-->
आली दिवाळी आणि गेलीही...

आली दिवाळी आणि गेलीही...

रविवार दि. 11 नोव्हेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
आली दिवाळी आणि गेलीही...
----------------------------------------
दिवाळी कधी आली आणि गेली त्याचा आपल्याला पत्ताही लागला नाही. खाण्याचे खमंग पदार्थ व पहाटेचा गारवा सुरु झाला की कर्‍या अर्थाने दिवाळीची चाहूल लागते. थंडीची चाहूल लागल्याने हवेतील वातावरण छान असते. शेतकर्‍यांच्या घरात नवीन धान्य आलेले असते. त्यामुळे एक वेगळीच प्रसन्नता घरात येते. दिवाळीच्या निमित्ताने अभ्यंगस्नानापासून फराळापर्यंत आणि पाडव्यापासून-भाऊबिजेपर्यंत विविध निमित्ताने जीवनाचे बंध दृढ करणारे दिवस असतात. दिवाळीला फटाके उडवून आनंद व्यक्त करण्याची, मातीचे किल्ले बांधण्याची आणि रांगोळया घालण्याची आपल्याकडे परंपरा आहे. जोडीला साहित्यिक फराळ देणारे दिवाळी अंक, व्यापार्‍यांचे वहीपूजन आणि लक्ष्मीची कृपा रहावी यासाठी लक्ष्मीपूजन असा सगळा दीपावलीचा उत्सव असतो. दिवाळी म्हणजे खर्‍या अर्थाने प्रकाशपर्व. अज्ञानाचा दिवा मालवून आपण स्वच्छ विज्ञानवादी विचारांच्या पर्वात यानिमित्ताने प्रवेश करतो. अंधाराचा, अज्ञानाचा, अंधश्रध्दा संपुष्टात आणून आनंदाचे प्रकाशपर्व दिवाळीपासून सुरु होते. यंदा शेवट्या टप्प्यात पावसाने निराशा केली व दुष्काळाचे ढग जमा झाले. त्याची कटू छाया यंदाच्या दिवाळीवर होती. गेल्या दोन वर्षात देशावर दुष्काळाचे सावट कमी होतेे. दोन वर्षापूर्वी अल् निओच्या सावटामुळे पाऊस वर्षे कमी झाला होता, त्यामुळे दुष्काळ होता. यंदा देखील पुन्हा एकदा दुष्काळाचे चित्र उभे राहिल्यामुळे निराशेची छाया दिवाळीवर होती. उद्योग क्षेत्रातही अजून चैतन्य आलेले नाही. अर्थात ही स्थिती केवळ आपल्याकडील नाही तर जगातील आहे. जगातील मंदीचे चक्र अद्याप पूर्ण झालेले नाही. अमेरिकेत हळूहळू मंदीच्या स्थितीत सुधारणा होते आहे, अशी स्थिती आहे. मात्र अर्थव्यवस्था उभारी घेत आहे, असे वाटते व पुन्हा एकदा मंदीचे चक्र वेग घेते. आपल्याकडे मध्यमवर्गीयांची संख्या मोठी असल्यामुळे व या वर्गाकडून सतत खरेदीचा ओघ सुरु असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. आपल्याकडे पगारदार मध्यमवर्गाची, जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समर्थक आहे, अशा वर्गाची स्थिती थोडी बरी आहे. परंतु याच वर्गातील तरुणांच्या हाताला कामे नाहीत. दोन वर्षांपूर्वी दिवाळी झाली आणि सरकारने नोटाबंदी केली. यानंतर आपल्या अर्थव्यवस्थेची गती रोखली गेली. अर्थात यामुळे काळा पैसा बाहेर पडेल हे उद्दिष्ट काही साध्य होऊ शकले नाही, होणारही नव्हते. नोटाबंदीमुळे रांगेत उभे राहाणार्‍या बिचार्‍या दोनशेहून जास्त जणांचे हकनाक बळी गेले. नोटाबंदीमुळे अतिरेकी कारवायांना आळा बसेल, खोट्या नोटा बाद होतील व काळा पैसा बाहेर येईल या तीनही बाबी फ्लॉप ठरल्या. त्यानंतर जी.एस.टी.चा घोळ सुरु झाला. जी.एस.टी.ही जगाने मान्य केलेली करपध्दती आपण आता स्वीकारली आहे. मात्र त्यासाठी धिमेपणाने पावले उचलणे गरजेचे होते. मात्र सरकारने याच्या अंमलबजावणीत घाई केल्याने अनेक प्रश्‍न भेडसावित आहेत. अजूनही जी.एस.टी.च्या बाबतीत नाराजी आहेच. यंदाच्या दिवाळीत आपल्याकडे बाजारात बर्‍यापैकी शुकशुकाट होतो. अगदी शेवटच्या दोन दिवसात अनेकांनी एक सोपस्कार म्हणून खरेदी केली. लोकांच्या हातातील रोकड कमी झाली आहे. त्यातच सध्या बरीच मोठी बाजारपेठ ऑनलाईन कंपन्यांनी काबीज केल्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करणार्‍यांची संख्या घटत चालली आहे. एका आकडेवारीनुसार, सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची ऑनलाईन खरेदी गेल्या महिन्याभरात झाली आहे. अर्थात ही खरेदी शहरांप्रमाणे ग्रामीण भागातूनही झाली आहे. आपला देश सर्वात तरुण असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतो, मात्र या तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातच अशिक्षित बेेकार आहेत त्यांना रोजगार पुरविणे हे सरकारपुढील एक मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान सरकार कसे पेलते यावर बरेचसे अवलंबून राहील. मेक इन इंडिया अंतर्गत मोठी गुंतवणूक देशात येणार अशी हवा निर्माण केली गेली. परंतु प्रत्यक्षात अजून काहीच हाती लागलेले नाही. मेक इंडिया अंतर्गत फॅक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली गेली. परंतु आता या कंपनीने या प्रस्तावाबाबत माघार घेतल्याने सरकारची मोठी गोची झाली. त्यामुळे या नवीन सरकारच्या काळात कोणते नवीन उद्योग आले असे विचारल्यास ठोस उत्तर देता येत नाही. उद्योगांना सिंगल विंडो पध्तीने परवाने देण्याच्या केवळ घोषणा करतो, मात्र प्रत्यक्षात तसे काही होत नाही. त्यामुळे अनेक उद्योजक नाराज आहेत. आपल्याकडची लाल फितीची नोकरशाही कधी कमी होणार हा खरा सवाल आहे. जागतिक बँकेच्या नव्या अहवालात व्यवसाय करण्यास सुयोग्य देशांच्या यादीत 190 देशांमध्ये भारताचा क्रमांक 130वा लागला आहे. आता यंदा या क्रमांकात पहिल्यांदाच सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षात जगभर दौरे काढून गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले परंतु भारतात गुंतवणूक करण्यास पोषक वातावरणच नाही. हे फॅक्सकॉनच्या एक्झीटमुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत नियम-कायदे यामध्ये बर्‍याच सुधारणा करूनही इतकी कमी प्रगती कशी झाली, असा प्रश्‍न पंतप्रधान कार्यालयाला पडला आहे. परंतु, डोळसपणे पाहिले तर लहान-मोठ्या शहरांतून आजूबाजूला जे दिसते त्याचे योग्य प्रतिबिंब या अहवालात पडल्याचे लक्षात येते. चीनने आपल्या तुलनेत ज्या झपाट्याने प्रगती केली आहे त्याचे मॉडेल आपण डोळ्यापुढे ठेवून काम करण्याची गरज आहे. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर तो उत्साहाचा सण आहे. दिवाळी झाल्यावर आपण आपल्या आयुष्यातील अंध:कार मिटविण्यासाठी आतापासून प्रयत्न केला पाहिजे. या देशातून गरीबी, दारिद्र्य, बेकारी संपविण्यासाठी आपले प्रयत्न कामी आले पाहिजेत. आशिया खंडातील एक प्रगत देश व उत्तम गुंतवणुकीचे स्थळ म्हणून आपले नाव पुढे आल्यास आपण झपाट्याने प्रगती करु शकतो. हे करण्यासाठी सर्वांच्या एकजुटीची गरज आहे. दिवाळीच्या मंगल समयी आपण गरिबीचा, दारिद्य्राचा अंध:कार मिटविण्याचा संकल्प आपण केला, परंतु ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी आता प्रयत्न झाले पाहिजेत. अर्थात हे काम सोपे नाही. झटपट लोकप्रिय होणार्‍या घोषणा करुन आपणच कसे राष्ट्रप्रेमी आहोत याची चढाओढ करण्यापेक्षा प्रत्यक्ष देशासाठी प्रत्येकाने काही ना काही तरी ठोस केले पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे, त्याला विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या लोकशाहीचा हा गाभा आहे. दिवाळी आता संपली आहे, मात्र याची याची आठवण करुन देण्याची सध्या आवश्यकता आहे.
-------------------------------------------

0 Response to "आली दिवाळी आणि गेलीही..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel