-->
तीन दशकांनंतर...

तीन दशकांनंतर...

दि. ९ ऑक्टोबरच्या मोहोरसाठी चिंतन तीन दशकांनंतर...
इतिहासातील घटना अशा काही असतात की आपण त्याला कितीही विसरण्याचे म्हटले तरी विसरु शकत नाही. किंबहुना त्या घटना विसरणे म्हणजे इतिहासाशी प्रतारणा करण्यासारखे होते. अशीच एक घटना म्हणजे पूर्व व पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिनची भिंत पाडल्याला नुकतीच बत्तीस वर्षे पूर्ण झाली. त्याअगोदर एक महिना जर्मनीच्या दोन देशांचे विलीनीकरण झाले होते. बर्लिनची भिंत उभारली जाणे व ती पाडणे या काळात 28 वर्षाचे अंतर आहे. परंतु या काळात जगात मोठी स्थित्यांतरे घडली. याकाळात जगाचा चेहरामोहराच बदलला. मावळत्या सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष गोर्बोचेव्ह यांच्या साक्षीने ही भिंत पाडली गेली. गेल्याच महिन्यात गोर्बोचेव्ह यांचे निधन झाले. ज्यावेळी ही भिंत पाडली गेली त्यावेळी जगातील सर्वच वृत्तपत्रांमध्ये याचे फोटो छापले गेले होते. हा एक मोठा जागतिक इव्हेंटच होता. त्याकाळी आता सारखी चॅनेल्स नव्हती किंवा देशातील वृत्तपत्रे रंगीतही नव्हती. इंटरनेट नव्हते त्यामुळे सोशल मिडीया तर असणे शक्यच नव्हते. असे असेल तरी ही भिंत पाडण्याची घटना जगाने टिपली होती. पश्‍चिम व पूर्व जर्मनीतील लोकांनी परस्परांच्या देशात येऊन प्रदीर्घ काळानंतर आपल्या नातेवाईकांना, मित्रांना मुक्तपणे भेटले व अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. अनेक जर्मनांनी या भिंतींचे अवशेष आपल्याकडे एक दस्ताएवज म्हणून जपले आहेत. एक भिंत देशाला विभाजन करते, त्यातील नागरिकांना परस्परांपासून दुरावण्यास प्रवृत्त करते हे सर्व समजण्याच्या पलिकडे होते. मात्र ज्यावेळी ही भिंत उभारली गेली त्यावेळी त्याची गरज उभय देशांना वाटत होती. सर्वसामान्य जर्मनांना मात्र ही भिंत नकोशी वाटत होती. पार पारकरणाऱ्यांसाठी अनेकांना आपले जीवही गमवावे लागले होते. ही भिंत पाडली गेली त्यावेळी देखील उभय देशांना व तेथील नागरिकांना अनावश्क वाटत होती. त्यातून ही भिंत पाडण्याची उत्फुर्त प्रतिक्रिया लोकांतून उमटली होती. आज ३२ वर्षानंतर या सर्व इतिहासातील घटनांचा सध्या वेध घेणे गरजेचे आहे. दुसर्‍या महायुध्दानंतर युध्दात हरलेल्या जर्मनीची दोन शकले झाली. यातील एक पश्‍चिम जर्मनी हा अमेरिकेच्या म्हणजे भांडवलशाहीच्या प्रभावाखाली आला तर दुसरा भाग पूर्व जर्मनी हा सोव्हिएत युनियनच्या म्हणजे समासत्तावादी जगाच्या नेतृत्वाखाली विभागला गेला. पूर्व बर्लिनमधील नागरिक पश्‍चिम बर्लिनमध्ये मोठया संख्येने स्थलांतर करत असत. ते थांबवण्यासाठी केलेले उपाय अपुरे पडत असल्याने 1961 साली सोव्हिएत प्रभावाखाली असलेल्या पूर्व जर्मन सरकारने बर्लिनची भिंत उभारण्यास सुरुवात केली. 1961 साली ही भिंत उभारेपर्यंत म्हणजे 16 वर्षांत साधारणत: 35 लाख जर्मन नागरिक पूर्वेकडून पश्‍चिमेला गेले होते. हे स्थलांतर रोखण्यासाठी ही भिंत उभारली गेली. मात्र भिंतीमुळे अनेक कुटुंबांची ताटातूट झाली. अनेकांनी भिंत ओलांडून आपल्या नातेवाईकांना भेटण्याचा प्रयत्न करताना जीव गमावले. या दोन भितींच्या आड एकीकडे भांडवलशाही तर दुसरीकडे समाजवादी राजवट नांदत होती. परस्परांना दोन्हीकडच्या बाजुंचे फार आकर्षण होते. तुलनात्मक विचार करता पश्‍चिम जर्मनीने सर्वच क्षेत्रात आघाडी मारली होती. त्यातुलनेत पूर्व जर्मनी हा गरीब देश ठरला होता. एकीकडे उदारमतवाद होता तर दुसरीकडे पोलादी भिंतीच्या आत समाजवाद नांदत होता. पश्‍चिम बर्लिन आर्थिकदृष्टया समृद्ध होते तर पूर्व बर्लिनमध्ये टंचाई आणि आर्थिक नियंत्रणे यामुळे विकासापासून दूर लोटला गेला होता. सोव्हिएत रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांनी 1985 नंतर खुलेपणा आणि पुनर्रचनेचे युग सुरु केले. याचा परिणामी सोव्हिएत युनियनमधील अनेक निर्बंध सैल व्हायला लागले. लोकांमध्ये मुक्त जीवन जगण्याची उर्मी जागृत झाली. अमेरिका व अन्य विकसीत देशांविषयी त्यावेळी कम्युनिस्ट देशांमधील नागरिकांमध्ये एक आकर्षण होते. हे आकर्षण जसे लोकशाहीविषयी होते तसेच तेथील मुक्त जीवनाचे होते. तेथील उदारमतवादाचे त्यांना कौतुक होते. तत्कालीन रशियात लोकांना अन्न, वस्त्र, रोजगार याची पूर्तता होत असली तरी यापलिकडील जग बघण्याची त्यांची मोठी उर्मी होती. रशियात आता मुक्ततेचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांना बाहेरील जगाचा अंदाज येऊ लागला. त्याचे आकर्षण वाढीस लागले. यातूनच हळूहळू कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले. त्यातून रशियातील कम्युनिस्ट राजवट फुटीच्या उंबरठ्यावर आली. अर्थात हे लोण युरोपातही पोहोचले. कम्युनिस्ट राज्यकर्त्यांचा तेथील राज्य व्यवस्थेवर असलेला वरचश्मा सैल होत गेला. त्यातचे पर्यवसान हे बर्लिनची भिंत पाडण्यात झाले. मात्र ही प्रक्रिया काही सोपी नव्हती. जनतेच्या मनात जो रोश होता त्याला वाटा फूटू लागली होती. लोकांना जास्त काळ जखडून ठेवता येत नाही, त्यानुसार, बर्लिनची भिंत पाडण्यासाठी जगभरातील ठिकठिकाणच्या कम्युनिस्ट राजवटी कोसळणे हे निमित्त झाले. अखेर ऑक्टोबर 89 साली ही भिंत पाडली गेली. भिंत तर पाडली गेली. भावनीत नाते जुळले गेले. मात्र यातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न काही सुटले नाहीत. पश्‍चिम जर्मनीच्या नागरिकांनी पूर्वेतील आपल्या सहकार्‍यांना आपल्यात सामावून घेतले खरे परंतु त्याची त्यांना जबर किंमत मोजावी लागली. कारण जर्मनीने पूर्वेकडील भागाला आपल्या दर्ज्यावर आणण्यासाठी पश्‍चिमेतील लोकांवर कर लादला होता. तो कर दहा वर्षे होता. पश्चिम जर्मनीतील लोकांनी तो कोणतीही कुरबुर न करता स्वीकारला. आजही पूर्वकडील भाग पश्‍चिमेच्या तुलनेत गरीब दिसतो. या विषयावर जगात अनेक पुस्तके प्रकाशित झाली, अनेक सिनेमे आले. त्यात कम्युनिस्टांना अवास्तव व्हिलन म्हणून दाखविले गेले. मात्र जगाची हीच रित असते. जो सत्ताधारी असतो तोच आपला विचार प्रखरप्रमाणे मांडू शकतो हे पुन्हा यातून सिध्द झाले. याच वेळी भारतातही 91 साली भारतातही उदारीकरणाचे युग सुरु झाले. पी.व्ही. नरसिंहराव यांनी पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेताच जगातील हे वारे चाणाक्षपणाने ओळखले. आपल्याकडेही उदारीकरण करण्याची आवश्यकात ओळखून अर्थमंत्रीपदी या विषयातील तज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांची नियुक्ती केली. आपण जे रशियाकडे झुकलेले होतो तो आपला कलही किंचितसा अमेरिकेकडे म्हणजे भांडवलशाहीकडे हळूहळू झुकू लागला. गोर्बोचेव्ह सत्तेत आल्यानंतर 89 साली जग बदलायची ही प्रक्रिया सुरु झाली व त्याने वेग घेतला. अमेरिकेला असे वाटू लागले होते की, आपणच आता जगाचे शहेनशहा आहोत. परंतु त्यांचे ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही. 2008 नंतरच्या जगाने मंदीचा फटका पाहिला आणि जग पन्हा एकदा नव्या उंबरठ्यावर येऊन थडकले. यातूनच पुढील टप्प्यात संकुचितपणा, आक्रमक राष्ट्रवाद, वांशिक भेदाभेद, मुक्त व्यापाराला विरोध अशी स्वातंत्र्य ही मूल्ये परत आली. इस्लामिक दहशतवादाचे आव्हाने जगासमोर उभे ठाकले. 2008 च्या आर्थिक संकटामुळे त्याची दाहकता अधिक प्रकर्षांने जाणवायला लागली. भारतातही आक्रमक राष्ट्रवाद, धार्मिक विद्वेष व संकुचितपणा यांचा वापर करणारे लोकानुनयी राजकारण बळ धरू लागले. 2010 नंतरच्या जगात जपान, चीन, फिलिपाइन्स, टर्की आणि भारत अशा देशांत लोकानुनयी, उदारमतवादी लोकशाहीला आव्हान निर्माण करणारे, सत्तेचे केंद्रीकरण करणारे एककल्ली सत्ताधीश तयार झाले. युरोपातील अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाला प्रोत्साहन देणारे सत्ताधीश आले. 27 देशांचा समूह असेलल्या युरोपीयन युनियनमध्येही विरोधात वातावरण तयार झाले. ब्रिटनने तर ब्रेक्झिटचा मार्ग अवलंबिला. बर्लिनची भिंत बांधल्यानंतर 28 वर्षांतच कोसळली. त्यानंतर जग 180 अंशात जवळपास बदलले हे खरे असेल तरीही जग बदलण्याची ही प्रक्रिया काही थांबलेली नाही हे वास्तव आहे. आज जर्मनीतील भिंत कोसळली असली तरीही अजूनही पूर्व जर्मनी मागासलेलाच राहिला आहे. पश्चिमेच्या तुलनेत इकडे गरीबी दिसते. टेस्लाने आता तेथे आपला महाकाय प्रकल्प सुरु करण्याची घोषणा केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्व जर्मतीत आज नाझीवादाच्या समर्थक पक्षाचा झपाट्याने प्रसार होत आहे. तर कम्युनिस्ट तेथे नावाला सापडत आहेत. गेल्या तीन दशकात तेथील राजकारण पूर्णत: बदलले आहे. भिंत पाडली असली तीरही तेथील परस्परातील दरी काही अजून दूर झालेली नाही.

0 Response to "तीन दशकांनंतर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel