-->
बँकांचे लुटेरे / दुर्लक्षित मुंबई

बँकांचे लुटेरे / दुर्लक्षित मुंबई

सोमवार दि. 17 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
बँकांचे लुटेरे
मागील 11 वर्षांत देशाच्या बँकिंग विश्‍वात तब्बल 50,000 हून अधिक घोटाळे व गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये 2.05 लाख कोटी रुपये फस्त केले गेले असून, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि एचडीएफसी बँक अशा बडया बँकांबाबत अशी प्रकरणे सर्वाधिक आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेकडून उपलब्ध अधिकृत माहितीतून पुढे आले आहे. ही माहिती फारच बोलकी आहे. देशातील गैरव्यवहार होणार्‍या बँकांत जसा सरकारी क्षेत्रातील आहेत तशाच खासगी बँकांही आहेत. त्यामुळे गैरव्यवहार केवळ सरकारी बँकांतच होतात हा आपला गैरसमज आहे. परंतु यात सरकारी क्षेत्रातील बँका आघाडीवर आहेत हे देखील वास्तव आहे. त्यातुलनेत खासगी बँकांमध्ये कमी लूट झाली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी-मेहुल चोक्सी घोटाळ्याचा डाग लागलेल्या पंजाब नॅशनल बँकेबाबत लुटीची रक्कम सर्वाधिक 28,700 कोटी रुपयांची आहे. आर्थिक वर्ष 2008-09 ते 2018-19 अशा 11 वर्षांमध्ये बँक घोटाळ्यांची 53,334 छोटी-मोठी प्रकरणे घडून आली. ज्यामध्ये सर्वाधिक 6,811 प्रकरणे ही आयसीआयसीआय बँकेशी संलग्न असून, या बँकेतून घोटाळेबाजांकडून 5,033.81 कोटी रुपये लांबविले गेले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेत 11 वर्षांत 23,734.74 कोटी रुपयांची 6,792 आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे, एचडीएफसी बँकेत 1,200.79 कोटी रुपयांची 2,497 प्रकरणे आढळून आली आहेत. त्याखालोखाल बँक ऑफ बडोदा 2,160 प्रकरणे (12,963 कोटी रु.), पंजाब नॅशनल बँक 2,047 प्रकरणे (28,701 कोटी रु.) आणि अ‍ॅक्सिस बँकेत 1,944 घोटाळ्याच्या प्रकरणात 5,301.69 कोटी रुपयांच्या जनतेच्या पैशाची लूट केली गेली आहे. आपल्याकडे बँकांतील चोर्‍या करमार्‍या या लुटारुंपैकी कोणावरही कायद्याचा बडगा दाखवून त्यांना शिक्षा जाल्याचे एैकिवात नाही. त्यामुळे आर्थिक गुन्हे करणार्‍यांना आपल्यावर कोणतीही कोणीच कारवाई करणार नाही याची खात्री असल्यासारकी स्थिती आहे. अर्थात हे गुन्हे जसे कॉँग्रेसच्या राजवटीत झाले तसे गेल्या पाच वर्षात मोदींच्या कार्यकालातही जाले हे विसरता येणार नाही. जोपर्यंत एखाद्या यातील गुन्हेगाराला आपण जबर शिक्षा करुन कायद्याचा बडगा दाखवित नाही तोपर्यंत अशा प्रकारचे सुटाबुटातले हे गुन्हेगार देशाचा हा पैसा लुटतच राहाणार. 
दुर्लक्षित मुंबई
मुंबई शहराची लोकसंख्या दरोज वाढत असताना तिच्या समस्या काही कमी होण्याएवजी सतत वाढताना दिसत आहेत. मुंबई येते आलेल्या प्रत्येकाला रोजगार देते त्यामुळे रोजगार मिळण्याच्या आशेने येथे लोंढे येत असतात. अर्थात हे काही नवीन नाही. वर्षानुवर्षे चालत आलेले आहे. आता जर जसा दुष्काळ पडतो तसा मुंबईत येणार्‍यांचा लोंढा वाढतो. तसेच सुशिक्षित बेकारांचे तांडेही येतात. त्यामुळे येथे येणार्‍या कोणत्याही प्रकारातील कष्टकरी असो की सुटाबुटातला साहेब असो प्रत्येकाला रोजगार मिळाल्यामुळे मुंबईची गर्दी रोज वाढत असते. मात्र यातून मुंबईच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असतात. आता मुंबई हे शहर जगातील सर्वात वाहतूक कोंडी होणारे शहर म्हणून जगाच्या नकाशावर आले आहे. हे वाचल्यावर काहीसे आश्‍चर्य वाटेलही परंतु ही वस्तुस्थिती आहे व ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. अ‍ॅपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणार्‍या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे. या यादीनुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी होणार्‍या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा किती टक्के अधिक वेळ लागतो हे या अहवालात सांगण्यात आले आहे. या अहवालानुसार मुंबईमध्ये एका जागेवरुन दुसर्‍या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 65 टक्के अधिक वेळ लागतो असे म्हटले आहे. मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली. सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणार्‍या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसर्‍या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्के अधिक वेळ लागतो. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी असलेले बोगोटा हे शहर आहे.त्यानंतर दक्षिण अमेरेकेमधील पेरू देशाची राजधानी असणारे लिमा शहर या यादीमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. रशियाची राजधानी असलेले मॉस्को  हे शहर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे चीनसारख्या देशातील एकाही शहराचे नाव टॉप पाच मध्ये नाही. चीनमध्ये वाहनांची संख्या जास्त असली तरी तेथील रस्ते मोठे असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत नाही. मुंबईतील ही वाहतूक समस्या आता पुढील पाच वर्षाच्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे राज्य सरकारने या शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न. खरे तर देशाच्या या आर्थिक राजधानीत मेट्रोचे जाळे गेल्या दशकात उभारावयास पाहिजे होते. परंतु राज्यकर्त्यांनी मुंबईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आता तरी मुंबईचे हे चित्र पालटेल असे म्हणण्यास वाव आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "बँकांचे लुटेरे / दुर्लक्षित मुंबई"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel