-->
संपादकीय पान मंगळवार दि. १७ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
पुरोगामी शक्तींवरील भ्याड हल्ला
महाराष्ट्र हा आता पुरोगामी विचारांचा राहिलेला नाही असेच आता म्हणावेसे वाटते. शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात सकाळी चालावयास गेले असताना ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर झालेला गोळीबार पाहता महाराष्ट्र आता पुरोगामी नव्हे तर प्रतिगामी झाला आहे असेच म्हणण्याची पाळी आली आहे. दोन वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर असाच गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या निर्घुण घटनेनंतर राज्यातील पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यात यश आले नाही. त्यातून समाजविघातक, प्रतिगामी शक्ती फोफावणार हे सिध्द झाले होते. कॉम्रेड पानसे हे गेली दोन वर्षे कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलनाच्या अग्रभागी होते. टोल माफियांचे पितळ त्यांनी उघड केले होते त्यातून कदाचित हल्ला झाला असावा अशी शक्यता नाकारता येत नाही. डॉ. दाभोळकरांना जीवे मारण्यासाठी जे तंत्र समाजकंटकांनी अवलंबिले होते त्याच पध्दतीचे कारस्थान कॉ. पानसरेंसाठी रचण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात दाभोळकरांच्या हत्येनंतर या राज्यातील जनतेने खवळून उठून दाभओलकरांच्या हत्यार्‍यांना जेरबंद करण्याची मागणी केली होती. परंतु यापूर्वीच्या कॉँग्रस-राष्ट्रवादीच्या सरकारला किंवा सध्याच्या भाजपाच्या सरकारलाही त्यांचे खुनी शोधणे शक्य झाले नाहीत. खरे तर याचे गांभिर्य ओळखून तपास कामात गती आणण्याचे कामच सरकारने केले नाही. जर दाभोळकरांचे खुनी गजाआड केले असते तर कॉ. पानसरेंवर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती. मात्र दाभोळकरांचे खुनी मोकाट सुटल्यानेच पानसरेंसारख्या पुरोगामी माणसावर हल्ला करण्यास या शक्ती पुन्हा सरसावल्या. पानसरे हे केवळ व्यक्ती नव्हते तर राज्यातील पुरोगामी चळवळीचे प्रणेते होते. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा पुरोगामी शक्तींवरील हल्ला आहे. गेल्या काही महिन्यात प्रामुख्याने केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून धर्मांध शक्तींना चांगलेच बळ मिळाले आहे. घर वापसीसारखे कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटना हाती घेऊन या देशाच्या सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेलाच मोडता घालण्याचा घाट घालीत आहेत. या शक्तींच्या विरोधात नेहमीच दंड थोपटून पानसरे उभे राहिले. कोल्हापूर व त्या परिसरातील कामगार चळवळी त्यांनी उभारल्या, कामगार हक्कांसाठी ते नेहमीच अग्रभागी होते. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला हा कामगार चळवळीवरील हल्ला म्हटला पाहिजे. अन्याय मग तो कामगारांवर असो किंवा शेतमजुरांवरील असो, शेतकर्‍यावरील असो गोविंद पानसरे हे नेहमीच अन्याय, अत्याचाराच्या विरोधात उभे ठाकत. गेल्या वर्षात कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. कोल्हापूरकरांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय होता. तसेच टोलला विरोध करण्यासाठी राज्यापुढे एक आदर्श घालून देण्याचे हे आंदोलन होते. या सर्व लढ्यात कॉ. पानसरे अग्रभागी होते. सुमारे सहा दशकाहून जास्त काळ त्यांनी आपला लढा प्रतिगामी शक्तींच्या विरोधात लढविला. अनेक संकटे, अडचणी आल्या परंतु आपला मार्क्सवादी विचार कधी सोडला नाही. अशा या निष्ठावान नेत्यावर हल्ला होणे ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. अंधश्रध्दा निमुर्लन समितीच्या कामात ते नेहमीच आघाडीवर असत. कोल्हापुरात शाहू महाराज कर्मकांडाविरुध्द लढले तिथेच अनेक खाद्यपदार्थ जाळून यज्ञ करण्यात आले. त्याविरोधात जिल्ह्यातील पुरोगामी शक्ती एकत्र आल्या व त्यांचे नेतृत्व पानसरेंकडे होते. शेवटी या यज्ञाचा बोर्‍या वाजला. अशा तर्‍हेने पानसरे यांनी कोल्हापुरचा पुरोगामी चेहरा टिकवून ठेवण्यात मोलाचा हातभार लावला होता. २००० साली शंकराचार्यांनी चित्रलेखा या मासिकाला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी स्त्रीशूद्रांबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्या विरुद्ध पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली. तिच्यावतीने कॉ. पानसरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात हजारो लोक सामील झाले होते. शंकराचार्यांच्या मठामधून घटनाविरोधी वर्चस्ववादी विचार सतत पेरले जातात. त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यावेळी शंकराचार्यांची राखीव जागा या पुस्तिकेच्या एक हजार प्रती केवळ दोन तासात खपल्या. त्यांनी आन्तरजातिय विवाह मंडळ स्थापन करुन पुरोगामी महाराष्ट्रात एक महत्वाचे पाऊल टाकले. याला देखील सनातनवाद्यांनी विरोध केला होता. परंतु त्यांनी त्यांना जुमानले नाही. कॉम्रेड पानसरे हे कम्युनिस्ट चळवळीचा चालता बोलता इतिहासच. त्यांच्यावर प्रसिध्द झालेला गौरव ग्रंथ म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या व परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासाचा आढावाच होता. तरुण पिढीला हा ग्रंथ म्हणजे दिशादर्शक ठरावा असाच आहे. अशा या ज्येष्ठ, पुरोगामी नेत्यावर भ्याड हल्ला होणे म्हणजे महाराष्ट्राच्या अधोगतीची झालेली सुरुवात आहे. नेहमी विचारांचा लढा हा विचारानेच केला गेला पाहिजे, मात्र आपल्याकडील राजकारण, समाजकारण आता एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की, कोणत्याही विरोधाला लगेचच वैचारिकतेने नव्हे तर दंडेलशाहीने उत्तर दिले जाते. हे थांबले पाहिजे. अर्थातच याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर येते. डॉ. दाभोळकरांवरील हल्ला हे काही निव्वळ गुन्हेगारीचे कृत्य नव्हते, तर त्यांचा विचार संपविण्यासाठी केलेला तो हल्ला होता. आता कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ला हा देखील त्यांच्या पुरोगामीत्वाला आव्हान देण्यासाठी केलेला हल्ला आहे. कामगार, शेतमजूरांचे नेते व अंधश्रध्देच्या विरोधात आवाज उठवून समाजाला दिशा देणार्‍या पानसरेंवरचा हा हल्ला म्हणजे या राज्यातून पुरोगामी शक्ती संपविण्याचा आखलेला डाव आहे. या विरोधात महाराष्ट्रातील पुरोगामी शक्ती एकत्र येतील व हा प्रयत्न हाणून पाडतील असा विश्‍वास आम्हाला वाटतो. तसेच पानसरे यांना आम्ही दिर्घायुष्य चिंतितो.
---------------------------------------------------------------------      

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel