-->
संपादकीय पान मंगळवार दि. २८ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
----------------------------------------
यथोचित सन्मान
------------------------------------------
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सरकारने १२७ जणांना पद्म पुरस्कारने सन्मानित करुन त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव केला आहे. गेली काही वर्षे पद्म पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यातील नावांवरुन वादळ उठते आणि सरकारच्या नकर्तेपणाचे दर्शन यातून घडते. यंदा मात्र जाहीर झालेली नावे पाहता असे वादळ उठण्याची शक्यता नाही. सरकारने यंदा तसा वाद उत्पन्न होऊ नये यासाठी खबरदारी घेतलेली दिसते. यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारार्थींच्या यादीत ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार ही दोनच नावे असून, दोघेही महाराष्ट्रातील आहेत. प्रसिद्ध गझल गायिका परवीन सुलताना, अभिनेते कमल हसन, न्यायमूर्ती दलबीर भंडारी, प्रा. ज्येष्ठराज जोशी (विज्ञान तंत्रज्ञान), इंग्रजी साहित्यावर आपल्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीने ठसा उमटविणारे साहित्यिक रस्कीन बॉंड, बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद, टेनिसपटू लिएंडर पेस, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्यात कठोर बदल सुचविणार्‍या समितीचे अध्यक्ष राहिलेले न्यायमूर्ती जे. एस. वर्मा (मरणोत्तर), हिंदी कवी अशोक चक्रधर यांच्यासह २५ जणांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. श्रीमती नयना आपटे, तबलावादक विजय घाटे, राम मोहन (ऍनिमेशन), सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार (व्यापार आणि उद्योग), चित्रपट अभिनेते परेश रावल, विद्या बालन, श्रीमती सूनी तारापोरवाला (कला), दुर्गा जैन (सामाजिक कार्य), विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील शेखर बासू, डॉ. रवीभूषण ग्रोवर, रामकृष्ण व्ही. होसूर, डॉ. रमाकांत कृष्णाजी देशपांडे, डॉ. शशांक आर. जोशी, डॉ. मिलिंद वसंत कीर्तने (वैद्यकीय) यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. क्रिकेटपटू युवराजसिंग, महिला स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकल, महिला क्रिकेटपटू अंजूम चोप्रा, कबड्डीपटू सुनील डबास, गिर्यारोहक लवराज धर्मशक्त, ममता सोधा, व्हीलचेअर टेनिसपटू बोनीफेस प्रभू यांचाही पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या यादीत समावेश आहे. यंदा पद्म पुरस्कार मिळणार्‍यात अंधश्रध्दा विरोधी लढणारे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांना मरणोत्तर पद्मश्री, विज्ञान व तंत्रज्ञानातील देशाच्या धोरणांना आकार देणारे जागतिक किर्तिचे संशोधक रघुनाथ माशेलकर यांचा पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी गेली दोन दशके आपला लढा अंधंश्रध्दा संपविण्यासाठी उभारला होता. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात या लढ्याच्या बाजूने उभे राहाणार्‍या कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली होती. अंधंश्रध्दा निर्मूलन करण्यासाठी कायद्याचे पाठबळ आवश्यक असल्याचे त्यांना यातून मनोमन पटले होते. त्यामुळे त्यांनी गेली १७ वर्षे सरकार दरबारी हा कायदा करण्यासाठी फेर्‍या घातल्या, त्यासाठी रस्त्यावर उतरुन लढे उभारले होते. परंतु त्यांच्या लढ्याला काही यश येत नव्हेत. या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात येण्यासाठी त्यांना तब्बल १७ वर्षे झुंजावे लागले आणि त्याहूनही दाभोळकरांचा बळी गेल्यावर सरकारला त्या दबावाखाली हे विधेयक संमंत करावे लागले हे महाराष्ट्राचे मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. आज दाभोळकरांची हत्या होऊन पाच महिने लोटले असतानाही त्यांचे हत्यारे सापडले नसताना सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मश्री बहाल केली आहे. खरे तर दाभोलकर यांचे सामाजिक कार्य एवढे मोठे होते की, त्यांना यापूर्वीच सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित करावयास हवे होते. मात्र त्यांच्या अंधंश्रध्दा विरोधी आंदोलनाला मागच्या दाराने विरोध करण्याचे काम हे नेहमीच राज्यकर्त्यांनी केले आहे. आता देखील त्यांचे मारेकरी सापडत नसताना त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कर दिला जात आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या जागतिक पातळीवरील नामवंत शास्त्रज्ञाला सरकारने पद्मविभूषणाने सन्मानित करुन त्यांच्या कार्याचा खर्‍या अर्थाने गौरव केला आहे. गोव्यात जन्मलेल्या डॉ. माशेलकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. रसायनशास्त्रातील एक जागतिक व्यक्तीमत्व म्हणून आळखले गेलेले माशेलकर हे विविध जागतिक शास्त्रिय संस्थांशी निगडीत आहेत. पंतप्रधानांचे विज्ञान विषयक धोरणाचे एक सल्लागार म्हणून त्यांनी देशाचे तंत्रज्ञान व विज्ञान विषयक धोरण आखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक जागतिक पातळीवरील विज्ञानविषयक संस्थांशी ते निगडीत आहेत. हळदीच्या पेटंट विषयी त्यांनी दिलेला लढा सर्वांना ज्ञात आहेच. डॉ. शशांक जोशी या गुणवान डॉक्टरास यावेळी पद्म पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय परिक्षेपर्यंत नेहमीच गोल्ड मेडल पटकाविणे डॉ. जोशी हे मधूमेह या झपाट्याने वाढत जाणार्‍या रोगावरील निष्णात डॉक्टर म्हणून जगात ओळखले जातात. त्यांनी आजवर सादर केलेले ४०० हून वैद्यकीय निबंध जगातील डॉक्टरांचा अभ्यासाचा विषय ठरले आहेत. सिनेकलाकारंमध्ये कमल हसन, परेश रावल व विद्या बालन या दोन्ही गुणी कलाकारांना यावेळी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सरकारने पद्म पुरस्कारांची निवड करताना सर्वमान्य होतील अशीच नावे निवडणे पसंत केले आहे. नेहमीच पद्म पुरस्कारंची नावे ही विविध क्षेत्रात काम करणार्‍या नामवंताची, पक्षीय राजकारण सोडून असली पाहिजेत. गेल्या काही वर्षात या पुरस्कारांनाही राजकीय वास येऊ लागला होता हे मोठे दुदैव होते.
--------------------------------



0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel