-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २४ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
एक्स्प्रेस हायवे मृत्यूचा सापळा का झाला? 
---------------------------
देशाची शान असलेला व अशा प्रकारचा पहिल्यांदाच उभारण्यात आलेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला आहे. खरे तर हा महामार्ग म्हणजे देशापुढचा विकासाचा एक आदर्श महामार्ग ठरला पाहिजे होता. त्यानंतर आता झालेला आग्रा-दिल्ली महामार्ग हा अलीकडेच कार्यान्वित झालेला असला तरी देशातील पहिला महामार्ग म्हणून याच मार्गाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. मात्र हा महामार्ग एक मृत्यूचा सापळा ठरल्याचे गेल्या वर्षातल्या आकडेवारीवरुन स्पष्ट दिसते. ऑक्टोबर २०१२ ते ऑक्टोबर २०१३ या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर २१४ अपघात झाले. यात ७२ जणांना आपले जीव गमवावे लागले तर १४० जण गंभीर जखमी झाले. या रस्त्यावर वेग मर्यादा ही ८० ठरविण्यात आली आहे. परंतु ही मर्यादा सहसा कुणी पाळत नाही आणि हेच बहुतांशी अपघातामागचे मुख्य कारण आहे. मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावरील घाटाचा भाग व कामशेत येथील भाग हे जास्त अपघातप्रवण आहेत. वरील २१४ अपघातापैकी पुण्याच्या दिशेने ११३ अपघात व मुंबईच्या दिशेने १०१ अपघातांची नोंद झाली. या रस्त्यावरील या अपघातांना खरोखरीच जबाबदार कोण? केवळ वेग मर्यादा ओलांडल्यानेच हे अपघात होतात का? सरकारने याचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातील जे.पी. रिसर्च ग्रुप व राज्य वाहतूक पोलीसांनी यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने या रस्त्यावर झालेल्या प्रत्येक अपघाताचे विश्‍लेषण करुन एक अहवाल तयार केला आहे. मानवीचुका, वाहानातील दोष, पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, झालेल्या अपघातांपैकी ५७ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाले आहेत. यात चालकाला झोप लागणे हे एक महत्वाचे कारण ठरले आहे. अनावश्यक वेग गाठणे, लेन बदलताना खबरदारी न घेणे यामुळे अपघात अनेकदा होतात. आपल्याकडे वाहानाच्या वेगावर कितीही मर्यादा आणल्या तरी चालकांना वेगात वाहन चालविण्याची जी नशा असते तीच मोठी घातक ठरते. त्यातूनच जास्त अपघात होतात. नियमांचे पालन न करण्यात धन्यता मानने हे एक मोठे कारण ठरावे. तसेच मावळच्यापुढील रस्त्यावर सत्ताधारी पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांनी घातलेला धुमाकूळ ही एक आणखी चिंतेची बाब आहे. एक्स्प्रेस मार्गावर गुरे चरावयास सोडणे, अचानक लेन बदलणे, तरुणांनी गतीचे लागलेले वेड ही अनेक कारणे या अपघातामागची आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या पंधरा वर्षात अनेक अपघात झाले, मात्र गेल्या वर्षातील अनेक अपघाताने सर्वांचीच झोप उडविली. पर्यायाने या रस्त्याचा झालेला हा मृत्यूचा सापळा थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची सर्वांनाच गरज वाटू लागली. परंतु याबाबतीत सर्वात महत्वाची सावधानगिरी ही चालकानेच बाळगली पाहिजे. कारण मुख्य ज्याच्या हातात व्हिल असते तोच अनेक बाबी करु शकतो, अनेक मोह टाळू शकतो. गेल्या काही वर्षात या रस्त्यावर अनेकदा वाहानांचे टायर फुटल्यामुळे अपघात होत होते. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे हा रस्ता सीमेंटचा आहे आणि टायर ठरावीक गतीच्या नंतर घासले जाऊन त्याच स्फोट होतो. अनेक अपघात हे अशा प्रकारे होतात. यासाठी चालकाना व त्याच्या बाजूला बसणार्‍याने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे त्याचबरोबर वाहानाची गती ही ८०च्या पुढे जाता कामा नये अशी खबरदारी बाळगल्यास या महामार्गावरील दुदैवी घटना घडणार नाहीत.
-----------------------------------------------------
   

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel