांची चौकशीही करण्यात येणार आहे. अर्थात अशा चौकशीने गेलेले तरुणांचे हे जीव काही परत येणार नाहीत. मात्र यातून धडा घेऊन सरकार खरोखरीच करेल काय, अशी शंका येतेच. कारण बिचार्‍या नोकरीच्या आशेने आलेल्या या तरुणांना भर उनात धावायला लावणे म्हणजे कठोर ह्ृदयाचे हे सरकार आहे. ही केवळ त्यांची परीक्षा नाही तर नोकरीसाठी आलेल्या या बेकार तरुणांची थट्टाच आहे. पोलिस भरतीत येणारे तरुण हे गरीब घरातून प्रामुख्याने येतात. त्यांच्याकडून लाच घेतली जातेच आणि त्यांना उन्हातही धावण्याची शिक्षा केली जाते. अर्थात या चाचणीलाही अपवाद राज्यात आहेत आणि त्याचा विचार सरकारने करण्याची आवश्यकता आहे. खरे तर आबांना त्यांच्या खात्यातील सांगली पॅटर्नची कल्पना नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. सांगली पोलिस भरतीचा सर्वात वेगवान आणि आदर्श पॅटर्न तत्कालीन अधीक्षक भारंबे यांनी नऊ वर्षांपूर्वी सुरू केला. प्रशासनात हातखंडा असलेल्या भारंबे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन एक पॅटर्न निर्माण केला. त्यावेळी राज्यात सगळीकडे मैदानी चाचणी सुरू असताना आठवडाभरात भारंबे यांनी मैदानी, लेखी परीक्षसेसह सर्व प्रक्रिया पार पाडून सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी पाडलेल्या चाकोरीवरूनच गेली काही वर्षे भरतीप्रक्रिया पार पाडली जाते.
अधीक्षक दिलीप सावंत यांनी पूर्वीच्या पॅटर्नमध्ये आणखी सुधारणा घडवून आणत पारदर्शकतेबरोबर उमेदवारांना सुरक्षितता देखील दिली. मैदानी चाचणीसाठी सकाळी ६ वाजताच मैदानावर सर्वांना पाचारण केले. ऊन डोक्यावर येण्यापूर्वीच पहिल्या दिवशी लांबउडी, गोळाफेक, पुलअप्स, शंभर मीटर धावणे असे चार प्रकार घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर ५ कि. मी. धावण्यासाठी शहराबाहेरील मार्गावर नेले. सकाळी ११ वाजता सर्वच क्रीडा प्रकार कसे संपतील, याची काळजी घेतली. राज्यात इतर ठिकाणी पोलिस भरतीची प्रक्रिया ही सकाळी ९ पासून सुरू होते. भर उन्हात मुलांना मैदानी चाचणीसाठी उतरले जाते. त्यामुळे काही मुलांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. मात्र सांगली जिल्ह्यात एक आदर्श पॅर्टनची सुरवात झाली आहे. जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी सकाळी ६ वाजता मैदानी चाचण्यांना सुरवात होते. त्यातूनच उमेदवार राहिले तर सायंकाळी ऊन खाली आल्यानंतर चाचणी घेऊन त्या पूर्ण केल्या जातात. त्यामुळे यंदाच्या भरतीत कोणत्याही उमेदवाराचा शारीरिक त्रास झाला नाही. या नेटक्या नियोजनामुळे सांगली पोलिस भरतीचा आदर्श पॅटर्न हा राज्यात नावारूपास आला आहे. मैदानी चाचणीबरोबर लेखी परीक्षेची नेटकी बैठक व्यवस्था केली. खुल्या मैदानावर सकाळच्या सत्रात एकाचवेळी ३ हजारहून अधिक उमेदवारांची परीक्षा घेतली. उमेदवारांना जागेवरच पाणी आणि बिस्किटाची व्यवस्था केली. भरतीत कोणत्याही उमेदवाराला त्रास झाला नाही की गोंधळ उडाला नाही. सर्व्हर डाऊनमुळे तसेच संगणक केंद्रातील अडचणीमुळे ज्यांना उशिरा प्रवेशपत्र मिळाले त्यांनाही संधी दिली गेली. पोलिस भरतीला जिल्ह्यातील तसेच बाहेरील अनेक उमेदवार उपस्थित राहिले. त्यांनीदेखील भरतीच्या सांगली पॅटर्नचे कौतुक केले. सांगलीसारख्या ठिकाणी भरतीचा आदर्श पॅटर्न राबवला जात असताना मुंबईत दुर्दैवाने चार जणांचा बळी गेला. खरे तर या प्रकाराची चौकशी करण्याची गरजच नाही. कारण भर उन्हात चाचण्या घेतल्यानेच हे मृत्यू झाले आहेत. अशा वेळी सांगली पॅटर्नचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याची आवश्यकता आहे.
-------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel