-->
संपादकीय पान मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
मारुती ८०० अखेर इतिहासजमा
----------------------------
एकेकाळी मध्यमवर्गीयांचे आपल्या दारी वाहन असण्याचे स्वप्न पूर्ण करणारी मारुतीचे ८०० हे मॉडेल आता इतिहासजमा झाले आहे. दोन वर्षापूर्वी मारुतीने हे मॉडेल शहरातून बाद केले होते आणि आता हे मॉडेलचे उत्पादनच बंद केले आहे. मारुती ८००च्या पाठीमागे मोठा इतिहास आहे. इंदीरा गांधी यांचे पुत्र संजय गांधींनी सत्तरच्या दशकात जेव्हा भारतात मध्यमवर्गीयांसाठी कार निर्मितीचे स्वप्न पाहिले, तेव्हा तो कुचेष्टेचा विषय होता. त्यांचा हा प्रकल्प सरकारसाठी पांढरा हत्ती ठरेल असेच भाकीत अनेकांनी वर्तवले होते. त्यावेळी मारुती मोटार्स ही भारत सरकार व जपानच्या सुझुकीचा संयुक्त प्रकल्प होता. मारुती ८०० हे मॉडेल ३० वर्षांपूर्वी बाजारात आलेे त्या वेळेस सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला परवडेल अशा किमतीत ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्या वेळेस मारुती ८०० ची किंमत होती ५५,००० रुपये. भारतात त्या काळी फक्त हिंदुस्थान मोटर्सच्या ऍम्बेसेडर आणि प्रीमियर पद्मिनीचे उत्पादन होत असे. भारतात जागतिक दर्जाच्या कारची निर्मिती होऊ शकते या बाबतीत वाहन उद्योगातील अनेक जागतिक कंपन्यांना खात्री वाटत नव्हती. त्यामुळेच हा प्रकल्प तब्बल एक दशक रखडला. प्रकल्पाला सरकारने दिलेल्या भांडवल आणि कर सवलतींमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. संजय गांधींमुळेच हा प्रकल्प प्रचंड अडचणीत सापडूनही गुंडाळण्यात आला नाही आणि त्यांच्या विमान अपघातातील आकस्मिक मृत्यूनंतरही सरकारने त्याला पाठबळ पुरवण्यात कसर ठेवली नाही, तरी मारुतीच्या जन्माचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.
संजय गांधींनी कधीकाळी रोल्स रॉइसमध्ये उमेदवारी केली होती. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये त्यांना प्रचंड रस होता. संजय गांधींना वाहन निर्मिती प्रकल्पात प्रचंड रस असल्याने सरकारने त्यांना त्यासाठी लागणारा परवाना, जमीन, कर सवलती अशा सर्व प्रकारचे पाठबळ देऊ केले; पण दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्याच वेळी भारतात जागतिक दर्जाची कारनिर्मिती होऊ शकत नाही याविषयी फोक्सवॅगन, फियाट आणि टोयोटा या बलाढ्य कंपन्यांना खात्री होती आणि त्यामुळे त्यांनी या प्रकल्पात फार स्वारस्य दाखवले नाही. त्या काळी तुलनेने लहान असलेल्या सुझुकीने मारुतीला तंत्रज्ञानाचे साहाय्य देऊ केले आणि नंतरच्या तीन दशकात भारतीय वाहन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचा चमत्कार मारुतीने करून दाखवला. मारुती ८०० हे मॉडेल लॉंच झाल्यानंतरच्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत कार विक्रीत दुपटीने वाढ झाली. मारुती८००चे मालक असणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई आणि पंजाबात तर मारुती मॅरेज म्हणजेच विवाह निश्चित करताना मारुती हुंड्याचा अविभाज्य घटक बनला. एका अर्थाने भारतातील वाहन उद्योगाला मारुतीने जन्माला घातले असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरू नये. सुझुकीमुळे भारतात जपानी तंत्रज्ञानच नव्हे, तर त्यांच्या कामाची संस्कृतीही रुजली आणि त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन पद्धतीच्या अवलंबामुळे कार्यक्षमतेचा जणू वस्तुपाठच भारतीयांना मिळाला. मारुतीच्या प्रवेशामुळे भारतीय वाहन उद्योगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला. मारुतीचा प्रवेश व त्याच दरम्यान पुढील दशकात आपल्याकडे मध्यमवर्गीयांचा उदय या घटना एकाच क्रमाने झाल्याने देशातील वाहन उद्योग खर्‍या अर्थाने भरभराटीस आला. असे हे इतिहासाचे साक्षीदार असलेले मारुती ८०० हे मॉडेल आता काळाच्या ओघात संपुष्टात आले आहे. परंतु आजही हे मॉडेल आपल्या दरी मोठ्या अभिमानाने ठेवणारी एक पिढी आहे. वाहन उद्योगाच्या इतिहास मारुती ८००चे पान सुवर्णाक्षरात लिहिले जाईल यात काहीच शंका नाही.
-----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel