-->
चोख प्रत्यूत्तर हवे!

चोख प्रत्यूत्तर हवे!

शनिवार दि. 16 फेब्रुवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
चोख प्रत्यूत्तर हवे!
पाकपुरस्कृत दहशतवादाने आता कहर केला आहे. जम्मू महामार्गावर केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर अतिरेक्यांच्या आत्मघातकी पथकाने केलेल्या हल्यात 42 जवान शहीद झाले आहेत. गेले काही वर्षे पाकिस्तान भारताशी अशा प्रकारे अतिरेक्यांच्या माध्यमातून छुपे युध्दच खेळत आहे. हल्याचा देशातून तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून निषेध होत आहे. अशा प्रकारचा देशात जवानांवर झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्याचा निषेध करताना आपल्या बाजूने देखील ज्या सुरक्षीततेच्या बाबतीत जे ढिसाळपणा झाले आहेत त्यावरही कटाक्ष टाकला पाहिजे. एक तर हे पूर्णपणे सुरक्षा यंञणेचे तसेच गुप्तचर यंञणेचे अपयश आहे. यावेळी वापरण्यात आलेली स्फोटके किमान 200 किलो होती असा अंदाज आहे. एवढी स्फोटके ही काही एका राञीत आलेली नाहीत. गेली कित्येक दिवस ती आणली जात असणार. परंतु त्याचा अजिबात पत्ता आपल्या सुरक्षा यंञणेला लागू नये हे मोठे दुर्दैव आहे. त्याचबरोबर या कामी काही प्रमाणात स्थानिकांचीही मदत घेतली गेल्याचा संशय आहे. खरे तर स्थानिकांच्या मदतीशिवाय ही एवढी मोठी कामगिरी पार पाडली जाऊ शकत नाही. त्यादृष्टीने विचार करता आपली गुप्तचर यंञणा काय करीत होती असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे पुढील काळात आपल्याला सीमा भागातील गुप्तचर यंञणा अधिक कडक करावी लागणार आहे. यापूर्वी सरकारने सर्जिकल स्ट्ाईक केल्यावर आपलीच पाठ थोपटून घेऊन त्याचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शञु पक्ष अधिकच चवताळला होता. अशा घटनांचे राजकीय श्रेय लाटणे चुकीचेच आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे शञु पक्षाच्या हद्दीत जाऊन हल्ले करण्यात आले होते. परंतु त्याचा गवगवा झाला नव्हता. सर्जिकल स्टाईक केल्यावर आता त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे, आता ते गप्प झाले, आपण त्यांना कसा धडा शिकवला या गुर्मीत सरकार होते. परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती हे कालच्या हल्यावरुन सिध्द झाले. निमलष्करी दलाची एवढ्या मोठ्या संख्येने हालचाल होत असताना त्यासाठी जी सुरक्षा घेतली पाहिजे होती ती न घेण्यामागे असलेल्या ढिसाळपणाचीही चौकशी झाली पाहिजे. आता पंतप्रधान म्हणतात की, आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही. मोदींचे हे विधान स्वागतार्ह असले तरी नेमका धडा आता देशात निवडणुका तोंडावर आल्या असताना काय शिकविणार? हा देखील प्रश्‍न आहे. मोदी धडा शिकविणार म्हणजे, थेट युध्द करुन पाकिस्तान बेचिराख करणार की पुन्हा सर्जिकल स्टाईक करणार की छुपे युध्द पाकसारखेच खेळणार? भविष्यात ते समजेलच. पंतप्रधानानी ते जाहीर करणेही योग्य ठरणार नाही. आता निवडणुका आल्याने त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी एखादी कारवाई करण्याचा घाट घातला जाऊ शकतो. परंतु ज्यावेळी मोदी विरोधात होते त्यावेळी ते ज्या आक्रमकतेने बोलत असत तशी भाषा आता त्यांच्या तोंडी नाही. त्यावेळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसवर टीका करताना त्यांनी आपला एक सैनिक मारला तर त्यांचे दहा मारले पाहिजेत अशी भाषा केली होती. गेल्या साडेचार वर्षात तरी असे काही झालेले दिसले नाही. त्यामुळेत अतिरेक्यांच्या व पाकिस्तानच्या धैर्यात वाढ झाली आहे. आता निवडणुका तोंडावर आल्या असताना फार मोठी कारवाई सरकार करु शकत नाही. किंवा हे निमित्त करुन निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. नाही तरी सत्ताधारी भाजपाला सध्या काही पुन्हा सत्तेत येण्यासाठी पोषक वातावरण नाही आहे. त्यामुुळे या हल्याचे निमित्त करुन काही काळ निवडणुका पुढे ढकलून आपली 56 इंचाची छाती दाखवून मगच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. सध्याचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. परंतु सध्याच्या स्थितीत हा अगदी टोकाचा व शेवटचा पर्याय असेल. सरकारने आपले राजकीय हित डोळ्यापुढे न ठेवता लष्कराशी चर्चा करुन यासंबंधी निर्णय घेणे गरजेचे ठरेल. कारण गेल्या साडेचार वर्षात आपण शेजारच्या देशांबरोबर संबंध काही चांगले ठेवलेले नाहीत. चीन, नेपाळ, भूतान या देशांशी संबंध चांगले टिकवले नसल्याने पाकवर जर आपण हल्ला केल्यास हे देशही आपल्याला पाठिंबा न देता पाकला मदत करु शकतात. अशा वेळी आपल्या नेहमीचा शञू असलेल्या पाकला आंगावर घेताना इतर सीमा शाबूत ठेवण्याची सक्षमता आपल्याकडे आहे का, याचा विचार करावा लागेल. केवळ राणाभीम देवी थाटात घोषणा करुन भागत नाही तर आपल्या लष्कराची क्षमता व शञुपक्षाची ताकद याचाही परिपूर्ण विचार करावा लागतो. सरकारमध्ये असताना निर्णय घेणे व विरोधात असताना मते मिळविण्यासाठी अवास्तव घोषणा करणे यात फरक असतो हे आता या हल्यानंतर मोदींना पटले असेल. आज समाजमन चोख उत्तर देण्याच्या बाजूने आहे, लोकांची ही मागणी व अपेक्षा मोदी पूर्ण करु शकतील का हा सवाल आहे.
----------------------------------

0 Response to "चोख प्रत्यूत्तर हवे!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel