-->
विजयामागचे व्यवस्थापन

विजयामागचे व्यवस्थापन

सोमवार दि. 27 मे 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
विजयामागचे व्यवस्थापन
भाजपाच्या विजयाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र त्यामागे मोदी व शहा यांचे व्यावसायिक दृष्टीकोन असलेले व्यवस्थापन फार महत्वाचे ठरले. त्यात पक्षासाठी अमित शहा यांनी अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन केले व त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली. शहा यांनी निवडणूक केंद्रांवर सुमारे 90 लाख सक्रिय कार्यकर्त्यांना कामाला लावले. सामाजिक समीकरणाच्या हिशेबाने प्रत्येक बूथवर 20-20 सदस्य जोडले. म्हणजेच 2 कोटी 70 लाख कार्यकर्त्यांची फौज त्यांनी उभी केली. मोदींनी 144 सभा, तर शहा यांनी 161 सभा देशभरात घेतल्या. त्यांच्या या प्रयत्नांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघांने सक्रियरित्या पाठबळ दिले. प्रत्येक उमेदवार, त्याची पार्श्‍वभूमी, त्यांच्या मागे असलेले बळ व त्याला विजयी करण्यासाठी द्यावयाचे जादा बळ याचा अभ्यास करण्यात आला. संपूर्ण निवडणूक प्रचार मोहिमेची अशी आखणी केली की, 28 मार्चपासून पीएमचा प्रचार सुरू होईल तेव्हापासून 7-8 एप्रिलपर्यंत त्याचे लाटेमध्ये रूपांतर केले जावे. संघाने पहिल्या-दुसर्‍या टप्प्यानंतर आपली सक्रियता वाढवली. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल आणि ओडिशात प्रत्येक मतदारसंघात एक-एका प्रचारकाला सज्ज ठेवले. थेट भाजपचा प्रचार करण्याऐवजी राष्ट्रवादाचा आधार घेतला आणि मोदी सरकारचे मुद्दे अप्रत्यक्षरीत्या मांडले. अमित शहा यांनी केंद्रांवर भर दिला आणि एक वर्षापूर्वीपासूनच याची तयारी केली होती. पक्षाने 22 कलमी अजेंडा बनवला होता. त्यात सामाजिक समीकरणासह मंदिर, एनजीओ, बचत गट, लाभार्थी, सहकारी संस्थांशी संबंधित लोकांना खासकरून जोडण्याचे काम केले. प्रत्येक मतदारसंघात 14 ते 21 सदस्यांची संचालन समिती बनवली आणि शहा यांनी सर्व राज्यांत जाऊन स्वत: याच्या बैठका घेतल्या. शहा यांनी सामाजिक समीकरणावर खास लक्ष ठेवत प्रत्येक बूथवर 20 एससी, एसटी, ओबीसीचे सक्रिय सदस्य जोडले. प्रत्येक गावातील विजयी व पराभूत सरपंचांशी संपर्क साधून सदस्य बनवण्याचे काम केले. शहा यांनी पराभूत 120 लोकसभा जागा 25 क्लस्टरमध्ये विभागून मोठ्या नेत्यांना जबाबदारी देत काम केले. त्यापैकी 80 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले. भाजपने 10.30 वाजेपूर्वी उन्हाच्या आधी मतदान होईल याकडे लक्ष दिले. देशाच्या 4120 पैकी 2566 विधानसभा जागांवर पक्षाने पूर्णकालिक विस्तारक सज्ज ठेवले. पश्‍चिम बंगालमध्ये त्यांनी आखलेल्या रणनीतीचा तर विशेष अभ्यास झाला पाहिजे. 2014 च्या निवडणुकीत सुमारे 33 जागा अशा होत्या की तिथे विजयी उमेदवाराचे मार्जिन तिसर्‍या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा कमी होते. भाजप दोन ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर राहिला, दोन जागा जिंकल्या. बंगालमध्ये भाजपने डिजिटल वॉल पेंटिंगचा आधार घेतला आणि संपूर्ण परिसरात मोदींच्या चेहर्‍यासोबत पोस्टर लावले. यामुळे टीएमसीचे कार्यकर्ते भडकले होते आणि हिंसाचार उसळला होता. टीएमसीच्या अनेक मोठ्या नेत्यांवर डोळा ठेवत पक्षाने आपल्याकडे वळवले व भाजपच्या पारड्यात यंदा सर्वाधिक बंगाल व ओडिशाातून इतर पक्षांचे लोक आले. उत्तर प्रदेशात नुकसान होण्याची शक्यता पाहून पूर्व भारतात जागा वाढवण्याचे नियोजन भाजपने केले होते. या वेळी केंद्रात रालोआच्या सत्तेचा मार्ग प.बंगाल, ओडिशा, आसाम व पूर्वोत्तर राज्यांतून गेला आहे. पहिल्यांदाच त्रिपुरातील दोन्ही जागा जिंकण्यात भाजपला यश आले. यामुळे त्यांना प्रथमच स्वबळावर 300 चा आकडा पार करता आला. यासोबतच भाजप बिहार, झारखंड, महाराष्ट्र व कर्नाटकात विरोधी पक्षांच्या मजबूत मानल्या जाणार्‍या आघाडीलाही पराभूत करण्यात यशस्वी ठरला. कर्नाटकात तर 28 पैकी 25 जागा पटकावल्या. तेथे माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पूर्वोत्तरमध्ये भाजपने आसामचे मंत्री हेमंता बिस्वा सरमा व बंगालमध्ये कैलाश विजयवर्गीय यांना 2014 पासूनच कामाला लावले. एनआरसी, हिंदुत्व, अवैध बांगलादेशी घुसखोर हे मुद्दे उचलले व या मुद्द्यांमुळेच हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण वेगाने झाले. तसेच तृणमूल, कम्युनिस्ट पक्षासह काँग्रेसचे बडे नेतेही आपल्याकडे वळवले. बंगालच्या 26 टक्के हिंदीभाषिक मतांपैकी बहुतांश मते भाजपला मिळाली. बिहार व महाराष्ट्रात रालोआस 95 टक्के जागा जिंकण्यात यश मिळाले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना व बिहारमध्ये जदयु या स्थानिक पक्षांना हाताशी घेऊन वेळ पडल्यास त्यांच्याकडे नमते घेऊन युती केली. महाराष्ट्रात प्रचंड ताणाताणीनंतर भाजप-शिवसेना सोबत लढले. राष्ट्रवाद व विकास मुद्द्यांवर युतीला स्वत:च्या 41 जागा राखण्यात यश आले, तर काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांचा संताप, न्याय योजनेचे आश्‍वासन देऊनही गटबाजीमुळे अयशस्वी ठरला. आघाडीस पाचच जागा मिळाल्या. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात कॉँग्रेस यशस्वी ठरली असती तर त्यांना त्याचा मोठा फायदा झाला असता, हे निकालानंतर पटले आहे. बिहारमध्ये भाजप-जदयु आघाडीस सोशल इंजिनिअरिंगचा फायदा झाला. भाजपने 17 सवर्णांना, तर जदयुने 17 पैकी 12 तिकिटे मागास व अतिमागास वर्गातील उमेदवारांना दिली. दुसरीकडे राजद व काँग्रेस पारंपरिक मुस्लिम-यादव समीकरणावर अडून राहिले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. ओडिशामध्ये राधेकृष्ण...च्या घोषणेमुळे भाजपला 8 जागा मिळाल्या. राधेचा अर्थ लक्ष्मी म्हणजे लोकसभेसाठी कमळास मत द्या व विधानसभेसाठी कृष्ण म्हणजे त्यांच्या हातात असलेला शंखचा उल्लेख केला, जे बिजू जनता दलाचे निवडणूक चिन्ह आहे.  अशा प्रकारचे निवडणूक व्यवस्थापन भाजपाला यशाकडे घेऊन गेले.
-------------------------------------------------------

0 Response to "विजयामागचे व्यवस्थापन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel