-->
डेराचे वास्तव

डेराचे वास्तव

मंगळवार दि. 29 ऑगस्ट 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख 
-----------------------------------------------
डेराचे वास्तव 
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी सी.बी.आय.च्या विशेष न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. बाबा राम रहिमला दोषी ठरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेला हिंसाचार पाहता तुरुंगातच न्यायालय भरवून शिक्षा सुनावली गेली. या पार्श्‍वभूमीवर हरयाणा, पंजाब या दोन राज्यात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टरने रोहतकच्या तुरुंगात नेण्यात आले. डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. बाबाला अशा प्रकारे शिक्षा ठोठावून कोर्टाने आपले चोख काम केले आहे. बाबा गुरमीत सिंह राम रहीम याच्या अटकेनंतर डेरा सच्चा सौदा प्रकाशात आला. हा डेरा काय प्रकार आहे, त्याचे सदस्य कोण आहेत, ते एका बलात्कारी बाबाच्या बचावासाठी का हिंस्त्र झाले आहेत, यावर प्रकाश टाकणारा हरनीध कौर यांचा इंग्रजीतील लेख वाचनीय आहे. यात डेराचे वास्तव काय आहे, त्याचा जन्म होण्याची कारण व डेराच्या मागे जनता उभी राहाण्याच्या कारणांचे योग्य विश्‍लेषण करण्यात आले आहे. उत्तर भारतातल्या एका मोठ्या जनसमुदायाला भोगाव्या लागलेल्या ऐतिहासिक जुलूमांमधून मुक्त करणारी ओळख डेरा सच्चा सौदाने दिली. या डेर्‍याचे बहुतेक सदस्य मागासवर्गीय आहेत. त्यांनी जातीच्या जोखडातून सुटकेसाठी शीख धर्माचा स्वीकार केला. अर्थात तिथेही त्यांना जातविग्रह, तीच उतरंड आणि त्याच अत्याचारांचा सामना करावा लागला. शीख धर्म जातविरहित असला तरीही प्रत्यक्षातली परिस्थिती दुर्दैवाने फारच वेगळी आहे. जाट-खत्री या उच्चवर्णीय जातींचा शिखांच्या धार्मिक राजकारणावर प्रभाव आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी आणि इतर गुरुद्वारा समित्यांमध्ये त्यांचे प्राबल्य आहे. त्यांच्यानंतर शीख धर्मात आलेल्यांना त्यांनी पद्धतशीरपणे सत्तास्थानांपासून दूर ठेवले असून मुळातले जातीय उच्चनीचतेची समीकरणे शीख धर्मातही अबांधित ठेवण्यात आली आहेत. या आणि अशा इतर घटकांमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे, हतबलता आहे, भ्रमनिरासाची भावना आहे. उत्कर्षाची आणि उन्नयनाची वाट त्यांना दिसतच नाही. मग ते अंमली पदार्थांकडे वळतात. त्याचबरोबर आर्थिक असुरक्षितता आणि शिक्षणाचा अभाव यांनीही परिस्थिती आणखी बिघडवली आहे. समाजाचा हा वर्ग दिशा हरवलेला वर्ग आहे. म्हणूनच डेरा सच्चा सौदासारखी संघटना भक्कमपणे त्यांच्या पाठिशी उभी राहते, तेव्हा डेराचा त्यांना आधार वाटतो. डेरा त्यांना प्रतिष्ठा देतो. तो त्यांना शिक्षण देतो, दोन वेळचे अन्न देतो, अंमली पदार्थांपासून दूर ठेवतो, त्यांना नोकर्‍या देतो आणि मुख्य म्हणजे जगण्याला उद्देश देतो, माणूस म्हणून आपण कोणीतरी आहोत, अशी जाणीव देतो. आता ही दिशा एक बलात्कारी देतो आहे का, अन्न भरवणारा हात एका खुन्याचा आहे का, याची पर्वा या देशातला कोणताही भरकटलेला माणूस किंवा उपाशी माणूस करत नाही. डेराचे अनुयायी अपवाद कसे ठरतील, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आपल्याकडे अनेकदा गुंडांच्या मागे जनता उभी राहाते. अगदी डॉन अरुण गवळी आमदार म्हणून निवडून येतो व त्यांच्या घरापुढे विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी लोक रांगेत उभे असतात. खरे तर शासकीय यंत्रणा ज्यावेळी जनतेचे प्रश्‍न सोडवीत नाहीत त्यावेळी अशा गुंडांचा आधार जनतेला घ्यावासा वाटतो. लोकांना त्यांचे प्रश्‍न सुटणे आवश्यक असते. ते प्रश्‍न कोण सोडवितो याचे त्यांना देणेघेणे नसते. डेरा सच्चाच्या बाबतीतही असेच झाले आहे. राम रहीम बाबाच्या अटकेनंतर उसळलेला उद्रेक हा निव्वळ व्यक्तिपूजेच्या स्तोमातून उद्भवलेला धार्मिक उन्माद नाही. आपला आधार आता जाणार, या असुरक्षिततेच्या भावनेचीही त्याला एक निश्‍चित जोड आहे. आपल्या विकासाच्या कल्पना किती अन्यायकारक आणि वरवरच्या, दिखाऊ असतात, याचं भान आणून देणारी ही घडामोड आहे. यातून आपण धडा शिकणार का, हा मुळातला प्रश्‍न आहे. दुसर्‍याच्या पाठीवर पाय देऊन विकास घडवून आणला की कधी ना कधी पिचलेली माणसं बंड करून उठतात, हा या उद्रेकाचा एक अन्वयार्थ आहे. धर्म ही अफूची गोळी असेल, तर श्रद्धा हा चिलमीचा झुरका आहे, जो एका क्षणात वेगळ्या जगात पोहोचवतो. त्यामुळेच डेरा सच्चा सौदाच्या रूपाने श्रद्धेसाठी जीव घेणारी फौज उभी राहिली आहे. ती उभी राहण्याची जबाबदारी संपूर्ण समाजावर आहे. उच्च न्यायालयाने हरयाणातील राज्य सरकारला स्पष्टपणे म्हणाले आहे की, तुमचं आणि बाबा राम रहीमचे साटेलोटे आहे, तुम्ही दोघं मिळून न्यायालयाला मूर्ख बनवत आहात. आज त्या बाबाने अनेकांचे बळी घेतले व व्यवस्थेला हिंसक आव्हान दिले आहे. कोर्टाने शासनावर अविश्‍वास अनेकवेळा दाखवला आहे. मात्र तुमचे आणि एका गुन्हेगाराचे साटेलोटे आहे, असे एखाद्या न्यायालयाने इतिहासात पहिल्यांदा म्हटले असेल. भाजपशासित राज्य इतिहस बदलत आहेतच आणि नवा इतिहास घडवतही आहेत. डेर्‍यांच्या मागे जनता असल्यामुळे राजकारणी त्यांची मते आपल्या पदरात पडावीत यासाठी या डेर्‍यांभोवती पिंगा घालत असतात. अर्थात याला कॉग्रेस असो किंवा भाजपा कोणाचाही अपवाद नाही. राजकारण्यांना हे राजकारण लगेच समजते. त्यांनी असे डेरे उभे राहू दिले, त्यांचा उत्कर्ष होऊ दिला, त्यांची संख्या वाढू दिली. त्यांना सर्व प्रकारचं पाठबळ देऊन त्यांच्या रूपाने हक्काची मतपेढी निर्माण केली. हे डेरे एकमेकांमध्ये भांडत राहतील आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जातील, याची काळजी त्यांनी घेतली. आता हेच डेरे प्रशासनाला डोईजड झाले आहेत. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचे हेच वास्तव आहे.
--------------------------------------------------

0 Response to "डेराचे वास्तव "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel