
सलाम वंदे भारत एक्स्प्रेसला
दि. 16 ऑक्टोबरच्या मोहोरसाठी चिंतन
सलाम वंदे भारत एक्स्प्रेसला
नुकतीच मुंबई-अहमदाबाद हे ५२५ किमी तर केवळ पाच तासात पार करणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली आहे. या प्रकारतील वंदे भारतची ही तिसरी रेल्वे आहे. यापूर्वी गेल्या वर्षात सुरु केलेल्या गाड्यांचा प्रतिसाद उत्तम आहेच, शिवाय हा प्रयोग यशस्वी देखील झाल्याचे आता सिध्द झाले आहे. त्यामुळे भविष्यात या ट्रेन्स वाढवित नेल्या पाहिजेत. येत्या चार वर्षात रेल्वे ४० वंदे भारत ट्रेन्स रुळावर आणेल. हळूहळू टप्प्याने शताब्दीच्या गाड्यांची जागा वंदे भारत घेईल. दीर्घ पल्याच्या म्हणजे किमान ५०० किमी व त्याहून जास्त अंतर असणाऱ्या प्रवासातील गाड्या या भविष्यात वंदे भारत असतील. त्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होईल. अशा प्रकारच्या वेगवान रेल्वे गाड्या जर भारतात सुरु झाल्या तर लोक आनंदाने थोडे जास्त भाडे देणेही पसंत करतील. त्यादृष्टीने पाहता वंदे भारतचे स्वागत झाले पाहिजे. याच मार्गावर आपण कसलाही जादा खर्च न करता ही नवीन वेगवान गाडी धावू लागलो आहोत. सरासरी १०० किमी तासाच्या वेगाने ही गाडी धावते आहे. मात्र याच मार्गावर बुलेट ट्रेन उभारणीसाठी दीड लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. एवढा खर्च करुन बुलेट ट्रेन अहमदाबादला तीन तासात पोहोचवेल. त्यामुळे बुलेट ट्रेनचा विचार करता वंदे भारत ही ट्रेन केव्हाही स्वागतार्ह आहे. बुलेट ट्रेनचा प्रकल्प हा काही व्यवहार्य नाही हे अनेकदा सिध्द झाले असतानाही केंद्राचा आग्रह काही थांबत नाही. कदाचित हा प्रकल्प पांढरा हत्ती झाल्यावरच सरकराला जाग येऊ शकते. बुलेट ट्रेनसाठी होणारा दीड लाख कोटी रुपयांचा खर्च वंदे भारतच्या माध्यमातून रेल्वेच्या आधुनिकीकरणावर खर्च करणे केव्हाही व्यवहार्य ठरु शकते. आपल्या देशातील लोकांच्या गरजा, देशात उपलब्ध होणारे तंत्रज्ञान, खर्चाचा ताळमेळ या सर्वांचा विचार करता वंदे भारत आपल्याला स्वीकारार्ह ठरणार आहे. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, सध्याचे रेल्वे ट्रक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही, त्यामुळे सध्याचा मार्ग कायम ठेऊनच जादा वेगवान गाड्या धावणार आहेत. त्याउलट बुलेट ट्रेनसाठी नव्याने ट्रँक टाकावा लागतो. बुलेट ट्रेनचे तिकिट हे विमानापेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे हा पर्याय किती लोक स्वीकारतील हे काळच ठरवील. या सर्वांचा विचार करता वंदे भारत ही ट्रेन केव्हाही आपल्यासाठी योग्य ठरते. ब्रिटीशांनी आपल्याकडे रेल्वे सुरु करुन आता दीडशे वर्षाहून जास्त काळ लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर रेल्वेमध्ये आपण अनेक कालानुरुप बदल करत आणले आहेत. कोळशाच्या इंजिनापासून आता विजेच्या इंजिनापर्यंत आपण धीमेगतीने का होईना मजल मारली. कोकण रेल्वेसारखा एक क्रांतिकारी पायाभूत प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प म्हणजे आधुनिक भारताच्या तंत्रज्ञानाचा एक अविष्कार होता. त्यानंतर पुढील तीस वर्षात या मार्गाचे शंभर टक्के विद्यातीकरणही झाले. त्यामुळे आपण रेल्वेच्या क्षेत्रात गेल्या सात दशकात मोलाची कामगिरी केली आहे. आता त्याचाच एक पुढील भाग म्हणून वंदे भारतकडे पाहावे लागेल. आपण तंत्रज्ञानाच्या संदर्भातही मोठी मजल मारली आहे. त्यामुळे आपण वंदे भारतच्या इंजिनची देशात निर्मीती करु शकलो. ही बाब केवळ एका रात्रीत होण्यासारखी नाही. गेल्या पन्नास वर्षाच्या तंत्रज्ञानाच्या कमाईचे हे फलित आहे. आता आपल्याला भविष्यात नवीन मोठी झेप घ्यावयाची आहे. त्यासाठी वंदे भारत हे पहिले पाऊल ठरणार आहे. वंदे भारत इंजिनाचा सध्या असलेला ताशी शंभर किमी असलेला वेग वाढविण्यासाठी पुढील संशोधन करावे लागणार आहे. बुलेट ट्रेनचा वेग वंदे भारतला गाठता येणार नाही हे जरी खरे असले तरी त्याच्या जवळपास आपण गेलो तरी मोठे उदिष्ट साध्य करु शकू आणि तसे करणे शक्य आहे. वंदेमध्ये आजही २० टक्के माल हा विदेशातून आयात केलेला आहे. त्यामुळे नजिकच्या काळात शंभर टक्के देशातील माल वापरुन निर्मीती झालेली ही रेल्वेगाडी असा प्रयत्न करावा लागेल. चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्टरीत निर्मिती करण्यात आलेल्या या ट्रेनने रेल्वे प्रवासाची संकल्पना पूर्णपणे बदलली जाणार. आपल्याला पुढील काळात नवीन तंत्रज्ञानाची कास धरत असताना कमीत कमी खर्चाचाही विचार करावा लागेल. सध्याच्या या एका कोचसाठी जेमतेम सहा कोटी रुपये खर्च आला आहे. जगात एका कोचच्या निर्मितीसीठी खर्च हा सरासरी २४ कोटी रुपये येतो. त्यामुळे याची मागणी वाढणार आहे. आपल्या शेजारच्या देशातूनही रेल्वेकडे या कोचच्या खरेदी करण्यासंबंधी चौकशी सुरु झाल्या आहेत. तसे झाल्यास आपल्याकडून याची निर्यात होण्यासही सुरुवात होईल. याच्या इंजिनाच्या पुढचा भाग हा स्टील व फायबरचा बनविण्यात आला आहे. मात्र उदघाटनाच्या दुसऱ्या दिवळी एका बैलाने या इंजिनाला धडक दिल्याने त्याचा पुढचा भाग तुटला होता. परंतु यापूर्वी देखील असे अपघात झालेले आहेत. दरवर्षी रेल्वेचा धडक देऊन सरासरी पाच हजार जनावरे आपल्याकडे मरतात. परंतु आजवरची इंजिने ही अधिक मजबूत असल्याने त्यांना काही होत नव्हते. मात्र आता यातून वंदे भारतला काही सुधारणा कराव्या लागणार आहेत. मात्र मूळ तंत्रज्ञानाला यातून काही धोका नाही. केंद्राच्या देशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या योजनेतून भारतीय बनावटीची ही रेल्वे चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली. या संपूर्ण रेल्वेसाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च आला. जर ही रेल्वे युरोपातून आयात केली असती तर ४० टक्के जास्त पैसे मोजावे लागले असते. एकूणच आपल्या तंत्रज्ञानाच्या अविष्कारातून साकारलेली ही रेल्वे म्हणजे आपल्या आधुनिक भारताचे रेखाचित्र म्हणता येईल. ही रेल्वे तयार करणाऱ्या आपल्या देशातील तंत्रज्ञांना सलाम.
0 Response to "सलाम वंदे भारत एक्स्प्रेसला"
टिप्पणी पोस्ट करा