-->
संपादकीय पान शुक्रवार दि. १० जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
महायुतीतील चौथा खेळाडू
---------------------------
भाजपा-शिवसेना-आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष यांच्या महायुतीत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्षाने आता चौथा खेळाडू म्हणून प्रवेश केला आहे. खासदार राजू शेट्टी हे पुरोगामी गप्पा करीत असताना अचानकपणे युतीच्या कळपात जाऊन बसले याचे अनेकांना आश्‍चर्य वाटेलही. पंरतु त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण राजकारणात सर्व काही चालते असे समजणार्‍या पक्षांमध्ये राजू शेट्टी यांचा समावेश होतो. गेल्या वेळी त्यांनी तिसर्‍या आघाडीची साथ धरली होती आणि गरज पडेल तिकडे कॉँग्रेस उमेदवारांचा प्रचारही केला होता. त्यामुळे राजू शेट्टी हे काही मोठे तत्वज्ञान घेऊन चालणार्‍यातले नाहीत हे स्पष्टच झाले होते. अगदी अलीकडेपर्यंत भाजपा-शिवसेना ही जातीयवादी शक्ती असून त्यांच्या बरोबर जाणार नाही असे ठामपणे म्हणणारे राजू शेट्टी हे त्यांच्याच गाळाला लागले. अर्थात राजू शेट्टी यांच्या महायुतीत जाण्याने राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. कारण केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए.चे सरकार असताना त्याकाळी शेतकरी संघटनेचेे नेते शरद जोशी यांनी या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला राजू शेट्टी व त्यांच्या सहकार्‍यांनी कडाडून विरोध केला आणि आपल्या नेत्याशी फारकत घेतली. यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली होती. एकेकाळी आपल्या गुरुच्या धोरणाला विरोध करणारे खासदार राजूभाई आता त्यांच्याच मार्गाने जात आहेत. त्यामुळेच एक वर्तुळ पूर्ण झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या गुरुशी फारकत घेतल्यावर राजू शेट्टी यांनी आपल्यावर पुरोगामी शिक्का बसावा यासाठी शेना-भाजपावर शरसंधान साधले होते. ऐवढेच कशाला शिवार ते संसद या आत्मकथन असलेल्या पुस्तकात आपले पुरोगामित्व सिध्द करण्यासाठी त्यांनी शरद जोशींबरोबर झालेला संघर्ष चांगलाच रंगविला आहे. या संघर्षातून ळरद जोशींसारख्या आपल्या एकेकाळच्या नेत्याची साथ सोडताना झालेले दुखही वर्णन केले आहे. एकेकाळी शरद जोशी सेना-भाजपाच्या विरोधात असताना त्यांना जातियवादी गिधाडे असे म्हणाले होते. त्यावर राजू शेट्टी यांनी त्यांना या गिधाडांचे राजहंस कधी झाले असा सवाल शरद जोशींना केला होता. आता हाच सवाल त्यांच्याबाबतीत उपस्थित झाला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी रुजलेली असताना जातियवादी शक्तींना थारा मिळणार नाही असे नमूद करणारे राजू शेट्टी आता मात्र याच जातियवादी शक्तींशी हातमिळवणी करीत आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर लढणारी आणि राजकीय सत्ता, व्यवहार यांना दुय्यम स्थान देणारी एक खरीखुरी शेतकर्‍यांची संघटना म्हणून त्याकडे पाहिले जात होते. परंतु आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपली खासदारकी कायम राहावी या हेतूनेच त्यांनी ही युती केली आहे. परंतु त्यांचा या प्रयोग यशस्वी होईला का असा सवाल आहे. कारण युतीतच बेबनाव आहे, अनेक ठिकाणी युतीत दुही असल्याचे स्पष्ट दिसत असताना राजू शेट्टी यांचा हा प्रयोग यशस्वी होणार का, हा सनाव आहे. एकेकाळी शरद जोशी यांनी देखील शेतकर्‍यांच्या आर्थिक हितासाठी लढण्याचा वसा घेतला होता. आम्ही मते मागायला आलो तर जोड्याने हाणा असे त्याकाळी शरद जोशी सांगत. आणि शेतकर्‍यांनी काळाच्या ओघात खरोखरीच जोशींना जोडे हाणले. आज शरद जोशी कुठे आहेत असे शोधावे लागते. राजू शेट्टी देखील आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकून संपवून घेण्याच्या मार्गाला लागले आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. महायुतीत शिवसेना-भाजपा हे सुरुवातीपासूनचे साथीदार असले तरी त्यांच्यात अनेकदा सुसंवाद राहिलेला नाही. अलीकडेच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुंबईत जाहीर सभा घेण्यासाठी आले होते, परंतु त्यांनी शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यांना बोलाविले नव्हते. ही सल सेना नेत्यांच्या मनात लागून राहिली आहे. भाजपाला शिवसेना हा नाकापेक्षा मोती जड असा नेहमीच वाटत आला आहे. परंतु आपल्या जागा वाढविण्यासाठी सेनेची गरज लागते हे वास्तव स्वीकारुन अनेक भाजपा नेते आपला राग गिळून बसतात. बाळासाहेब ठाकरे असताना देखील ते अनेकदा भाजपाचा पाणउतार करताना मागे पुढे पहात नसते. त्यानंतर या युतीत आलेले रामदास आठवले हे आलेल्या दिवसापासून अस्वस्थ आहेत. त्यांना नेहमीच खासदारकीचे गाजर दाखविले जाते परंतु ते गाजर काही खायला मिळत नाही, याचे दुख आहे. राज्यसभेसाठी नेहमी जप करुनही युती काही त्यांच्यावर प्रसन्न होत नाही. त्यामुळे रामदास आठवले यांच्यासह सर्व त्यांचे रिपब्लिकन समर्थक अस्वस्थ आहेत. शरद पवारांची साथ सोडून आपण जातियवादी सेना-भाजपाबरोबर आलो परंतु काय मिळविले याचा ते सतत हिशेब मांडतात आणि त्यांच्या हाती काहीच लागत नाही. अशा या तिघाही अस्वस्थ पक्षांच्या महायुतीत चौथा भिडू म्हणून राजू शेट्टी आले आहेत. यावेळी कॉँग्रेस-राष्टवादी बरोबर जाणे म्हणजे लोकांचा रोष ओढून घेणे हे उघडपणे दिसत असताना राजू शेट्टी यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. मात्र शेतकरी हे दुधखुळे नाहीत, राजूभाईंच्या या राजकीय कोलांड्या ते चांगलेच जाणतात, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel