-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ३० मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
मोदी-शरीफ भेटीबद्दल पाक मिडिया सावध
--------------------------------------
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भारत भेट आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेबद्दल पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी साशंकता व्यक्त केली असून, दोन्ही देशांच्या संबंधांत खरेच सुधारणा होण्याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी मात्र ज्यावेळी उभय देशात चर्चा झाल्या त्यावेळी मात्र पाकिस्तानी मिडिया सकारात्मक असे. यावेळी मात्र त्यांच्या सावध पवित्र्यामुळे हा भेटीच्या फलीताबाबत शंका व्यक्त होणे स्वाभाविक आहे. डॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या दैनिकाने या भेटीवर पाक-भारत : पुन्हा आणि सारखे हे संपादकीय लिहिले आहे. सुरक्षेचे जुने प्रश्‍न हाताळण्याऐवजी शरीफ यांनी आर्थिक संबंध सुधारण्याचा मुद्यांना महत्त्व देण्याचे निवडणूकपूर्व आश्‍वासन या भेटीत पाळले. दिल्लीतील वास्तव्यात त्यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताचा दृष्टिकोन दहशतवादाच्या मुद्यावर तर पाकिस्तानचे अनेक प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याला असल्याचे दिसले. यावर काही प्रमाणात स्पष्टता आणण्याची गरज असून, यानंतरच दोन्ही देशांतील दरी कमी होईल, असे या संपादकीयात म्हटले आहे. द नेशन या वृत्तपत्राने कायम उंबरठ्यावर असे संपादकीय लिहिले आहे. यात म्हटले आहे, शरीफ यांचे हे हुशारीचे राजकीय पाऊल आहे. सार्कमधील नेत्यांना निमंत्रित करून मोदी यांनी वादग्रस्त ठरलेल्या निवडणुकीवरील वादाचे सावट दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही आता राजनैतिक चाली बदलण्याची गरज ओळखायला हवी. इतिहासातील चुका टाळून परस्पर सामंजस्याने गुंतागुंतीच्या मुद्द्यावर मार्ग काढायला हवा, असे यएापत्राने म्हटले आहे. द न्यूज वृत्तपत्राने एक नवे पान हा लेख या भेटीवर लिहिला आहे. शरीफ यांच्या भेटीतून ठोस काही हाती येईल, असे अपेक्षित करणे अवास्तव ठरेल. मोदी यांनी प्रामुख्याने चर्चेत दहशतवाद आणि विशेषतः मुंबईवरील २००८ चा हल्ला हे विषय केंद्रस्थानी ठेवले. शरीफ यांनी मात्र, याला व्यापक स्वरूप दिले. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अधिक आशावादी होत्या. नवाझ यांनी शांततेचे गीत पुन्हा एकदा गायले आहे. मोदींसारख्या कट्टर नेत्याने अशाप्रकारे उचललेली पावले नक्कीच आश्‍चर्यकारक आहेत, असे या लेखात म्हटले आहे. मोदी यांना खरेच पाकिस्तानशी स्थिर संबंध हवे आहेत का, असा प्रश्‍नही डॉन ने उपस्थित केला आहे. मोदी यांनी शरीफ यांना निमंत्रित करून हुशारीने जागतिक पातळीवर आपली प्रतिमा चांगली बनविली आहे. मात्र यातून प्रत्यक्षात हाती काहीच आलेले नाही. सार्क नेत्यांना निमंत्रित करणे, बैठकीतील तपशील माध्यमांना फोडणे यातून मोदी यांना शांततापूर्ण नव्हे तर आक्रमक तोडगा हवा असल्याचे दिसते, असे वृत्तपत्राने म्हटले आहे. पाकिस्तानात अशा प्रकारे सावध प्रतिक्रीया व्यक्त होत असताना अमेरिकेने या घटनेचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातील भेटीबद्दल अमेरिकेने समाधान व्यक्त केले असून, दोन्ही देशांतील संबंधांत सुधारणा होण्याबाबत काही प्रमाणात आशावादी आहे, असे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सांगण्यानुसार, मोदी आणि शरीफ यांच्या भेटीकडे आम्ही काही प्रमाणात आशावादी दृष्टिकोनातून पाहत असून, ही सुरवात सकारात्मक आहे. पुढील वाटचालीसाठी ही सुरवात महत्त्वाची असून, ती चांगली झाली आहे. शरीफ यांनी भारताचे निमंत्रण स्वीकारल्याने अनेक वर्षांनंतर ही भेट प्रत्यक्षात आली आहे. भारतीय जनता पक्ष या आधी सत्तेत असताना दोन्ही देशांतील संबंधांत लक्षणीय सुधारणा झाली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील शांतता चर्चा आणि दिल्ली- लाहोर बसच्या उपक्रमाचा संदर्भ या अधिकार्‍याने दिला. अमेरिकेच्या या स्वागतामुळे मोदींचे हे एक स्वागतार्ह पाऊल असे वर्णन होत असले तरीही पाकिस्तानात सावध वातावरण आहे त्यामुळे भविष्यात काय होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel