-->
जे.एन.यु.तील तरुणाईचा कल

जे.एन.यु.तील तरुणाईचा कल

संपादकीय पान सोमवार दि. १२ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जे.एन.यु.तील तरुणाईचा कल
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी संघटनांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर दिल्ली विद्यापीठावर भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनेने निर्विवाद बहुमत स्थापन केले आहे. गेल्यावेळीही अ.भा.वि.प.चे या विद्यापीठीत बहुमत होते. यावेळी कॉँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेला एक जागा मिळविता आली आहे. या निकालांच्या बाबतीत आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र जे.एन.यु. तील तरुणाई यावेळी कोेणाच्या बाजुने आपला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अर्थातच डाव्या संघटनांचे या विद्यापीठावर प्रभूत्व आहे. हे त्यांचे वर्चस्व अलिकडचे नाही तर गेली कित्येक वर्षे आहे. खरे तर जे.एन.यु. हे डाव्या विचारसारणीचे विद्यार्थी तयार करण्याची शाळाच आहे असे बोलले जाते. सध्याचे डाव्या पक्षातील अनेक आघाडीचे नेते जे.एन.यु.तून पुढे आलेले आहेत. मात्र गेल्या वर्षात या विद्यापीठातील राजकारण केंद्रातील उजव्या विचारसारणीच्या सत्तेत असलेल्या भाजपाने विनाकारण पार ढवळून काढले होते. त्यामुळे यावेळी डाव्या संघटनानांना सपाटून मारा खावा लागेल व भाजपा प्रणित अ.भा.वि.प.चा विजय होईल असे चित्र रंगविले जात होते. परंतु हे काही वास्तवात उतरले नाही. भाजपाला येथील डाव्या विद्यार्थी संघटना संपवायच्या आहेत व तेथे अ.भा.वि.प.ला सत्तेत आणावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला होता. जे.एन.यु.मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या एका सभेत पाठीमागून भारतविरोधी घोषणा झाल्या व त्याला कन्हैयाकुमारच जबाबदार आहे असे गृहीत धरुन त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. याविरोधात केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापकांनीही दंड थोपटले होते. परंतु सरकार कन्हैयाकुमारच्या विरोधात पेटून उठले होते. अर्थातच हा आरोप कोर्टात काही तग धरणे कठीण होता. त्यामुळे कन्हैयाकुमारला अंतरिम जामिन मिळाला. त्यावेळी कोर्टानेही पोलिसांना तुम्हाला देशद्रोहाचा अर्थ समजतो काय? असा सवाल केला होता. कन्हैयाकुमारला जामीन मिळणे हा सरकारचा पहिला मोठा पराभव झाला होता. एका विद्यार्थी संघटनेच्या नेत्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, यातून हा विषय किती वरिष्ठ पातळीवरुन हाताळला गेला होता याची कल्पना येते. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या संघटनेचे वर्चस्व स्थापन झाल्याने सरकारला थपड्ड लगावली गेली आहे. आता तरी सरकारने यातून बोध घेण्याची गरज आहे. यंदाची जी.एन.यु.तील निवडणूक ही थेट उजव्या विरुध्द डाव्या विचारसारणीची लढाई म्हणून लढली गेली होती. यात डाव्या संघटनानांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. डावे संपले असा घोष करणार्‍या भाजपा व संघांच्या नेत्यांना यातून चांगलीच चपराल मिळाली आहे. भाजपा व संघाला असे वाटते की, केवळ आपल्याकडेच तरुणाई खेचली जात आहे. परंतु तसे नाही आहे. डोळ्याला झापडे लावून व्यवहार केल्याने त्यांना असे जाणवत आहे. आज संघाकडे तरुणांचा ओघ जास्त असला तरीही डाव्या विचारांकडेही तरुण आकर्षित होत आहे, हेच ही निवडणूक दर्शविते. त्याचबरोबर देशद्रोहाची जी व्याख्या ब्रिटीशांनी दीडशे वर्षापूर्वी केली होती ती आता काळानुसार बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कुणीही एखादा आपल्याला पसंत नसलेला दुसरा विचार मांडणे म्हणजे देशद्रोह करणे हा विचार आता भाजपाने सोडून दिला पाहिजे. आपल्याकडे लोकशाहीची बिजे गेल्या ६५ वर्षात चांगली रुजली आहेत. येथे प्रत्येक विचारसारणीला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. फक्त आपल्या देशाच्या घटनेच्या विरोधात त्याचा विचार असता कामा नये हे आपण समजू शकतो. विचारांचा मुकाबला हा विचारानेच केला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या मनातील विचार मांडण्याची मुभा असली पाहिजे. जर एखादा विचार संपविण्यासाठी हिंसेचा मार्ग अनुसरणे आपल्या लोकशाही चौकटीत योग्य नाही. पाकिस्तानमधील जनतेचे कौतुक करणे, त्यांचे आदरातिथ्य चांगले आहे असे म्हणणे म्हणजे देशद्रोह नव्हे. अफझल गुरु हा देशद्रोही होता त्याला त्याची सजा देण्यात आली, मात्र त्याच्या विचारांचे समर्थन कोणी करणार नाही. आज आपल्या देशातील तसेच पाश्‍चिमात्य देशातील तरुणाईला स्वातंत्र्य हवे आहे, त्यांना विचार स्वातंत्र्य हवे आहे. एखादा विरोधी बाजूचाही त्यांना अभ्यास करावयाचा आहे. यात देशद्रोह कसला? भाजपाला व संघालाही यात देशद्रोह वाटतो. आपल्याकडे लोकांच्या आशा, आकांक्षा व अस्मिता आता झपाट्याने वाढल्या आहेत. जसा आर्थिक स्थर उंचावत आहे तशा या आशा, आकांक्षा विस्तारणार आहेत. आपली विचारसारणीच काय ती योग्य, आपल्या देशात हीच संस्कृती रुजली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणे आता चुकीचे ठरणार आहे. लोकांना आता त्यांच्यावर कोणता विचार लादलेला आवडत नाही. ही वस्तुस्थीती तरुणाईने आता या निवडणुकीतून या सरकारला दाखवून दिली आहे. हे मान्य करुन सरकारला आता पुढे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या संघटनेत राजकारण जरुर असावे परंतु ते व्देशाचे राजकारण नसावे. या विद्यापीठातील निवडणुकीतून भविष्यातील राजकीय नेते तयार होत असतात, हे इतिहासाने आपल्याला यापूर्वीही दाखवून दिले आहे. कन्हैया कुमार हा देशद्रोही नाही तो तरुणांचा नेता आहे, हे देखील या निवडणुकीतून अधोरेखीत झाले आहे. त्याच्याविरोधात आता सरकारने असलेली देशद्रोहाची केस मोठ्या मनाने मागे घ्यावी. परंतु हे शहाणपण हे सरकार दाखविल का? असा सवाल आहे. तरुणाईने आपला कौल दिला आहे, आता सरकारने आपला कौल द्यावा.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "जे.एन.यु.तील तरुणाईचा कल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel