-->
गुजरात भाजपातील बंड / मराठीचा गौरव

गुजरात भाजपातील बंड / मराठीचा गौरव

सोमवार दि. 02 जुलै 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
गुजरात भाजपातील बंड
पक्षात बंड होणे ही बाब काही नवीन नाही, परंतु भाजपासारख्याा शिस्तप्रिय व संघाच्या मुशीतून तयार झालेल्या पक्षात बंड होणे ही बाब अशक्यच. परंतु हा इतिहास झाला. भाजपामध्ये देखील पक्षात बंड होतात व तेही बंड पंतप्रदान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुख्य अड्डा असलेल्या गुजरात राज्यात. त्यामुळे भाजपाचे कॉग्रेसीकरण जाल्याचा हा एक उत्तम पुरावा ठरावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा ही जोडी मिशन 2019च्या तयारीला लागली असतानाच, गुजरात भाजपामध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे ठिगळ लावायला जात असताना दुसरीकडे भगदाड पडावे अशी स्थिती मोदी-शहा जोडीची झाली आहे. गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांचा रोख मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आपणच नाही, तर 20 आमदार भाजपावर नाराज असल्याचा दावा या त्रिकुटाने केला आहे. खरे तर गुजरात म्हणजे भाजपाचा गड व हिंदुत्वाची कार्यशाळा. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांचा बालेकिल्ला. सरकारविरोधी वातावरण असतानाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजपाचं कमळ कसेबसे उमलले. मात्र मोदी-शहा दिल्लीत व्यग्र असताना त्यांच्या किल्ल्यात अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि त्यांना उत्तरदायी आहोत. परंतु, गुजरातमधील सरकारी अधिकारी आमचे म्हणणे ऐकतच नाहीत, अशी तक्रार आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी केली आहे. हे प्रकरण थेट दिल्ली दरबारी घेऊन जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, सरकारी बाबूंच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे आमदार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यातच मुख्यमंत्री रुपानी हे सध्या इस्रायलच्या दौर्‍यावर असताना त्यांनी ही तोफ डागली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आमदारांनी हा मुद्दा उचलला, हे सूचक असल्याचे विश्‍लेषक सांगतात. दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांनी गुजरातला भेट दिली होती. 2019 च्या निवडणुकीबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केली होती. या दौर्‍यानंतर लगेचच भाजपा आमदारांच्या नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे मोदी-शहांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विदानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून सत्ता निसटली होती. भाजपाने कसे बसे आपले पाय सत्तेत रोवले असताना जर अशा प्रकारची बंडाळी होते, हे भाजपासाठी काही सुचिन्ह नाही.
मराठीचा गौरव
देसात 2011 मधील जनगणनेच्या आधारे सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषेत मराठीने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांत बोलल्या जाणार्‍या तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिसर्‍या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण 41.03 टक्क्यांवरून 43.63 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर बंगाली भाषा ही दुसर्‍या स्थानी आहे. देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी जनगणनेच्या आधारे तयार करण्यात आली आहे. मराठी भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये वाढले आहे. 2001 मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण 6.99 टक्के होते. 2011 मध्ये हे प्रमाण 7.09 टक्क्यांवर पोहोचले. मराठीने याबाबतीत तेलुगूला मागे टाकले आहे. तेलुगू मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण घटले आहे. तेलुगू भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण 7.19 टक्कयांवरून 6.93 टक्क्यांवर घसरले. हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण 2001 च्या तुलनेत वाढले आहे. 2001 मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण 41.03 टक्के होते. 2011 मध्ये हे प्रमाण 43.63 टक्क्यांवर पोहोचले आहे. बंगाली भाषा दुसर्‍या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण 8.1 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून 2001 मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती. आता गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे. देशातील 2.6 लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील 1.06 लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे, तर इंग्रजी मातृभाषा असलेल्यांच्या यादीत तामिळनाडू दुसर्‍या स्थानी आहे. राष्ट्रीय भाषा सूचितील 22 भाषांपैकी संस्कृत ही सर्वात कमी बोलली जाणारी भाषा ठरली आहे. मराठी आता तिसर्‍या क्रमांकावरुन अजूनही एक क्रमांक वर जाऊ शकते. परंतु मराठी लोकांनी आपले भाषेचे प्रेम जागृत ठेवले पाहिजे. मराठी भाषा हे आपले गौरव आहे, असे अजून मराठी माणसांना वाटत नाही. इंग्रजी ही व्यवहाराची जागतिक पातळीवरील भाषा असली तरी मराठी ही आपली मातृभाषा आहे व तिचा आपण सन्मान आपल्याला तिला समृध्द करुन करावा लागणार आहे, तेवढी कळकळ मराठी भाषिकांमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे.
----------------------------------------------------------------- 

Related Posts

0 Response to "गुजरात भाजपातील बंड / मराठीचा गौरव "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel