-->
संपादकीय पान मंगळवार दि. २८ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
कृषीवलच्या वेबसाईटचे मारेकरी कोण?
----------------------------------
दैनिक कृषीवलची वेबसाईट गेल्या शुक्रवारी हॅक करण्यात आली. आम्हाला आमच्या वाचकांचे शेकडो फोन याबाबत मोठ्या उत्सुकता व आस्थेने चौकशी करण्यासाठी येत आहेत. अशा प्रकारे कृषीवलची वेबसाईट यापूर्वीही तीन वर्षांपूर्वी हॅक करण्यात आली होती. आता अलिबागमधील सायबर सेलला अधिकृत तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी आपली चौकशी सुरु केली आहे. परंतु ही वेबसाईट पुन्हा २४ तासात आम्ही वाचकांच्या सेवेसाठी हजर केली आहे. अलीकडेच म्हणजे जेमतेम दीड महिन्यांपूर्वी या वेबसाईटवर ई-पेजेस सुरु करण्यात आली होती. याला जगातून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला होता. जगाच्या कानाकोपर्‍यातून या ई-पेजेसचे स्वागत करणारे ईमेल आम्हाला येत होते. जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही असलात तरी ई-पेजेसमुळे कृषीवलचा अंक वाचल्याचा आनंद वाचकांना मिळत होता. एवढ्याश्या अल्प काळात या वेबसाईटला सुमारे साडे तीन लाख लोकांनी व्हिजीट केली होती. त्यावरुन कृषीवलचा वाचक, प्रामुख्याने कृषीवल सातत्याने मांडीत असलेल्या विचाराला मानणारा वाचक जगभरात कसा पसरला आहे त्याचा अंदाज यावरुन येतो. जगात कृषीवल जो विचार व बातम्या पोहोचवित आहे त्या पोहचू नयेत असे वाटणारे हे कृषीवलच्या वेबसाईटचे खरे मारेकरी आहेत. असे हे मारेकरी आहेत तरी कोण? कृषीवलच्या अंकाचे वितरण रायगड जिल्ह्यात व रत्नागिरी, नवीमुंबई व काही ठिकाणी मुंबईत करण्यात येते. परंतु वेबसाईट ही जगात पोहोचते. त्यामुळे वेबसाईट हॅक करुन कृषीवलच्या विचारांची मुसकटदाबी करण्याचा केलेला प्रयत्न आहे. कृषीवलचे आपल्या स्थापनेपासून गेल्या ७७ वर्षात चळवळीचे एक हत्यार म्हणून जनमानसात आपले स्थान मिळविले आहे. व्यवस्थापनाने कृषीवलकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिले नाही. जनसामान्यांचे एक व्यासपीठ म्हणून जिल्ह्यात कृषीवलने आपले नाव मिळविले ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्यामुळेच. महाराष्ट्रात डावा पुरोगामी विचार रुजावा, सर्वधर्मसमभाव साधून या देशाला एकसंघ कसे ठेवता येईल याचा विचार कृषीवलने नेहमीच वाचकांपुढे मांडला. त्याचबरोबर सध्याच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांवर सतत कोरडे ओढून या राज्यव्यवस्थेला स्वच्छ ठेवण्याचे काम आम्ही केले आहे. याच भ्रष्ट शक्तींना आम्ही उघडे केल्याने त्यांनी कृषीवलच्या वेबसाईटची मुस्कटदाबी केल्याच आमचा संशय आहे. जगात अनेक साईट या हॅक केल्या जातात. अनेकदा कुणाच्या तरी आनलाईन खात्यातून अचानक मोठ्या रकमा गायब करण्याचे काम सायबर गुन्हेगार मोठ्या शिताफिने करतात. अलीकडेच दिल्लीत अशाच अमित तिवारी या सायबर गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. अर्थात हे आर्थिक गुन्हेगार झाले. परंतु वृत्तपत्राच्या बाबतीत आर्थिक गुन्हा करण्याचा काहीच प्रश्न येत नसल्याने कृषीवलच्या वेबसाईटचे मारेकरी हे आमच्या राजकीय विचाराला विरोध करणारेच आहेत, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही. शुक्रवारच्या अंकात आम्ही रायगडच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात आठ कॉलम बातमी प्रसिध्द केली आहे. ही बातमी प्रसिध्द करण्याचे धाडस कोणत्याताही वृत्तपत्राने केलेले नाही. नेमका हाच अंक वेबसाईटवर प्रकाशित झाला आणि काही तासातच ही संपूर्ण वेबसाईट हॅक व्हावी हा निव्वळ योगायोग समजावा का? त्यामुळेच आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आमच्या विचारांची मुस्कटदाबी करण्यसाठीच ही वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. अर्थात यानंतर कृषीवलचे व्यवस्थापन व आमचे संपादकीय सहकारी यामुळे अधिक जोमाने कामाला लागलो आहोत. पुन्हा नव्याने लवकरच ही वेबसाईट सुरु करण्यात येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पुन्हा पोहोचण्याचा प्रयत्न करु. आमच्या विचारांची जी मुस्कटदाबी चालविली आहे त्याला सर्वोतोपरी विरोध करु व वाचकांनापर्यंत वास्तव पोहोचविण्यात कधीही मागे राहाणार नाही. विचारांचा मुकाबला विचारानेच करावयाचा असतो. अशा प्रकारे मुस्कटदाबी करुन कृषीवल मागे हटणार नाही हे हॅकर्सनी लक्षात घ्यावे.
------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel