-->
बुलेट ट्रेन काय कामाची?

बुलेट ट्रेन काय कामाची?

रविवार दि. २४ जानेवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
बुलेट ट्रेन काय कामाची?
---------------------------------------
एन्ट्रो- आपल्याकडे दीडशे वर्षांपूर्वी आगगाडीपासून सुरू झालेली वाहतूक क्रांती आता बुलेट ट्रेनच्या उंबरठ्यावर टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अशा वेळी साहजिकच असंख्य प्रश्न सर्वांच्याच मनात गर्दी करीत आहेत. आपल्याला बुलेट ट्रेन हवी का नको? ती कोणाला परवडणार आहे का? कोणाला फायदेशीर आहे? जपानचे स्वस्त कर्ज आपल्याला गरज आहे म्हणून, की त्यांच्याकडे गुंतवणुकीला वाव नाही म्हणून मिळाले आहे? सामान्य शहरी लोकांच्या पदपथासारख्या प्राथमिक गरजाही जेथे डावलल्या जातात, तेथे बुलेट ट्रेनला प्राधान्य देण्याची खरोखर आवश्यकता आहे का? हे उपस्थित होणार्‍या मुद्यांची उत्तरे अगोदर सरकारने देऊन मगच या प्रकल्पाच्या उभारणीला हात घालावा...
---------------------------------------
जपानमध्ये पहिली बुलेट ट्रेन धावली त्या घटनेला आता ५० वर्षाचा कालावधी लोटला आहे. या काळात बुलेट ट्रेनच्या गतीची आकडे सतत चढते राहिले. आता नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निवडणुकीच्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचा घाट घातला आहे. अर्थातच यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च येईल व सात वर्षात याची अंमलबजावणी होईल. भारतात प्रकल्प उभारण्याची गती पाहता हा प्रकल्प काही सात वर्षात पूर्ण होणार नाही. म्हणजे या प्रकल्पाची किंमत नियोजित खर्चापेक्षा कितीतरी पटीने वाढेल. अशा स्थितीत हा प्रकल्प आपल्यासाठी खरोखरीच लाभदायी आहे का, असा प्रश्‍न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याचा एक लाख कोटी रुपये खर्च लक्षात घेतला तर एकाच प्रकल्पासाठी एवढा खर्च करण्यापेक्षा देशात जिकडे रेल्वे पोहोचलेली नाही तेथे आपण रेल्वेच्या ट्रकच्या उभारणीसाठी हा खर्च करु शकतो. तसेच अहमदाबाद मुंबई हे ५०० कि.मी. अंतर कापण्यासाठी विमानासाठी जो खर्च येतो त्यापेक्षा जर रेल्वेने जाण्यासाठी खर्च व वेळ जास्त खर्च झाला तर हा प्रकल्प फायदेशीर ठरणार का, असाही सवाल आहे. आपल्याकडे दीडशे वर्षांपूर्वी आगगाडीपासून सुरू झालेली वाहतूक क्रांती आता बुलेट ट्रेनच्या उंबरठ्यावर टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. अशा वेळी साहजिकच असंख्य प्रश्न सर्वांच्याच मनात गर्दी करीत आहेत. आपल्याला बुलेट ट्रेन हवी का नको? ती कोणाला परवडणार आहे का? कोणाला फायदेशीर आहे? जपानचे स्वस्त कर्ज आपल्याला गरज आहे म्हणून, की त्यांच्याकडे गुंतवणुकीला वाव नाही म्हणून मिळाले आहे? सामान्य शहरी लोकांच्या पदपथासारख्या प्राथमिक गरजाही जेथे डावलल्या जातात, तेथे बुलेट ट्रेनला प्राधान्य देण्याची खरोखर आवश्यकता आहे का? हे उपस्थित होणार्‍या मुद्यांची उत्तरे अगोदर सरकारने देऊन मगच या प्रकल्पाच्या उभारणीला हात घालावा. शांघायसारख्या शहरात, तर वेगाची जागतिक स्पर्धा मानून केवळ ३० कि.मी. अंतरासाठी ताशी ४०० कि.मी. वेगाने धावणारी मॅग्लेव्ह तंत्रावर आधारलेली बुलेट ट्रेन उभारली गेली. यामुळे केवळ सात मिनिटात शहराच्या मध्यवर्ती भागांतून शांघाय विमानतळ गाठता आला. परंतु बहुतेकांच्या खिशाला हा पर्याय परवडत नसल्याने ही बुलेट ट्रेन तोट्यात चालवली जाते आहे. चीनला हा तोटा पचविण्याची आर्थिक ताकद आहे. परंतु आपण या प्रकल्पातून होणारा तोटा पचवू शकतो का, असा प्रश्‍न आहे. बुलेट ट्रेन लोकांची वाहतूक नक्कीच वेगवान करेल यात काहीच शंका नाही. बुलेट मार्गाभोवतीचा आर्थिक भूगोल झपाट्याने बदलेल. जोडीलाच मुंबई-दिल्ली दरम्यान टाकला जात असलेला नवा वेगवान रेल्वे मार्ग, नव्या मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी मालाची वाहतूक वेगवान करेल. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा अहमदाबाद आणि गुजरातला मिळेल, तर मुंबई आणि महाराष्ट्राला फटका बसण्याची शक्यता आहे. या मार्गावर असलेली महाराष्ट्रातील ठाणे, वसई आणि गुजरातमधील वापी, सुरत, बडोदा, अहमदाबाद ही शहरेही झपाट्याने बदलतील. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अर्थातच मुंबईचे महत्व कमी करुन ते स्थान अहमदाबादने पटकवावे यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. बुलेट ट्रेनमुळे याला बळकटी येईल. मुंबईची कारखानदारी गेल्या तीन दशकांत हद्दपार झाली आहे. बुलेट ट्रेनच्या आगमनाने आता हद्दपारीचा धोका मुंबईच्या वित्तक्षेत्राला निर्माण होऊ शकतो. पहिली बुलेट ट्रेन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुटावी, असे नियोजन आहे. अहमदाबादमध्ये बहुधा ती नव्याने विकसित केलेल्या गिफ्ट सिटीजवळच नेली जाईल. त्यामुळे या दोन वित्तसंकुलांमधील थेट प्रवास केवळ दोन-अडीच तासांत करता येईल. मुंबईचे वित्त रोजगार गिफ्ट सिटीत पळतील. तसे झाले तर मुंबईची मध्यम आणि श्रीमंतांची लोकसंख्या कमी होईल. त्यांच्या आधाराने निर्माण झालेले असंघटित रोजगार नाहीसे होऊन, लोकांना त्याचा फटका बसेल. गेल्या आठ-दहा वर्षांत गुजरात सरकारने अहमदाबादजवळ गिफ्ट सिटीचे नियोजन करून त्याला चालना देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.  परंतु त्याला अपेक्षित यश येत नाही. गुजरातमध्ये जाण्यासाठी मुंबईच्या प्रथितयश वित्तसंस्था तयार होत नव्हत्या. मुंबईत कितीही अडचणी असल्या, तरी आज तिलाच नाइलाजाने प्राधान्य दिले जात होते. परंतु जर पुढच्या सात वर्षांत बुलेट ट्रेन अस्तित्वात आली, तर हे चित्र झपाट्याने पालटेल. मुंबई हे देशाचे मुख्य अर्थकेंद्र म्हणून अस्तित्वात राहाणार नाही. सध्या मुंबईतील वाढीला अनेक मर्यादा आहेत. जागांच्या किंमती गगनाला भीडल्या आहेत. रोजगाराच्या संधी काही मर्यादीत क्षेत्रापुरत्याच आहेत. अशा वेळी जर हे शहर बुलेट ट्रेनने जोडले गेले तर गुजरात हाकेच्या अंतरावर येणार आहे. यातून मुंबईचे आर्थिक केंद्र म्हणून अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनही महाराष्ट्राला धोकादायक ठरणार आहे.
--------------------------------------------------------------------

0 Response to "बुलेट ट्रेन काय कामाची?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel