-->
अस्मितांचे पूर

अस्मितांचे पूर

गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
------------------------------------------------
अस्मितांचे पूर 
पद्मावती चित्रपटांच्या निमित्ताने सध्या अस्मितांचे पूर वाहू लागले आहेत. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे, या अस्मितांना राजकीय पातळीवर खतपाणी घालण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या पुरांना उत आला आहे. या चित्रपटातील कथित आक्षेपार्ह दृश्ये काढल्याखेरीज तो प्रदर्शित करू नये, अशी या निदर्शकांची मागणी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील चपळता दाखवून या मागणीत तेल ओतले. मौर्यांनी राणी पद्मावतीचा अपमान करणार्‍या अल्लाउद्दीन खिलजी यास थेट मुघल ठरवून आपल्या संकुचित बुध्दीमत्तेचे दर्शन घडवले. या देशातील प्रत्येक मुसलमान म्हणजे परदेशातून आलेला मुघलच, असेच जर त्यांच्या डोक्यात भरवले गेले आहे, त्यामुळे त्यांची ही मानसिक विचारधारा तशीच कायम आहे. काही जणांनी तर या चित्रपटाच्या नायिकेचे नाक कापण्याच्या वल्गना केल्या. कथेतील पद्मावतीने केलेल्या जोहाराचे दु:ख समजून यावे म्हणून काहींनी दीपिकाच्या प्रतिमांचे दहन केले. अन्य काहींनी तिला मारणार्‍यांना एक ते दहा कोटींचे इनाम जाहीर केले. एकूणच हे सर्व वातावरण पाहता आपला देश कुठे चालला आहे व इतिहासाचा आपण विपर्यास असा किती काळ करु देणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. राजस्थानपाठोपाठ मध्यप्रदेश आणि पंजाब सरकारनेही पद्मावती या चित्रपटाच्या राज्यातील प्रदर्शन रोखून धरले आहे.  या चित्रपटासंबधीचा वाद वाढतो आहे आणि दररोज काही ना काही वाद उपस्थित केले जात आहेत. याच्या परिणामी या चित्रपटाचे प्रदर्शन तूर्तास पुढे ढकलण्यास आले आहे. सद्या देशातील वातावरण पाहता नजिकच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होईल असे वाटत नाही. कारण यात आता या राजकारण्यांनी व सत्तेत असलेल्यांनी  याविषयी लोकांच्या भावना भडकाविण्यस सुरुवात केल्याने परिस्थिती आणखीनच वाईट होणार आहे. आपल्याकडे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेन्सॉर बोर्ड आहे व त्यांनी काही ठिकाणी कात्री लावण्यास सुचविले आहे. अशा वेळी त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तसेच आता काही इतिहासतज्ज्ञांना हा चित्रपट दाखवून त्यांची मते आजमावली जाणार आहेत. परंतु याने आणखीनच हा प्रश्‍न गुंतागुंतिचा केला जाणार हे नक्की. अर्थात त्यामुळे सरकारच्या सेन्सॉर बोर्डाच्या पलिकडे आणखी कुणी आहे यावर आपण अप्रत्यक्षरित्या शिक्कामोर्तब करीत आहोत. त्याचवेळी या चित्रपटाच्या निमित्ताने जाहीर धमक्या देण्याची एक नवीन प्रथा आता सुरु झाली आहे. याचा निषेध झाला पाहिजे. सेटवर जाऊन तोडफोड करणे, एका आघाडीच्या अभिनेत्रीचे नाक कापून टाकण्याची, तिला जाळण्याची धमकी देणे हे आपल्या लोकशाही रुजलेल्या भारतासारख्या देशास शोभणारे नाही. अशा जाहीर धमक्या दिल्या जात असताना कोणावर कारवाई होत नाही आणि कोणाला जाबही विचारला जात नाही, हे तर अधिकच गंभीर आहे. यात ज्यावेळी सत्ताधारी वादात पडतात त्यावेळी अशा शक्ती मुक्तपणाने वावरतात व त्यांना स्पुरण चढलेले दिसते.  चित्रपट, नाटक, साहित्य आणि त्याच्याशी संबंधित वाद आणि राजकीय पक्षांनी, सत्ताधार्‍यांनी पक्षपातीपणे एखाद्या गटाच्या, एखाद्या विचाराच्या बाजूने उभे राहणे आपल्याला सवयीचे आहे. परंतु कायद्याचा अधिक्षेप करीत जाहीर धमक्या देणे, सरकारच्या प्रतिनिधीने स्वतःच चित्रपटांच्या निवडीत हस्तक्षेप करणे, यातून जो सांस्कृतिक दहशतवाद फोफावतो आहे, त्यातून आपल्याला भविष्यात याचे वाईट परिणाम भागावे लागणार आहेत. इतिहासाचा अर्थ सोयीने लावता येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जो विजोता असतो त्याच्या बाजूने नेहमीच इतिहास लिहला जातो, असे एक अलिखीत सुत्र आहे. इतिहासातील अनेक घटनांचे अनेकदा निस्संशय पुरावेही नसतात. त्यात साहस, प्रेम, बलिदान, संघर्ष, कर्तव्य अशा मानवी भावनांचे थक्क करणारे आविष्कार असतात आणि ते जात, धर्म, प्रांत, लिंग यांच्या पलीकडे असतात. या कथांकडे अस्मितांचे चष्मे घालून पाहण्याची वृत्ती जसजशी वाढेल, सरकार अशा प्रवृत्तींबाबत बोटचेपी भूमिका घेईल, तसतसा कलांचा आत्मा हरवत राहील. त्यामुळे पद्मावती या चित्रपटाकडे इतिहासाच्या नव्हे तर एक कलाकृती म्हणून पाहले जाणे आवश्यक आहे. यात झालेली टिका, एखादी भूमिका वास्तवातली नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपण हे जर वास्तव स्वीकारले नाही तर आपल्याला भविष्यात अनेक चांगल्या कलाकृतींना मुकावे लागेल. यापूर्वी असा अनेक चित्रपटांना विरोध झालेला आहे. मात्र तो मिटविण्यात आला. याचे कारण त्यात सत्ताधारी तटस्थ राहिले होते. आता मात्र नेमके उलटे झाले आहे. अन्यथा केवल करमणूक डोळ्यापुढे ठेवून चित्रपट निर्माण केले जातील. अनेकदा चित्रपटाकडे लक्ष वेधले जावे यासाठी काही तरी त्यातील वाद उकरुन काढण्याची निर्मात्यांना हुक्की असायची. अशा अनेक घटना यापूर्वी झाल्या आहेत. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. हा चित्रपट अद्याप कोणीही पाहिलेला नसताना केवळ काही सेकंदाच्याक्लिपवरुन हे काहूर माजविले जात आहे. अर्थात यातून सामाजिक वातावरण गढूळ होणार नाही, याची खबरदारी कलावंत आणि समाज या दोघांनीही घेतली पाहिजे. तसेच चित्रपट हा कलाकृती म्हणून पहावा त्यात इतिहास डोकावला जाऊ नये, हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
-------------------------------------------------------------

0 Response to "अस्मितांचे पूर "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel