-->
संपादकीय पान--चिंतन--८ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------
संपर्क क्रांतीचा तिसरा महत्वाचा टप्पा
-------------------------
दहा वर्षांपूर्वी मोबाईल हे सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. परंतु रिलायन्सने करलो दुनिया मुठ्ठी मे ची घोषणा दिली आणि सर्वसामान्यांना परवडतील असे मोबाईलचे दर खाली आणले. यातून मोबाईल क्रांती ही तळागाळातील लोकांमध्ये पोहोचली. मोबाईल क्रांतीचा हा दुसरा टप्पा होता. आता प्रत्येक गावी व प्रत्येकाच्या हातात मोबाईल पोहोचल्यावर मोबाईल कंपन्यांना त्यांच्या विस्तारासाठी नवीन क्षितीजे खुणावू लागली आहेत. ग्राहकांचा मोबाइल इंटरनेटचा वाढता वापर बघता इंटरनेट रेट प्लॅन (टूजी, थ्रीजी) घेऊ पाहत आहेत. किंबहुना त्यांनी ती जागा घेतली देखील आहे. यामध्ये मोफत फेसबुकपासून ते इंटरनेट आणि स्मार्टफोनने सज्ज माध्यमातून ग्राहकांना सर्फिंगचा अनुभव देणार्‍या आकर्षक योजना टेलिकॉम कंपन्या राबवत आहेत.
इंटरनेट युगाचा जन्म लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅनच्या माध्यमातून म्हणजेच केबल इंटरनेटच्या माध्यमातून झाला. अर्थात केबल नेटला काही मर्यादा होत्याच, ज्यामुळे कामासाठी संगणकासमोर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. दूरवर ग्रामीण आणि डोंगराळ भागात केबल नेट न मिळणे हीदेखील मोठी समस्या होती. नंतर आलेल्या वायरलेस इंटरनेटने यावर तोडगा निघाला, तरी तो फारच मर्यादित स्वरूपाचा होता. केबल नेट आणि वायरलेस नेटने ग्राहकांचे प्रश्न सुटले असे नाही. परंतु आता आलेल्या मोबाइल इंटरनेटच्या आगमनामुळे आपण एका नव्या आणि विविध पैलू असलेल्या संपर्क क्रांतीला सामोरे जात असून जगाच्या कुठल्याही कोपजयातून एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. टेलिकॉम कंपन्याही तंत्रज्ञानामध्ये विकास साधत वाढती स्पर्धा यांचा ताळमेळ साधत ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरत आहेत.
मोबाईल कंपन्यांच्या नवीन योजनेनुसार, ग्राहकाला एका रुपयात व्हिडिओ पाहायला मिळतोय. इतक्या स्वस्त आणि किफायतशीर योजनेमुळे पहिल्यांदा इंटरनेटचा अनुभव घेऊ पाहणारा भारतीय ग्राहक मोठ्या प्रमाणात मोबाइल इंटरनेटकडे वळला आहे. व्हिडिओ दिसत असल्याने गेल्या वर्षी सुमारे २२ कोटी ग्राहक मोबाइल इंटरनेटकडे वळले आहेत. त्यापैकी १२ कोटी ग्राहकांनी व्हिडिओची सेवा घेतली आहे. या ग्राहकांपैकी ४ कोटी ग्राहक हे इंटरनेट वापरणारे नवे ग्राहक असून सुमारे २ कोटी ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत हे विशेष.
इंटरनेटच्या प्रसारामुळे टेलिकॉम कंपन्यांनी इतर महत्त्वाच्या योजनाही हाती घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये गुगल आणि फेसबुकचे फ्री झोन्स तयार करण्यात आले असून प्र्री-पेड ग्राहकांना मर्यादित स्वरूपात या योजनांचा लाभही घेता येणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांच्या गरजांचा विचार करून दोन्ही प्रकारे योजना कंपन्यांकडून राबवल्या जात आहेत.
महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानच्या ग्रामीण भागांत मोबाइल इंटरनेट व्हॅन आणि लहान मुलांसाठीच्या खास योजनेमार्फत शिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. अर्थात यासाठी लागणारे साहाय्य इतर कंपन्यांकडून घेतले जाते, पण त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. हे सर्व करत असताना नफ्या-तोट्याचे गणितही कंपन्या साधताना दिसत आहेत. जसे तंत्रज्ञान सुधारत जाईल तशी मोबाईल क्रांती जीवनाच्या प्रत्येक अंगांना व्यापणार आहे. भविष्यात मोबाईल हे नवीन तंत्रज्ञानाच्या केंद्रभागी असेल. प्रत्येक बाब आता मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. करलो दुनिया मुठ्ठीमें ची घोषणा त्या अर्थाने खरी होणार आहे.
-----------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel