-->
बँकिंग उद्योगावर ‘लक्ष्मीं’चे राज्य

बँकिंग उद्योगावर ‘लक्ष्मीं’चे राज्य

 बँकिंग उद्योगावर ‘लक्ष्मीं’चे राज्य
 Published on 28 Jan-2012 PRATIMA
प्रसाद केरकर, मुंबई
बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी जयलक्ष्मी अय्यर, युनायडेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी अर्चना भार्गव तसेच अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शुभलक्ष्मी पानसे यांच्या झालेल्या निवडीचे स्वागत व्हावे. या महिलांनी जवळपास गेली तीन दशके बँकिंग व्यवसायात केलेल्या अजोड कामगिरीचा मोबदला म्हणून त्यांना बँकेच्या नेतृत्वपदी विराजमान होता आले आहे. अर्थात खासगी क्षेत्रातील बँका अँक्सिस बँक (शिखा शर्मा), जे.पी.मॉर्गन (कल्पना मोरपारिया) आणि आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या (चंदा कोचर) प्रमुखपदी यापूर्वी महिला आहेतच. त्यामुळे आता देशातील सहा बँकांचे नेतृत्व महिलांकडे आहे. अर्थात राष्ट्रीयीकृत बँकेच्या नेतृत्वपदी एका महिलेची निवड होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सेंट्रल बँकेच्या अध्यक्षपदी महिला होतीच; परंतु आता एकाच वेळी सहा बँकांचे नेतृत्व महिलांकडे येणे ही एक मोलाची बाब ठरावी. अशा प्रकारे बँकिंग उद्योगात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. मराठी माणसांना अभिमानाची बाब म्हणजे या सहापैकी एक शुभलक्ष्मी पानसे या मराठी आहेत. 
गेली तीन दशकांहून जास्त बँकिंग उद्योगात असलेल्या पानसे यांनी आपल्या करिअरची सुरुवात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केली. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. मिळविलेल्या पानसे यांचे वडील हवाई दलात होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण विविध शहरात झाले. मात्र करिअरची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली. एम.एस्सी. झाल्यावर त्यांनी अमेरिकेच्या डेक्सल विद्यापीठातून बँकिंग विषयात व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतले. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी तेथे अनेक जबाबदारीच्या पदांवर तसेच देशातील ठिकठिकाणी काम केले. बँकेच्या साऊथ सर्कलच्या प्रमुख म्हणून आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील राज्यात बँकेची पताका त्यांनी यशस्वीरीत्या फडकाविली. त्यांच्याच काळात महाराष्ट्र बँकेने या राज्यांमध्ये आपले पाय चांगलेच रोवले. याचे सर्व र्शेय शुभलक्ष्मी यांना जाते. बँकेत त्यांनी रिटेल बँकिंगपासून ते कॉर्पोरेट बँकिंग अशा विविध पातळ्यांवर अनेक जबाबदारीची कामे यशस्वीरीत्या हाताळली. केवळ 50 कर्मचार्‍यांच्या शाखेच्या प्रमुखपदापासून ते दोन हजार कर्मचारी असलेला विभाग ते पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सर्कलची संपूर्ण जबाबदारी त्यांनी अल्पावधित सांभाळली होती. त्या वेळीच त्यांच्या नेतृत्व गुणांची चमक दिसली होती. कॉर्पोरेट कज्रे, प्रकल्प वित्त नियोजन, बँकेतील आय.टी.चे जाळे यात त्यांनी विशेष प्रावीण्य दाखवले आहे. बँकेचा व्यवसाय वाढविण्यासाठी लागणारे नियोजन, सध्याच्या स्पर्धेच्या युगात सांभाळाव्या लागणार्‍या अनेक किचकट बाबी यात पारंगत असलेल्या शुभलक्ष्मी यांची वाटचाल थक्क करणारी आहे. अलाहाबाद बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त होण्याअगोदर त्या विजया बँकेच्या कार्यकारी संचालिका होत्या. आता अलाहाबाद बँकेच्या सर्वोच्चपदी पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. 
prasadkerkar73@gmail.com

0 Response to "बँकिंग उद्योगावर ‘लक्ष्मीं’चे राज्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel