-->
इंजिनाचे यु टर्न

इंजिनाचे यु टर्न

शनिवार दि. 25 जानेवारी 2020 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
इंजिनाचे यु टर्न
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे. 14 वर्षापूर्वी ज्या राज यांनी आपला हा नवीन पक्ष स्थापन केला होता त्यावेळी घेतलेल्या विचारांशी फारकत घेतली आहे आणि आता त्यांचे हे युटर्न आहे. मनसेची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब हायात होते व उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुतांशी शिवसेनेची सुत्रे येऊ लागली होती तसेच बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उध्दव ठाकरे यांने नाव निश्‍चित झाले होते. मनसे स्थापन करायला ही पार्श्‍वभूमी होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हिताचा झेंडा हाती घेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा संकल्प सोडत हिंदुत्ववादाचा काही पुकारा केला नव्हता. आता शिवसेनेने कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन केले आहे, त्यात उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचबरोबर भाजपासोबतची साथ त्यांनी सोडली असून नव्या मित्रांशी, भिन्न विचारसारणीच्या पक्षांशी जोडून घेतले आहे. काहीसे अनपेक्षीत असे राज्यात घडल्याने सर्वच पक्ष अगदी भाजपा देखील शॉकमध्ये आहे. कारण हे तिन्ही पक्ष एकत्र येतील असे कोणालाही स्वप्नात वाटले नव्हते. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे सर्व जुळवून आणलेे. एवढेच नव्हे तर कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना हे मान्य नसतानाही त्यांंना या आघाडीत आणण्यासाठी पवारांनी त्यांना भाग पाडले. हे सर्व होत असताना राज ठाकरे यांचा पक्ष आता वयात येत असताना म्हणजे 15 व्या वयाच्या उंबरठ्यावर असताना आपण कोणती भूमिका घेतल्यास पक्षाला संजिवनी मिळू शकते याचा विचार करणे हे त्यांच्यादृष्टीने ओघाने आले. कारण जिकडे शिवसेना आहे तिकडे मनसे जाऊ शकत नाही. स्थापनेपासून मनसेचे इंजिन चांगलेच जोरात धाऊ लागले होते. पहिल्याचवेळी त्यांचे दीड डझन आमदार निवडून आल्यावर मनसे हा भविष्यात राज्यात आपले एक स्वतंत्र स्थान मिळवेल असा अनेकांना होरा होता. त्यामुळे अनेक शिवसैनिक हे मनसेच्या दारी गेले होते. नाशिक महानगरपालिकेवर मनसेने आपला झेंडा फडकाविला होता. खेडसारखी ग्रामीण भागातील कोकणातील नगरपरिषदही मनसेने ताब्यात घेतली होती. त्यामुळे भविष्यात मनसे राज्यातील काही भागात आपला ठसा उमटवेल असे वातावरण होते. मात्र तसे काही झाले नाही. नाशिकमध्ये आपण आमुलाग्र सुधारणा केल्या असे राज ठाकरे ठणकावून सांगत असताना तेथे मनसेला पराभव पत्करावा लागला. नाशिकला जर काम चांगले करुनही मनसेला सत्ता टिकविता आली नाही तर मग काय म्हणावे? त्यानंतर मनसेची घसरण सुरु झाली ती काही थांबेना. आता तर एकमेव उमेदवार विधानसभेत त्यांचा निवडून आला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाला हजारो लोक येतात, त्यांचे भाषण एैकणे ही अनेकांना मोठी पर्वणी वाटते. परंतु लोक काही त्यांना मतदान करीत नाही असे निकालानंतर दिसते. तसेच मनसेने आपल्या विचारातही काही सातत्य ठेवलेले नाही. कधी मोदींची स्तुती तर कधी त्यांच्यावर कडवी टिका. अशा वेळी कार्यकर्ते गोंधळात पडतात. गेल्या लोकसभेला तर त्यांनी निवडणूक न लढविता केवळ मोदींच्या विरोधात सभा घेतल्या. त्यानंतर त्यांच्या विरोधात इडी कारवाईचे पाऊल उचलल्यावर राज ठाकरे यांनी आपली तलवार म्यान केली. आता तर हिंदुत्वाचा पुकारा केल्यावर भविष्यात भाजपासोबत जामार हे उघड आहे. सध्या शिवसेना सोबत नसल्याने भाजपाला कोणीतरी सोबती हवा आहे, तो मनसेच्या रुपाने मिळणार आहे. त्याचबरोबर मनसेचा आक्रमकपणा तरुणांची माथी भडकवायला उपयोगी पडेल व त्यातून हिंदू मते केंद्रीत होऊन आपली वाटचाल सत्तेच्या दिशेने होईल असे भाजपा व मनसेला वाटत आहे. आज मनसेकडे उपद्रवशक्ती असली तरी सत्ता आणण्याची कुवत नाही, संघटना नाही. शिवसेनेकडे हे सर्व सुरुवातीपासून होते. राज ठाकरे हे भाषण कितीही उत्कृष्ट करीत असले किंवा चांगल्या नकला करीत असले तरीही त्यांच्याकडे पक्ष उभारण्याचे कौशल्य नाही. कार्यकर्त्यांची फौज उभारण्यासाठी जो झंजावात करावा लागतो ते संघटन कौशल्य नाही. रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करुन कार्यकर्त्यांना वेळ द्यावा लागतो तो दृष्टीकोन राजयांच्याकडे नाही. बाळासाहेबांकडे त्यांची ताकद ही त्यांचे संघटना कौशल्य होते. बाळासाहेबांना कोणत्याही कोपर्‍यातील शिवसैनिक जाऊन भेटू शकत होता. त्या जोरावर त्यांनी संघटन उभारले. त्यांनी जात, धर्म न बघता शिवसैनिक उभा केला.  आज उद्दव यांच्याकडेही बाळासाहेबांचे गुण नसले तरी सर्व व्यवस्थापन करण्याची कुवत आहे हे त्यांनी सिद्द करुन दाखविले आहे. राजकारणातील एक प्रामाणिक, सच्चा माणूस म्हणून ते आपली प्रतिमा विकसीत करीत आहेत. भाजपाने आपला कसा वचनभंग केला हे ठणकावून सांगत असताना आपण हिंदुत्ववाद सोडलेला नाही असेही सांंगत आहेत. मनसेने आज यु टर्न घेतले आहे, पण हे करताना त्यात खरोखरीच यशस्वी होतील का? हे आत्ता सांगणे अवघड असले तरीही भाजपाशी संग करणे कसे आंगाशी येऊ शकते हे शिवसेनेच्या उदाहरणावरुन समजू शकते. आज मनसेपुढे अन्य काहीच पर्याय देखील नाही हे देखील तेवढेच खरे. नागरिकत्वाच्या प्रश्‍नावरुन आंदोलने पेटवायला भाजपाला मनसेचा उपयोग करुन घेता येईल, त्यातून राज्यात अस्थैर्यच नांदू शकते.
------------------------------------------------------------------

0 Response to "इंजिनाचे यु टर्न"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel