-->
आंबेडकरी चळवळीचा तारा निखळला

आंबेडकरी चळवळीचा तारा निखळला

संपादकीय पान सोमवार दि. २७ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आंबेडकरी चळवळीचा तारा निखळला
ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, बिहार व केरळचे माजी राज्यपाल, राज्य विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते रा. सु. गवई यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचा तारा निखळला आहे. त्यांच्या जाण्याने आता आंबेडकरी चळवळीतील जुने जाणते नेतृत्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे. यातून या चळवळीचे कधीही न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. आंबेडकरी चळवळीतील आजचे नेतृत्व हे चळवळीतून आलेले आहे. गवई यांचा देखील काही यात अपवाद नव्हता. विद्यार्थ्यीदशेपासून ते आंबेडकरी चळवळीत ओढले गेले होते. त्यावेळी त्यांचा भूमिहीनांच्या सत्याग्रहातील सहभाग महत्वाचा होता. रा.सु.गवई यांच्या रुपाने एक तरुण नेतृत्व रिपब्लिकन चळवळीला लाभले हे त्यावेळच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने जनतेला जाणवले. त्यानंतरच त्यांचा विधानपरिषदेत प्रवेश झाला. त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील कोणतेही आंदोलन असो गवई यांचा सहभाग असायचाच. नामांतराची लढाई सुरु असताना राज्यातील पुरोगामी शक्ती एका बाजूला तर दुसर्‍या बाजुला प्रतिगामी शक्ती असे धृवीकरण स्पष्टपणे झाले होते. त्यावेळी विधानपरिषदेत आपली भूमिका जोरदारपणे मांडून गवई यांनी नामांतराच्या चळवळीला संसदीय राजकारणात नेले. त्यावेळी त्यांनी नामांतरवाद्यांच्या बाजूने केलेली त्यांची भाषणे गाजली होती. यातून त्यांची अभ्यासू वृत्ती व चळवळीला पुढे नेण्याची असलेली धमक जाणवायची. रिडल्स प्रकरण बाहेर आले त्यावेळी गवई हे ज्येष्ठ नेत्यात गणले जात होते. असे असले तरीही तरुणांच्या फळीत त्यांनी रिडल्सच्या आंदोलनात सहभाग घेतला. आंबेडकरी जनतेसाठी ऐक्य होणे हा जीव्हाळ्याचा प्रश्न होता. अर्थात ऐक्याचे प्रयोग अनेकदा झाले परंतु ते काही यशस्वी झाले नाहीत. यामागे अर्थातच नेत्यांमधील अहंमहिका कारणीभूत ठरली आहे. अर्थात असे प्रयोग यशस्वी होणार नाहीत याची त्यांना पूर्ण कल्पना होती, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांना नाराज न करण्यासाठी याला पाठिंबा दर्शविला. रिपब्लिकन चळवळीतील दोष व दुर्गुण याची त्यांना पूर्ण कल्पना होती, याचे कारण म्हणजे ते वस्तुस्थितीची जाण ठेवून वावरणारे नेते होते. एकीकडे रिपब्लिकन चळवळीला उभारी देत असताना गवईंनी राज्याच्या संसदीय राजकारणात प्रवेश करण्याची तयारी साठीच्या दशकातच केली होती. यातून ते १९६४ साली विधानपरिषदेचे सदस्य झाले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुनयांना संसदीय राजकारणाचे पक्के धडे दिले होते. आपल्याकडे त्यावेळी संसदीय लोकशाही चांगलीच मूळ धरु लागली होती. आपल्या समाजाचे भवितव्य पुढील काळात संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून घडवायचे आहे हे त्यांनी बिंबविले होते. याच पावलावर पाऊल टाकीत गवई यांनी विधानपरिषदेत प्रवेश केला. केवळ रिपब्लिकन चळवळीतच नव्हे तर सर्वपक्षात त्यांनी मित्र जोडले. विधानपरिषदेत प्रवेश केल्यावर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. संसदीय सभ्यता म्हणजे संसदीय संस्कृती त्यांनी अल्पकाळातच आत्मसात केली. त्याकाळी सत्तेत असलेल्या कॉँग्रेसच्या बरोबरीने त्यांनी डाव्या-उजव्या पक्षांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापीत केले. त्यामुळेच ते कॉँग्रेसशी चांगले संबंध ठेवूनही विरोधी पक्षनेते पदी आरुढ झाले. त्यानंतर विधानपरिषदेचे उपसभापती, सभापती, विरोधी पक्षनेते, खासदार, बिहार व केरळचे राज्यपाल अशी विविध पदे भूषविली. संसदीय संस्कृती त्यांनी अल्पकाळात आत्मसात केली. विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, त्यातील खाचखळगे त्यांना पूर्णपणे अवगत होत्या. यातूनच त्यांची एक सभ्य, सुसंस्कृत, मुत्सद्दी तसेच एक अभ्यासू नेता म्हणून ते पुढे आले. आंदोलने कधी करावयाची व त्याला कधी ब्रेक लावायचा याची त्यांना पूर्ण कल्पना आसे. १९७८ साली धर्मांतरानंतर नवबौध्दांना सवलती नाकारल्याने त्यांनी दिल्लीत बोट क्लब येथे १४ दिवस आमरण उपोषण केले होते. त्यावेळी उपोषणस्थळी भेटावयास त्यांना इंदिरा गांधी गेल्या होत्या. त्यांनी नेहमीच कॉँग्रेसच्या सोबत राहून राजकारण केले अशी त्यांच्यावर टीकाही झाली. परंतु त्यांनी आपला विचार व आपले तत्वज्ञान कधीच सोडले नाही. कॉँग्रेसच्या सोबत राहिल्यामुळे त्यांना मानसन्मान व विविध पदे जरुर मिळाली परंतु त्यांनी त्यासाठी आंबेडकरी विचारांशी प्रतारणा केली नाही. एकीकडे राजकारण करीत असताना अनेक सामाजिक संस्थांशी त्यांनी आपणाला बांधून ठेवले होते. कुष्ठरोगासाठी त्यांनी केलेल्या बहुमोल कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीतील जुन्या व नवीन पिढीतील सेतू बांधणारे एक नेतृत्व आता संपले आहे. त्यादृष्टीने त्याची नेहमीच चळवळ आठवण ठेवेल. डॉ. बाबासाहेबांच्या निधनानंतर आंबेडकरी चलवळीला फुटीने ग्रासले. प्रत्येक नेत्याला आपला गट शाबूत ठेवण्यात विशेष रस वाटू लागला. चळवळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्याला मात्र रिपब्लिकन पक्ष एकसंघ असावा असे नेहमीच वाटले. बाबासाहेबांच्या पुढच्या पिढीत गवई मोडीत. परंतु त्यांचेही एक्याचे प्रयत्न काही यसस्वी झाले नाहीत. शेवटी नाईलाजास्तव त्यांनी देखील आपला गवई गट सांभाळण्यात धन्यता मानली. गवई यांनी कॉँग्रेसच्या बरोबरीने राहून स्वत पदे मिळविली मात्र आपल्या समाजातील लोकांना त्याचा कसा फायदा होईल हे देखील पाहिले. काळानुसार चळवळी बदलत गेल्या, गेल्या दोन दशकात तर राजकारणाचा बाजही बदलला. गवई यांच्यासारख्या नेत्याने तर स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळींपासू ते आत्ताची मुक्त अर्थव्यवस्था पाहिली व त्याचा ते भागही झाले. केवळ दलित नेता म्हणून नव्हे तर ज्यावेळी राज्यातील राजकारण, समाजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी गवई यांची कारकिर्द सुवर्णाक्षराने लिहिली जाईल, यात काहीच शंका नाही. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "आंबेडकरी चळवळीचा तारा निखळला"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel