-->
कोकणासाठी स्वतंत्र   विद्यापीठाची आवश्यकता

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता

गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
कोकणासाठी स्वतंत्र 
विद्यापीठाची आवश्यकता
सध्या मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कोकणातील महाविद्यालये येतात, त्यातून मुंबई विद्यापीठावर बराच ताण येतो. विद्यापीठाची क्षमता नसतानाही त्यांंच्यावर वाढीव काम लादले जात आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा जर भार कमी करावयाचा असेल तर कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे हाच उपाय ठरु शकतो. यासाठी आपल्याला शेजारच्या चीनचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवता येईल. चीनमध्ये उच्च शिक्षण देणारी सुमारे दोन हजार विद्यापीठे आहेत. यात विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते. स्थानिक भाषांपासून ते इंग्रजीत यात शिक्षण देण्यात येते. त्यातुलनेत आपल्याकडे देशात केंद्रीय, खासगी, अभिमत अशी सर्व मिळून 800 विद्यापीठे आहेत. त्यातील 54 विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. आपल्याकडील देशातील तरुणांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता विद्यापीठांची लोकसंख्या कमीच आहे. त्यामुळे जशा प्रकारे जास्त लोकंसख्या असलेल्या भागात विद्यापीठांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असणार आहे, तसेच सध्याच्या ज्या विद्यापीठांवर ताण आहे त्यांचा भार हलका करण्यासाठी त्यांचे विभाजन करुन नवीन विद्यापीठांची गरज भासणार आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत 764 महाविद्यालये येतात. त्यातुलनेत विद्यापीठाकडे कर्मचार्‍यांची कुमक नसल्याने एकूणच सर्व कारभाराला विलंब होतो. यातून यंदाच्या वर्षी परीक्षांचे निकाल उशीरा लागले. यात नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचे. परंतु याकडे फारसे कुमी लक्ष दिले नाही. त्यामुले एका विद्यार्थ्याने तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. ही परिस्थीती लक्षात गेता मुंबई विद्यापीठातून जर कोकण विभाग स्वतंत्र काढून त्याचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले तर विद्यार्थी, पालक, प्राध्यापक या सर्वांनाच यातून दिलासा मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाला मोठा इतिहास आहे, याची स्थापना 1857 साली झाली. देशात जी पहिली तीन विद्यापीठे स्थापन झाली त्यात हे विद्यापीठ होते. परंतु आता हे विद्यापीठ प्रशासकीय गोंधळामुळे आता रसारतळाला गेले आहे, हे मोठे दुर्दैवी असेच आहे. परीक्षांच्या ऑनलाईन निकालांमध्ये प्रचंड गोधळ झाल्याने विद्यापीठाची बेअबू झाली आणि कुलगुरुंना जावे लागले. मुंबई विद्यापीठाची स्वतःची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती, ती पार धुळीला मिळाली आहे. यावर उपाय म्हणून कोकण विद्यापीठ जर स्थापन करण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरीमधील 45, सिंधुदुर्गमधील 38, दक्षिण रायगडमधील 20 अशी मिळून एकूण 103 महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोंकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज ठरली आहे. डॉ. राम ताकवले समितीने मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाचे विभाजन करुन नवीन स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची सूचना केली होती. तसेच त्यागराजन समितीने प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक विद्यापीठात किमान 100 महाविद्यालयांच्या निकषांमध्ये कोंकण विद्यापीठाचा समावेश होऊ शकतो. अशा प्रकारे लहान विद्यापीठांची स्थापना झाल्यास विद्यापीठ अधिक कार्यक्षमतेने काम करुन शैक्षणिक विकास गतीने होण्यास मदत होईल. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच व्यापारी जहाज वाहतुकीसंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरु करता येईल. कोकणच्या किनारपट्टीवर एकही मत्स्यविद्यापीठ नाही. तसेच बंदर विकासाला लागणारे मनुष्यबळ पुरविणारा एकही अभ्यासक्रम उपलब्ध नाही. आज कोकणात बंदर व जहाज व्यवसायात 25 ते 30 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, परंतु प्रशिक्षित उमेदवार नसल्याने कोंकणातील तरुण बेकार राहण्याची शक्यता अधिक आहे. चेन्नईच्या मेरीटाइम विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरु करण्यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्र काहीच काम करीत नाही. त्यासाठी स्वतंत्र्य विद्यापीठ स्थापन करुन स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम विकसीत करुन स्थानिकांना रोजगार कसे मिळतील ते पाहणे गरजेचे आहे. मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमावर शहरी पगडा आहे. कोंकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करतांना कोंकणी संस्कृतीचा प्राधान्याने विचार करता येईल. कोंकणातील तीनही जिल्ह्यांत भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्‍न समान आहेत. कोकणात दहावी व बारावी परीक्षांमध्ये मुली नेहमीच आघाडीवर असतात. या मुलींसाठी पुढील शिक्षण त्यांना आवडीचे मिळावे व त्यातून त्यांना भविष्यातील करिअर उभारता येईल असे अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे. कोकणामध्ये परीक्षेमधील कॉपीचे प्रमाण शून्य असल्यामुळे परीक्षा व्यवस्थेची गुणवत्ता अधिक वाढीस लागेल. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण होईल. देश व विदेशांतील विद्यापीठांशी स्वतंत्रपणे करार करुन कम्युनिटी कॉलेजसारखे प्रकल्प यशस्वीपणे राबविता येतील. कोकणात अनेक प्राध्यापकांचा अनुभव व सखोल ज्ञान व दूरदृष्टी यांचा उपयोग विद्यापीठाला घेता येईल. या नवीन विद्यापीठाला कोकणचे निसर्गसंपन्न व शांत वातावरण संशोधनाला अधिक पोषक होईल. कोकणातील दापोलीच्या कृषी विद्यापीठाने तसेच लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाने आपले नाव अल्पावधीत कमावले आहे. त्याच धर्तीवर हे नवीन विद्यापीठ कोकणातील मुलांसाठी एक नवी संधी देणारे ठरु शकते. कोकणातील लोकप्रतिनिधी, सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक,  प्राध्यापक, संघटना, विद्यार्थी संघटना, विद्यापीठाच्या मागणीसाठी एकवटल्या आहेत. लोकमान्य टिळक, डॉ. आंबेडकरांच्या कोंकणात स्वतंत्र कोंकण विद्यापीठ झाल्यास विद्यार्थ्यांना स्वत:चे असे उच्च शिक्षणाचे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. यातून भविष्यातील कोकण घडू शकतो.
-----------------------------------------------------

0 Response to "कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel