-->
मान्सूनची निराशा?

मान्सूनची निराशा?

गुरुवार दि. 16 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मान्सूनची निराशा?
केरळातील मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवस उशिराने म्हणजे 4 जून रोजी होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवली आहे. साधारणपणे एक जून रोजी केरळात मान्सून दाखल होतो. यंदा मात्र केरळच्या किनार्‍यावर 4 जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यातही दोन दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून फारसा चांगला राहणार नाही व पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, असे भविष्य स्कायमेटने वर्तविल्यामुळे यंदा मान्सून निराशा करेल असेच दिसते. या वेळी मान्सूनचे केंद्र अरबी समुद्रात राहील, हे चांगले चिन्ह नाही. यामुळे मोसमी वारे वायव्य दिशेला जास्त प्रमाणात सरकून, ते देशाच्या पठारी भागापासून दूर जातील. स्कायमेट आपल्या पहिल्या अंदाजावरच ठाम असून यंदा देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल. म्हणजेच, देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज त्यांनी सांगितला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मध्य भारतात सर्वात कमी 91 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्व व ईशान्य भारतात 92 टक्के, दक्षिण भारतात 95 टक्के आणि वायव्य भारतात 96 टक्के पावसाचा अंदाज आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 96 ते 104 टक्के पाऊस झाल्यास तो साधारण किंवा सरासरीइतका मानतात. पाऊस 95 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तो सरासरीपेक्षा कमी झाला असे मानले जाते. यंदा मध्य भारतातील मराठवाडा, विदर्भ, गुजरात आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. यांद भारताला अल निनोचा परिणाम भोगावा लागेल असे दिसते. अल निओच्या प्रभावामुळे मोसमी वार्‍यांची दिशा बदलते. हमखास पावसाच्या भागात पाऊस पडत नाही, तर पाऊस न पडणार्‍या भागात मुसळधार पाऊस पडतो. सध्या उष्णतेच्या लाटेने कानपूर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात घामाच्या धारा वाहत आहेत. देशात सध्या निवडणुकीच्या तापलेल्या राजकीय वातावरणात तसेच दुष्काळाच्या तीव्र झळा बसलेल्या असताना मान्सून निराशा करेल हे जर खरे झाले तर देशावरील एक मोठे संकटच ठरेल. एप्रिलचा उकाडा सुरु झाला की प्रत्येक जण मान्सूनची वाट पाहू लागतो. यंदा चांगला पाऊस पडू देत अशी हाक बळीराजा देतो. परंतु त्याच्या या हाकेकडे वरुणराजा लक्ष देतोच असे नाही. यंदा दुष्काळाने राज्याला वेढलेले असताना पावसाच्या अंदाजाचे महत्त्व आणखी वाढते. मात्र स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देशात सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करुन सर्वांची चिंता वाढवली असताना मात्र हवामान खात्याने समाधानकारक पाऊस असेल असे म्हटले आहे. या अंदाजानुसार, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता फक्त 17 टक्के आहे. हवामान खात्यातर्फे दरवर्षी दोन टप्प्यांत मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्यात येते. आता दुसरा अंदाज मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल. भारताच्या दृष्टीने या अंदाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतासारख्या मोसमी हवामानाच्या देशात सर्व अर्थकारण, समाजकारण, राजकारण पावसावर अवलंबून असते. गेल्या नऊ वर्षांत हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरले आहे. स्कायमेटला तर दोन वर्षांपूर्वी अंदाज चुकले म्हणून जाहीर माफी मागावी लागली होती. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 68 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहात असून, 50 टक्के लोक रोजगारासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत़  आपल्याकडे मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून असून त्याचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो़ त्यामुळे मान्सून कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष असते़  भारतीय उपखंडात नैऋत्य मान्सून व आग्नेय मान्सून असे पावसाचे दोन हंगाम आहेत. जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या हंगामात एकूण पावसाच्या 70 टक्के पाऊस पडतो. आग्नेय मान्सूनचा हंगाम ऑक्टोबरनंतर सुरू होतो व तो पाऊस प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये सक्रिय असतो. पावसाचे प्रमाण कितीही असले तरी शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. अर्थात त्याला सरकारी धोरणे जबाबदार आहेत. यंदा देखील चांगला पाऊस अपेक्षित असल्याने व प्रत्यक्षात तसा चांगला पाऊस पडल्यास हे सलग चांगल्या पावसाचे दुसरे वर्ष असेल. त्यामुळे एकूणच शेती क्षेत्राला नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे अर्थचक्र थंडावले होते. त्याला गती मिळणे सध्या तरी अवघड आहे. अशा वेळी चांगला पावसाळा झाल्यास केवळ शेतकरीच नाही तर सर्वानांच चांगले दिवस येतील. पावसावर आपले बरेच अर्थकारण अवलंबून असते. पावसाचा फायदा केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे तर शहरात राहाणार्‍या शहरवासीयांनाही होतो. यंदा हवामान खाते व स्कायमेट यांच्या अंदाजात समान धागा नसला तरीही चांगला पाऊस पडावा अशीच आपम अपेक्षा करु या.
----------------------------------------------------

0 Response to "मान्सूनची निराशा?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel