-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २९ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
गावस्करांची नवी इनिंग
----------------------------
बी.सी.सी.आय.चे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायलयाने पुन्हा एकदा जबरदस्त चपराक दिली आहे. आय.पी.एल.मधील बेटींग व स्पॉटफिक्सींगचे प्रकरण जोपर्यंत कोर्टात आहे तोपर्यंत श्रीनिवासन व चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स या संघांना निलंबित करा, असा थेट आदेश काढून भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांना हंगामी अध्यक्ष करावे असे सुचविल्याने आता सुनिल गावस्कर यांची बी.सी.सी.आय.चे हंगामी अध्यक्ष म्हणून नवीन इनिंग सुरु होणार आहे. याचा परिणाम म्हणून कदाचित यावेळचा सातवा क्रिकेटचा मोसम रद्द होण्याची शक्यता आहे. कदाचित आय.पी.एल. झाले तरी मर्यादीत होईल. गतवर्षी मानगुटीवर बसलेल्या आयपीएल मॅच फिक्सिंगच्या भुताने बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा अजूनही पुरता पिच्छा पुरवला आहे. मात्र, जावयाच्या कर्तृत्वामुळे अडचणीत आलेले सासरेबुवा फारच खमके निघाले. बीसीसीआयमधील आप्तस्वकीयांनी राजीनामासत्र सुरू केल्यानंतरही ते त्या दबावाला बळी पडले नाहीत. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंच्या निकालनिश्चितीतील सहभागाची चौकशी सुरू असताना त्यांनी अध्यक्षपदाची खुर्ची सोडली. सकृतदर्शनी त्या वेळी तसे दिसत असले तरीही त्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतरही पाठीमागून सारी सूत्रे श्रीनिवासन हेच हलवत होते, हे नंतर स्पष्ट झाले. न्यायालयाच्या नजरेसमोरच त्यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयचे अध्यक्षपद बहुमताने मिळवले. त्यानंतर सारे काही आलबेल आहे, असे वाटत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने न्या. मुदगल समितीला आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे अधिकार दिले. या मुदगल चौकशी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने पाहिला आणि श्रीनिवासन यांनी आतापर्यंत बीसीसीआय अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी का केली नाही, असा सवाल केला. अशा प्रश्नांना घाबरून पद सोडले असते तर ते श्रीनिवासन कसले? श्रीनिवासन यांनी आजही आपला जुनाच राग पुन्हा एकदा आळवला. मी काहीही गैर केले नाही, मला बीसीसीआयवरून कुणीही हुसकावून लावू शकत नाही, असे विधान त्यांनी बुधवारी केल्याचे म्हटले जाते. क्रीडा क्षेत्र मक्तेदारी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचे प्रचंड वारे सध्या भारतात वाहत आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गुन्हेगारीबाबत तक्रार असलेल्यांना भारतीय ऑलिम्पिक संघात स्थान नको, असे सांगून जवळजवळ वर्षभराच्या कालावधीसाठी आपल्या राष्ट्रीय संघटनेला बडतर्फ केले होते. आयओसीला संलग्न असलेले दोनशेहून अधिक देश भारतासाठी लागू करण्यात आलेले नियम, निकष, आचारसंहिता किती मानतात किंवा पाळतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत संघटना असणार्‍या बीसीसीआयचीही कोंडी करण्याची संधी देशातील आणि देशाबाहेरची अनेक मंडळी करत आहेत. आयसीसीला अलीकडेच बिग थ्रीफ ही नवी संकल्पना देणार्‍या आणि पर्यायाने अन्य सदस्यांनाही आर्थिक अनुदानात भरघोस वाढ करून देण्याची योजना मांडणार्‍या श्रीनिवासन यांना खिंडीत गाठण्याची संधी अनेक जण शोधत आहेत. जावयाचा क्रिकेट सट्टेबाजी आणि निकालनिश्चितीमधील संबंध जेव्हा न्या. मुदगल समितीच्या अहवालाद्वारे अधिक दृढ झाला, त्या वेळी न्यायालयालाही उद्वेगाने मत व्यक्त करावे लागले की, एवढे होऊनही श्रीनिवासन अध्यक्षपदाच्या खुर्चीला चिकटून कसे राहू शकतात? नैतिकता हे प्रमाण मानून श्रीनिवासन अध्यक्षपद सोडण्यास तयार नाहीत. त्यांना स्वत:च्या आयसीसीमधील भविष्याची काळजी वाटत आहे. स्वत:च्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे अस्तित्व त्यांना टिकवायचे आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडेच स्पष्टीकरण मागितलेे. चौकशीनंतर त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसायचे आहे. त्याच शिडीचा वापर करून ते आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेला अनेकांनी सुरुंग लावले आहेत. न्यायालयाने जावई मयप्पन यांना दोषी ठरवल्यास किंवा चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडू व संघातील काही खेळाडूंबाबतचे कथित आरोप खरे ठरल्यास भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. फक्त एक गोष्ट स्पष्ट व्हायला हवी की, श्रीनिवासन यांच्या हकालपट्टीमुळे भारतीय क्रिकेट साफ आणि स्वच्छ होणार आहे काय? अनेक भ्रष्टाचारी खेळाडू, अन्य पदाधिकारी जे अजूनही मोकाट फिरताहेत, त्यांना चौकशीच्या जाळ्यात कोण अडकवणार? भारतातील अन्य खेळांच्या संघटनांप्रमाणे क्रिकेट संघटनेतही प्रत्यक्ष हा खेळ खेळणार्‌यांना कमी स्थान व प्रतिनिधित्व दिले जाते. प्रशासन व्यवस्थेत उत्तम काम करणारे ब्रिजेश पटेल, अंशुमन गायकवाड, संजय जगदाळे, रणजित बिस्वाल यांच्यासारखे माजी खेळाडू आहेत. शशांक मनोहर यांच्यासारखे कर्मठ क्रिकेट प्रशासकही होते. केवळ श्रीनिवासन यांची गच्छंती करून भारतीय क्रिकेट स्वच्छ होणार नाही, तर अशा खेळाडू व प्रशासकांना संघटनेवर स्थान दिले गेले पाहिजे. आज तरी श्रीनिवासन यांनी भारतीय न्यायव्यवस्थेविरुद्ध दंड थोपटले. परंतु न्यायालयाच्या निकालानंतर सुनिल गावस्कर हे हंगामी अध्यक्ष अंतिम निकाल लागेपर्यंत असतील. न्यायालयाचा निकाल कधी लागेल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे सुनिल गावस्कर हे हंगामी असले तरीही त्यांना पूर्ण वेळ काम करावे लागेल.त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांना मास्तरासारखी हातात काठी घेऊन खेळाडूंना तसेच एकूणच संघटनेला शिस्त लावण्याची जबाबदारी आहे. हे काम सोपे नाही. सुनिल गावस्कर हे नेहमी भारतीय संघासाठी ओपनिंग बॅटस्‌मन होते. आता त्यांना श्रीनिवासन यांनी केलेल्या बॅटिंगनंतर दुसर्‍या फळीत खेळावयाचे आहे. त्यांची ही नवीन इनिंग सोपी नाही. अर्थात गावस्कर ही फलंदाजी चांगली करतील अशी अपेक्षा करुया. त्यासाठी त्यांना शुभेच्छा.
----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel