-->
अंतिम टप्प्यात...

अंतिम टप्प्यात...

बुधवार दि. 15 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अंतिम टप्प्यात...
सहा टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्याने आता येत्या 19 मे रोजी अखेरचा सातव्या टप्प्यातील मतदान येऊ घातले आहे. या दिवशी 59 जागांवर मतदान झाल्यावर जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. त्याच दिवशी रात्री निवडणुकीचे पाहणी अहवालाचे आकडे सादर होतील. अर्थाच त्यांच्या आधारावरच अंतिम निकाल लागतील असे नव्हे. कारण यापूर्वी चाचणी अहवाल खोटे ठरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे 23 तारखेलाच निकाल लागल्यावर सुरुवात झाल्यावर खरे चित्र स्पष्ट होऊ शकेल. देशातील 543 मतदारसंघातील 89 टक्के मतदारसंघातील मतदान आता पूर्ण झाल्याने आता अंतिम टप्प्यात फार काही मोठा बदल होईल व देशाचे चित्र पालटेल असे काही नाही. असे असले तरी शेवटचा टप्पा हा सर्वात महत्वाचा आहे. शेवटच्या दोन टप्प्यात भाजपाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आलेले होते. त्यामुळे त्यात मिळणार्‍या यशावर भाजपाचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे सत्ताधार्‍यांना आपली सत्ता टिकविण्यासाठी हे दोन टप्पे फार महत्वाचे ठरणारे आहेत. यावेळी कुणाचीही लाट नाही, हे निर्वीवाद सत्य आहे. सत्ताधारी भाजपा व नरेंद्र मोदी यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. त्यासाठी त्यांनी जनतेच्या मुख्य प्रश्‍नांकडून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी विविध प्रयोग केले. यातून निवडणूक प्रचार बरकट नेण्यात सत्ताधारी यशस्वी ठरले असे म्हणता येईल. मैं चौकीदारचा भाजपाचा प्रचार, चौकीदार चोर है हा कॉँग्रेसचा त्याला उत्तर देण्यासाठी झालेला प्रचार या पासून सुरू झालेला हा पाठलाग आता आयएनएस विराट या युद्ध नौकेपर्यंत येऊन ठेपला. यावेळी भूदल, हवाईदल व नौदल ही देशाची संरक्षण दलेही राजकारणापासून अपवाद राहिली नाहीत. भाजपाने मते मिळविण्यासाठी त्यांनी राजकारणात खेचले. वास्तविक देशहिताच्या दृष्टीने लष्कराने राजकारणात दखलअंदाज घेण्याची गरज नाही तसेच राज्यकर्त्यांनी लष्करामध्ये ढवळाढवळ करू नये, असा संकेत आपल्याकडे आजवर कटाक्षाने पाळला गेला. परंतु त्याला यावेली मोदींनी हरताळ फासला.  दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1988 मध्ये आयएनएस विराट या युद्धनौकेचा खासगी मनोरंजनासाठी एखाद्या टॅक्सीसारखा गैरवापर केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका प्रचारसभेत केला. देशभरातून याबाबत उलटसुलट प्रतिक्रियांचे वावटळ उठणे स्वाभाविकच होतेे. माजी नौदल प्रमुख व तत्कालीन व्हाईस ऍडमिनरल रामदास यांनी या दाव्याचे पूर्णपणे खंडन केले. त्यांनी सांगितले की, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी व त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी अधिकृतपणे राजशिष्टाचार व नियमानुसार युद्धनौकेचा व नौदलाच्या हेलिकॉप्टरचा वापर केला. त्यांच्यासोबत त्यावेळी कोणतेही परदेशी पाहुणे नव्हते. रामदास यांच्यासह दोन अधिका़र्‍यांनी राजीव गांधींचे समर्थन केल्यानंतर लगेचच माजी नौदल अधिका़र्‍यांच्या दुस़र्‍या एका गटाने नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची तळी उचलत दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना आरोपीच्या पिंज़र्‍यात उभे केले. राजीव गांधी यांनी युद्ध नौकेचा व हेलिकॉप्टरचा गैरवापर केला होता. बहुतांश तत्कालीन नौदल अधिका़र्‍यांना हे मान्य नव्हते. परंतु त्यावेळी त्यांना दबावाने गप्प बसवण्यात आले होते, असे ट्विट माजी नौदल कमांडर (निवृत्त) व्ही. के. जेटली यांनी केले आहे. वास्तविक राजीव गांधी आता हयात नाहीत. शिवाय तीन दशकांपूर्वीची घटना आता उगाळण्यात काहीच अर्थ नाही. असे असले तरी जनतेचे लक्ष तिसर्‍याच मुद्याकडे नेणे ही भाजपाची गरज होती. देशात लोकसभेच्या आजवर 16 निवडणुका पार पडल्या. या निवडणूक प्रचारांमधून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप व प्रत्यारोपांचे शरसंधान केले. पण ते विकास आणि लोकांच्या प्रश्‍नाच्या चौकटीबाहेर फारसे गेले नाहीत. नंतरच्या काळात त्याची कक्षा रूंदावत ते एकाधिकारशाही, धार्मिक वाद, भ्रष्टाचारापर्यंत पोहोचले. तरीही देशाच्या लोकशाहीच्या बळकट ढाच्याला धक्का लागला नव्हता. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र वरील सर्व मुद्दयांशिवाय व्यक्तिगत, चारित्र्य, कौटुंबिक पार्श्‍वभूमी सर्वात कहर म्हणजे संरक्षण दलाला राजकारणात ओढले गेले. एकूणच प्रचाराची खालची पातळी गाठली गेली. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्वच आरोपांची सुरुवात ही सत्तधारी भाजपाकडून केली गेली. यातून आपल्या देशातील लोकशाहीला धक्का लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. 2014 ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने जिंकली. त्यावेळी जनतेला अच्छे दिन दाखविण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. भोळी भाबडी जनता या प्रचाराला भुलली. जनतेलाही कॉँग्रेसपासून काही तरी वेगळा पर्याय पाहिजे होता. तो पर्याय मोदींनी उभा केला. यावेळी खरे तर भाजपाने आपल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या आधारावर मते मागितली पाहिजे होती. परंतु कामाच्या नावाने बोंबच असल्याने मोदींनी या निवडणुकीत विषयांतर करुन सत्ता पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न केला. तीन राज्यातील विधानसभा जिंकल्यावर सत्ता गेल्याने गलीतगात्र झालेल्या कॉँग्रेसमध्ये खर्‍या अर्थाने जान आली. राफेल खरेदी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करीत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार चोर है असा जोरदार हल्ला केला. काँग्रेसच्या या रणनीतीमुळे मोदी अडचणीत आले. मोदींनीही त्यानंतर राजकीय सुज्ञपणा बाजूला ठेवून राहुल गांधींचे वडील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनाच आरोपांच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळे यावेळी जनतेच्या प्रश्‍नावर निवडणूक न लढविली जाण्याच्या प्रयत्नात भाजपा व मोदी यसस्वी ठरले हे खरे.
----------------------------------------------------------------

0 Response to "अंतिम टप्प्यात..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel