-->
संपादकीय पान--अग्रलेख--०६ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
----------------------------------------
रणशिंग फुंकले
------------------------
शेतकरी कामगार पक्षाने पुढील पंधरवड्यात होणार्‍या रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणशिंग आता फुंकले आहे. गुरुवारी सकाळपासून अलिबाग शहराचे प्रमुख रस्ते भाग्यलक्षी मंगल कार्यालयाच्या दिशेने गर्दीने फुलून गेले होते. सर्वत्र लाल बावट्यामुळे वातावरणात लाल रंग मिसळला होता. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. निमित्त होते शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक. या बैठकीचे वैशिट्य म्हणजे हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने ग्रामपंचायतीसाठी उमेदवारांना जाहीरपणे तिकिट वाटप करण्यात आले. आजवर कोणत्याच पक्षाने अशा प्रकारे तिकिट इच्छुकांना अशा प्रकारे जाहीरपणे तिकिट वाटप केलेले नाही. शेकाप मात्र हे करुन दाखविले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेकाप हा कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेला पक्ष आहे. शेकापला मानणारी कुटुंबे ही तीन-चार पिढ्यांशी बांधलेली आहेत. या कुटुंबांनी व गावागावात पसरलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला. काल सकाळी झालेले नेते हे फक्त टीका करतात. काम काही करीत नाहीत. शेकाप हा केवळ शेतकरी व कामगारांपुरताच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात शेकाप पोहोचला आहे. अल्पसंख्यांक, वकील, डॉक्टर, तरुण अशा प्रत्येक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची फळी पक्षात उभी राहिली आहे. त्यामुळेच पक्षात तिकिट इच्छुकांची मोठी गर्दी असूनही एकमताने तिकिट वाटप करण्यात आले. अन्यथा दुसर्‍या कोणत्याही पक्षात तिकिट वाटप हे शेवटच्या क्षणी केले जाते. यातून पक्षातील बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला जातो. अन्य पक्षात कधी कधी तर बंडखोरी होते आणि तिकिट न मिळालेले नाराज लोक पक्ष कार्यालयातही तोडफोड करतात. यामागचे महत्वाचे कारण असते ते त्या पक्षात जे तिकिट इच्छुक म्हणून येतात ते केवळ त्यासाठीच येतात. त्यांना पक्षाची बांधीलकी, समाजसेवेचे व्रत याबाबत काही देणेघेण नसते. त्यामुळे पक्षाचे तिकिट न मिळाल्यास ते लगेचच नाराज होतात आणि पक्ष सोडतात किंवा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करतात. शेकाप या सर्वांपासून अलिप्त आहे. कारण या पक्षाशी असलेली कार्यकर्त्यांची बांधीलकी ही निवडणुकीपुरती नाही. तर समाजसेवेचे व्रत घेऊन कार्यकर्त्यांची ही लाल फळी पिढ्यान पिढ्या उभी राहिलेली या महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळेच शेकाप हा अशा प्रकारे ग्रामपंचायतीसाठी जाहीरपणे उमेदवारांची नावे जाहीर करु शकला आहे. आज देशाच्या राजकारणातील चित्र जपाट्याने बदलत चालले आहे. केंद्रातील सत्ताधारी कॉँग्रेसची आघाडी पुन्हा सत्तेत येणार नाही हे नक्की झाले आहे. येत्या दोन दिवसांनी पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागल्यावर तेथील कॉँग्रेसचे पानीपत झाल्याचे चित्र आपल्याला दिसेलच. त्यामुळे केंद्रापासून ते अगदी शेवटच्या गावपातळीपर्यंत कॉँग्रेस पक्षाला वाईट दिवस आले आहेत. सध्याची कॉँग्रेस ही नेहरु व गांधींची राहिलेली नाही. कॉँग्रेसचे सर्व राजकारण दलालीचे व सत्तेच्या भोवतीच्या राजकारणाने बरबटलेले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसही सिंचन घोटाळ्यापासून ते साखर कारखान्यांच्या विक्रीपर्यंत अनेक घोटाळ्यात अडकली आहे. अशा या दोन्ही कॉँग्रेसला देशातून हद्दपार करण्यासाठी २०१४ सालची लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. यात मतदार आपला इंगा दाखविणार आहेत. मात्र गावपातळीवरुन राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्याची संधी जिल्ह्यातील पंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आली आहे. पंयाचतींची ही निवडणूक झाल्यावर राज्य विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. तसे पाहता सध्याची पंचायत निवडणूक ही विधानसभेसाठी रंगीत तालीमच ठरेल. तेव्हा मतदारांनो आपल्या लाख मोलाचे हे मत अशा प्रकारे भ्रष्ट लोकांना हद्दपार करण्यासाठी वापरावे. ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण समाजातील तळागाळातील जनतेचे भले करु शकतो. एखाद्या आमदारापेक्षा जास्त महत्व गावच्या सरपंचाला आता आले आहे. कारण आता केंद्र व राज्याच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणावर निधी हा ग्रामपंचायतीकडे थेट येत असतो. या पैशातून जर चांगली विकास कामे करावयाची असतील तर तुम्ही चांगले लोक पंचायतीत निवडून दिले पाहिजेत. शेकापने आजवर अनेक विकास कामे यापूर्वी करुन दाखविली आहेत. याच विश्‍वासाच्या बळावर अनेकांना लोकांनी निवडून दिले आहे व शेकडो ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आता येऊ घातलेल्या निवडणुकीतही शेकापचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर विजयी होतील यात काहीच शंका नाही. कारम शेकापने आजवर जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांवर आपली मोहोर उमटविली आहे. याच अनुभवावर भविष्यात गाव पातळीवर अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. अर्थातच हे करण्यासाठी भ्रष्टाचारापासून मुक्त लोक निवडून गेले पाहिजेत. शेकापने आपला आवाज विधीमंडळात नेहमीच कष्टकर्‍यांच्या बाजूने उठविला आहे व गाव पातळीवर कामे करुन विकासाला हातभार लावला आहे. यातूनच सर्वसामान्यांनी पक्षाला वेळोवेळी पाठबळ दिले आहे. आता पुन्हा एकदा पंचायतीच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. पंचायतीमध्ये शेकापचा लाल बावटा फडकत राहाणार याची सर्वांना खात्रीच आहे. केवळ पंचायतीच नव्हे तर पुढील वर्षात येणार्‍या लोकसभा व राज्य विधानसभा निवडणुकीतही शेकापचे उमेदवारांनी भरघोस मताने विजयी होतील, असे ठामणे विश्‍वास व्यक्त करण्यासाठीच आजचा हा अलिबागचा मेळावा होता. या मेळाव्याने विरोधी पक्षांची पुरती हवा निघून गेली आहे.
-----------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel