-->
संपादकीय पान शनिवार दि. २५ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
चलनी नोटा: एकाच दगडात दोन पक्षी मारले
------------------------------
रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वीच्या चलनातील सर्व नोटा बाद करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारले जाणार आहेत. या निर्णयामुळे चलनातील बनावट नोटा बाद करण्यास जसा उपयोग होणार आहे तसेच साठवून ठेवलेला काळा पैसाही या निमित्ताने बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे, त्यामुळे या निर्णयाचे स्वागत व्हावे. १ एप्रिल २०१४ पासून म्हणजे येत्या आर्थिक वर्षापासून २००५ सालापूर्वीच्या सर्व नोटा बाद करण्यात येणार असून ज्यांच्याकडे अशा नोटा असतील त्यांना बँकेकडून बदलून घेण्याची संधी देण्यात येणार आहे. अर्थातच ज्यांच्याकडे काळा पैसा आहे ते लोक बँकेत जाऊन आपल्या नोटा बदलू शकणार नाहीत. त्यामुळे तेवढा काळा पैसा आपोआप चलनातून बाद होईल. १ एप्रिल ते ३० जून या काळात या नोटा कोणत्याही बँकेतून बदलून दिल्या जाणार आहेत. ५०० किंवा एक हजाराच्या दहा पेक्षा जास्त नोटा बदलावयाच्या असल्यास संबंधिताला आपले ओळखपत्र व निवासी पत्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे. आपल्याकडे आता लोकसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्यात येऊ घातल्या आहेत. अशा वेळी काळा पैसा मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. हे निमित्त साधून रिझर्व्ह बँकेने चलनातून नोटा बाद करण्याचे ठरविले आहे. सध्या आपल्याकडे ५०० रुपयांच्या लाखो बनावट नोटा बाजारात आहेत. या नोटा प्रामुख्याने पाकिस्तान मार्गे आल्या आहेत, असा कयास आहे. या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या, परंतु त्याला काही यश आले नव्हते. बँकांमध्येही आलेली प्रत्येक ५०० रुपयांची नोट बनावट नाही ना ते तपासले जात होते. आता मात्र रिझर्व्ह बँकेने या नोटाच चलनातून बाद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. आपल्याकडे ज्या कागदी नोटा छापतो त्यांचे सरासरी आयुष्य हे दहा वर्षांचे असते. डिसेंबर २००५ रोजी आपल्याकडे एकूण चलनात चार ट्रिलियनच्या नोटा बाजारात होत्या. आता २०१३ साली ही रक्कम १२ ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. यातील १० ते १५ टक्के नोटा हा बनावट आहेत, अशी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सांगते. चलनात असलेल्या १५ टक्के नोटा बनावट आहेत असे गृहीत धरले तर एक मोठा धोका आपल्या चलन व्यवस्थेला बसू शकतो. या नोटा चलनातून बाहेर आणणे हे एक मोठे आव्हान रिझर्व्ह बँकेपुढे होते. कारण यातील साठविलेल्या काळ्या पैशाच्या नोटात बनावट नोटा किती आहेत व प्रत्यक्षात चलनात किती बनावट नोटा आहेत हे सांगणे कठीण आहे. आता ज्या चलनात नसलेल्या व काळा पैसा म्हणून दडवून ठेवलेल्या नोटा पुन्हा केवळ काळा पैसा म्हणूनच येऊ शकतील. येत्या निवडणुकीच्या निमित्ताने ते शक्य आहे. अन्यछा हा एकदा नोटा बाद झाल्यावर त्यांची किंमत शून्यच होणार आहे. अर्थात या नोटा बाद झाल्या तरी काही ना काही तरी निमित्ताने चलनात असतीलच. आपल्या देशाची ऐवढी मोठी असलेली बाजारपेठ व त्यात ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने या ना त्या कारणाने या नोटा चलनात राहातील. मात्र त्या ज्यावेळी कधीतरी बँकींकच्या कचाट्यात सापडतील त्यावेळी त्या नोटा रद्द होऊ शकतील. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय अत्यंत चागला व देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दुरगामी ठरावा असाच आहे.
------------------------------------  
   

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel