-->
अकलेचे कांदे (अग्रलेख)

अकलेचे कांदे (अग्रलेख)

दिव्य मराठी | Aug 17, 2013 EDIT 

देशातील असे कोणते पीक आहे जे राजकारणी, शेतकरी, ग्राहक अशा तिघांचाही नेहमी वांधा करीत असते? या प्रश्नाचे उत्तर एकमुखाने ‘कांदा’ हेच देता येईल. सध्या हा कांदा या त्रिकुटापैकी दोघांना म्हणजे   राजकारणी व ग्राहकांना रडवत आहे. ज्या वेळी कांद्याचे पीक भरपूर येते, त्या वेळी याचे दर प्रतिकिलो दहा रुपयांच्याही खाली घसरतात आणि त्या वेळी शेतकर्‍यावर रडण्याची पाळी येते. सध्या श्रावणात कांद्याला मागणी कमी असतानाही त्याच्या किमती प्रतिकिलो 70 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. कांद्याच्या सध्याच्या हंगामात उत्पादन कमी झाल्याने या किमती गगनाला भिडल्या आहेत. डिसेंबर 10 व जानेवारी 11 मध्ये याच किमती 100 रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्याही वेळी पुढील दोन महिन्यांत नवीन पीक आल्यावर या किमती 20 रुपयांच्या खाली कोसळल्या होत्या. त्या वेळी शेतकर्‍यांवर रडण्याची पाळी आली होती.
कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सध्या 45 रुपयांवर घाऊक किमती पोहोचल्या आहेत. सरकारने काही ठिकाणी स्वस्त भाज्या विक्री केंद्रे सुरू करून कांदा कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असला तरी हे पुरेसे नाही. कांदा महागल्याने ग्राहकांचे अश्रू पुसण्याचे घाऊक कंत्राट नेटसॅव्ही पिढीने एसएमएस व व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू केले आहे. खरे तर हे अश्रू पुसण्याचे (की भडकवण्याचे) काम राजकीय आहे आणि त्याचे खरे केंद्र अहमदाबाद येथे आहे, हे उघड सत्य आहे. कांदा, डिझेल व बिअर हे समान किमतीत आल्याचे एसएमएस करून गळा काढणारे सध्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्सपासून सर्व महागड्या वस्तंूसाठी मिळणार्‍या सवलती लाटण्यासाठी तोबा गर्दी करीत आहेत. सध्या विविध मॉल्समध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करण्यासाठी जी गर्दी झालेली आहे, ती पाहता आपल्याकडे महागाई खरोखरीच आहे का, असा प्रश्न पडावा. निदान मॉल्समध्ये गर्दी करणार्‍यांनी तरी कांदा महागल्याचा राग आळवणे चुकीचे आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका ‘राष्ट्रीय’ नेत्याने तर सध्या कांदा न खाण्याचा दिलेला सल्ला काही चुकीचा नाही, असेच वाटते. सध्या श्रावण असल्यामुळे अनेक श्रद्धाळू, हिंदू उच्चवर्णीय, मारवाडी, जैन, गुजराती यांना कांदा न खाणे पथ्यावरच पडणार असले तरी कांदा-भाकर खाणार्‍या गरिबाला मात्र सुकी कोरडी भाकरीच सध्या खावी लागते आहे आणि सत्ताधारी पक्षाचा हाच मतदार असल्याने त्यांच्यावर आता रडण्याची पाळी येणार, हे नक्की. कारण पुढील चार महिन्यांत दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.
सध्याची ही स्थिती 98 सालची आठवण करून देते. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यावर दोन महिन्यांतच त्यांनी अणुबॉम्बचे दोन चाचणी स्फोट करून उन्मादाचे दर्शन घडवले होते. मात्र लगेचच पाकिस्ताननेही अणुस्फोट करून भारताच्या स्फोटाची हवा काढून घेतली आणि आशिया खंडातील आण्विक स्पर्धेत आपण असल्याचे दाखवून दिले होते. या घटनेपाठोपाठ दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशातील निवडणुका येऊ घातल्या होत्या आणि आपण अणुस्फोटाच्या उन्मादावर त्या जिंकू, असा भाजपला विश्वास होता. परंतु त्या वेळी कांदा तडमडला. त्या काळी कांद्याचे दर 60 रुपयांवर पोहोचले होते. याचा परिणाम असा झाला, की या तिन्हीही राज्यांत विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस सत्तेवर आली. अशा प्रकारे भाजपच्याही डोळ्यात कांद्याने अश्रू आणले होते. खरे तर डोळ्यात अश्रू आणणे हा कांद्याचा औषधी गुणच आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने कांदा हा एक औषधी गुण असलेला आहे आणि कांद्यामुळे अश्रू आल्यास डोळे साफ होतात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. आपल्याकडे वेळोवेळी राजकारण्यांचे डोळे साफ करण्याचे काम कांद्याने केले आहे.
सुमारे पाच हजार वर्षांहून जास्त जुने असलेले कांद्याचे हे पीक आता जगातील सर्वच देशांत काढले जाते व ज्या देशात कांदा पिकवला जात नाही त्या देशातही कांदा उपलब्ध असतो. सुरुवातीला कांद्याचे उत्पादन इराण व पश्चिम पाकिस्तानात होत होते. त्यानंतर ग्रीकांनी हा कांदा युरोपात पोहोचवला. ब्रिटिशांनी आपल्या राजवटी असलेल्या देशात कांदा नेला. आपल्याकडे साबुदाणा, काजू, बटाटा ही पिके जशी ब्रिटिशांनी वा पोर्तुगीजांनी आणली तसा कांदाही आणला, असे म्हणतात. मात्र याबाबत दुमत आहे. कारण आपल्याकडे पुराणात तसेच चरकसंहितेत कांद्याचा उल्लेख आहे. कांद्याचे औषधी गुण म्हणजे पचनासाठी, हृदयासाठी, डोळ्यांसाठी व हाडांच्या सांध्यासाठी गुणकारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 170 देशांत उपलब्ध असला तरी कांद्याचे उत्पादन चीनमध्ये सर्वाधिक होते आणि त्याखालोखाल आपल्याकडे होते. कांदा हे नाशवंत पीक असल्याने जवळपासच्या देशांतच त्याची निर्यात होते. दोन वर्षांपूर्वी कांद्याने किमतीचे शतक गाठल्यावर आपल्या मदतीला पाकिस्तानी कांदा आला होता. कच्चा कांदा बेचव आणि वासाने उग्र असला तरीही खाण्याच्या पदार्थात कांदा नसेल तर चव येत नाही. अशा प्रकारे खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या या कांद्याने वेळोवेळी राजकारणातही रंग भरला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी जनतेला संबोधित करताना अतिशय संयमी भाषण केले होते. तर भावी पंतप्रधान असल्याच्या थाटात वावरणार्‍या नरेंद्र मोदी यांचे झालेले उग्र भाषण म्हणजे नाकाने कांदे सोलण्याचाच प्रकार ठरावा. अर्थात, मोदींच्या भाषणाचा कांदा पंतप्रधानपदाचे भाजपमधील आणखी एक उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना चांगलाच झोंबला आणि त्यांनी वाक्बाण सोडून मोदींना घायाळ केलेच. एकूण काय, तर सगळ्यांनीच आपण अकलेचे कांदे असल्याचे सिद्ध केले आहे.

0 Response to "अकलेचे कांदे (अग्रलेख)"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel