-->
मातोश्रीवरील राजकारण

मातोश्रीवरील राजकारण

संपादकीय पान सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मातोश्रीवरील राजकारण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला चांगलेच उधाण आले. अर्थातच तसे होणे स्वाभाविकच होते. कारण ठाकरे फॅमिली हा विषयच नेहमी चर्चेत असतो. त्यातच हे दोघे चुलत भाऊ राजकारणात असल्याने विविध प्रकारच्या चर्चा रंगविल्या जाणे हे ओघाने आलेच. गेल्याच आठवड्यात जयदेव ठाकरे यांनी न्यायलयात दिलेल्या साक्षीनंतर एक नवे वादळ उठले. जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन वादात शिष्टाई करण्यासाठी राज यांनी उद्धव यांची भेट घेतल्याचा पहिला तर्क व्यक्त केला जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राज यांनी मातोश्रीवर जाताना अचानक जाणे पसंत केले होते. तसेच तेथे जाऊन आल्यावरही मिडियाशी काही बोलणे टाळले. अर्थात राज ठाकरे हे अशा प्रकारे गॉसिप वाढवून आपल्याला सतत प्रकाशझोतात ठेवण्यात माहिर आहेत. असो. ही दोघांची भेट केवळ सदिच्छा भेट होती, दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस झाला व त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे तेथे गेले असे म्हणून हा विषय सोडून देण्याइतपत ही भेट नव्हती. सत्तेत एकत्र असूनही शिवसेना- भाजपमधील वाढता तणाव, मुंबई-ठाण्यासह विविध महानगरपालिकांच्या तोंडावर आलेल्या निवडणुका त्याचबरोबर उद्धव- जयदेव ठाकरे या दोन भावांतील वाद याची पार्श्‍वभूमी या दोघांच्या भेटीमागे होती. त्यामुळे याबाबत ते पत्रकारांशी काही बोलले नाहीत तरी हे विषय निश्‍चितच त्यांच्या चर्चेत आले असणार हे नक्की. सध्या मुंबई उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यादरम्यान बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा वाद सुरू आहे. बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसात त्यांच्या आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी मृत्युपत्र तयार करून त्यावर बाळासाहेबांच्या सह्या घेतल्याचा आरोप जयदेव यांनी केला. त्यावरून न्यायालयासमक्ष झालेल्या उलटतपासणीत तर जयदेव ठाकरे यांनी अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे ठाकरे घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याने व्यथित झाल्यानेच राज यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.  त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीबाबत भाजपच्या गोटात सावध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून ही एक राजकीय भेट असल्याची सूचक प्रतिक्रिया प्रदेश भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांत मात्र या भेटीमुळे उत्साहाचे वातावरण आहे, अशीही चर्चा आहे. मात्र भोळ्याभाबड्या शिवसैनिकांना जर हे दोघे भाऊ एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवतील अशी समजूत असेल तर त्यांच्या आनंदावर विरजणच पडेल. या भेटीमागे कोणती कारणे असू शकतात? त्यातील पहिला अंदाज हा आहे की, उद्धव आणि जयदेव यांच्यातील वाद न्यायालयाबाहेरच मिटवा यासाठी दोन भावांत शिष्टाई करण्याच्या उद्देशाने राज मातोश्रीवर गेले होते.त्याचबरोबर दुसर्‍या अंदाजानुसार, भेट कौटुंबिक असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर घडून आल्याने दोन भावांनी राजकीय चर्चा केली असणार. भाजपने मुंबईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे या भेटीव्दारे उद्धव यांनी भाजपाला मराठी मते फुटणार नाहीत असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मनसेची सध्या घसरण सुरु आहे, त्याला आळा यातून बसू शकतो असा राज यांचा होरा असावा. शिवसेनेतून बाहेर पडून २००५ मध्ये राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केलेली असली तरी उद्धव- राज एकत्र येणार अशी चर्चा अधूनमधून होत असते. हे दोघे थेट नव्हे तर मागील दाराने जरी एकत्र आले तरी मराठी मते फुटण्याला आळा बसू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. यात शिवसेना कदाचित तिसर्‍या क्रमांकावर जाण्याचा धोक आहे, त्यावर यातून काही मार्ग काढता येतो का, यासाठीही ही भेट असू शकते. भाजपा सध्या शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा वेळी शिवसेना भाजपाच्या दबावाला बळी न पडता व सत्तेत राहूनही भाजपाचा कसा काटा काढता येईल याची आखणी करीत आहे. त्याचच एक भाग म्हणून ही भेट असू शकते. अगदी तातडीने शिवसेना व मनसे एकत्र येणार नाहीत. मात्र जवळ आल्यास त्याचा फायदा दोघांनाही होऊ शकतो. तसेच भाजपाला शह देता येऊ शकतो. गेल्यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत त्याचा फायदा शिवसेनेने उठविला होता. यावेळी राष्ट्रवादी-कॉँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. त्याचबरोबर गुजराती मतांसाठी भाजपाने आपली बेगमी केली आहे. काही भागात ही मते शिवसेनेच्या पारड्यात पडत होती. आता ही मते भाजपाच्या पदरात पडू शकतात. त्यामुळे शिवसेनेने अलिकडेच सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे बॅनर्स मुंबईत मराठीबरोबर गुजरातीतही लावले होते. शिवसेनेच्या धोरणातील हा एक मोठा बदल होता. अर्थातच हे सर्व गुजराती मतांवर डोळा ठेवून करण्यात आले होते. मात्र शिवसेनेचा हा डाव यशस्वी होईल का? सध्या मुंबईतील नागरी सुविधांच्या प्रश्‍नावर शिवसेना ही निवडणूक हरु शकते का? भाजपाने जे दंड थोपटले आहेत, त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यात आहे का? असे सर्व प्रश्‍न अर्थातच उध्दव ठाकरेंच्या मनात घोळत असणार. या पार्श्‍वभूमीवर मनसेला सोबत घेतल्यास आपल्यालाही हातभार लागेल व मनसेलाही त्याचा उपयोग होईल, असा विचार या दोघा नेत्यांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------------------------------------------------

0 Response to "मातोश्रीवरील राजकारण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel