-->
एक महत्वाचे पाऊल

एक महत्वाचे पाऊल

संपादकीय पान मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
एक महत्वाचे पाऊल
देशातील सर्वात मोठ्या असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समूहातील पाच बँकांचे विलीनीकरण करण्याचा सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांचे विलीनीकरण केले जाईल. खरे तर डॉ. मनमोहनसिंग यांच्या कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र विविध कामगार संघटनांच्या दबावापुढे त्यांना याची अंमलबजावणी करणे कठीण गेले होते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार बहुमतात असल्याने ते यासंदर्भात ठोस निर्णय घेऊ शकत असल्याने त्यांनी कामगार संघटनांना बाजूला करुन हा निर्णय घेतला आहे. यातून तयार होणारी स्टेट बँक ही एक महाकाय बँक होणार असल्याने बँकिंग उद्योगासाठी हा एक महत्वाचा निर्णय ठरणार आहे. 1955 साली ब्रिटिश काळात सुरू झालेल्या मुंबई, कोलकता व मद्रास (चेन्नई) येथील इंपिरिअल बँका (राजेशाही बँका) यांचे एकत्रीकरण करून त्यांचे राष्ट्रीयीकरणही करण्यात आले. त्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया जन्माला आली. मात्र यातील काही बँकांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यात आले. त्यांचे नाव स्टेट बँक असेच असले तरीही त्यांचे कामकाज स्वतंत्रपणे चाले. अगदी यातील काही बँकांची शेअर बाजारातही नोंदणी करण्यात आली होती. ब्रिटिश काळात इंपिरियल बँका 1935 पर्यंत देशाच्या मध्यवर्ती बँकेचे काम करीत. नंतर 1955 पर्यंत त्या बँका त्यांच्या शाखांमार्फत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधी तथा ट्रेझरी बँक म्हणून काम करू लागल्या. 1970 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आणखी 17 बँकांचे राष्ट्रयीकरण केले यातून देशाच्या अर्थकारणाला गती मिळाली. बँका गावोगावी पोहोचण्यास यातून मदत झाली. मात्र 91 साली अर्थव्यवस्था खुली करण्यास प्रारंभ झाल्यावर सरकारने पुन्हा एकदा खासगी उद्योगांना बँक स्थापन करण्यास परवानगी दिली. अर्थात देशातील राष्ट्रयीकृत बँकांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले. त्यांचे काही खासगीकरण करण्यात आले नाही. नवीन पिढीच्या खासगी बँकांमुळे राष्ट्रीयकृत बँकांना खर्‍या अर्थाने स्पर्धा करावी लागली. यातून या बँकांची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. स्टेट बँकेच्या सर्व उपकंपन्या विलीन करण्याची सूचना नरसिंहम समितीने केली होती. आज आपला देश एवढा मोठा आहे पण जागतिक पातळीवरील बँकांची आकडेवारी पाहता आपल्याकडील एकही बँक जगातील आघाडीच्या शंभरात येत नाही. त्याउलट चीनमध्ये अनेक मोठ्या बँका आहेत. अशा प्रकारे बँक मोठी असेल तर तिची धोका पत्करण्याची क्षमता वाढते. सध्याच्या काळात बँकांपुढील आर्थिक धोक खूप वाढले आहेत. परस्परातील स्पर्धा हा त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. आता स्टेट बँकाच्या विलीनीकरणातून जगातील महाकाय बँकांशी स्पर्धा करू शकणारी भारताची एक महाकाय व्यापारी बँक नजीकच्या काळात निर्माण होण्याची आशा निर्माण झाली आहे. विलीनीकरणानंतर या महाकाय स्टेट बँकेची भांडवली मत्ता 37 लाख कोटी इतकी असेल. (555 अब्ज डॉलर). या बँकेच्या एकत्रित शाखा 22,500 इतक्या होतील. या बँकेची एकत्रित एटीएमची संख्या 58 हजार असेल. या बँकेची ग्राहकसंख्या 50 कोटी इतकी अवाढव्य असेल. या बँकेची एकूण 36 देशांत पसरलेली परदेशांतील कार्यालये 191वर जातील. सरकारचे हे एक महत्वाचे पाऊल असेल व बँकिंग उद्योगातील ही एक महत्वाची घटना ठरेल.

0 Response to "एक महत्वाचे पाऊल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel