-->
संपादकीय पान गुरुवार दि. २९ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
ओबामांची मन की बात
यावेळचा आपला प्रजासत्ताक दिन गाजला तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या विशेष उपस्थितीमुळे. केंद्रातील नव्या सरकारचा पहिला सोहळा आणि देशाच्या आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात उत्साहाचे आलेले उधाण या पार्श्वभूमीवर परवाचा ६६ वा गणराज्यदिन सणासुदीसारखा जल्लोषात साजरा झाला. प्रत्यक्ष सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ओबामा यांच्यात झालेली द्विपक्षीय चर्चा सकारात्मक असली तरीही त्यातून अद्याप ठोस काही निष्पन्न निघालेले नाही. अणुइंधनाच्या पुरवठ्यावर प्रत्येक पातळीवर लक्ष ठेवण्याची अमेरिकेची याआधीची अटही ओबामांनी मागे घेतली. मात्र या भेटीमुळे आता भारत व अमेरिका संबंधात नव्याने अध्याय लिहला जाणार आहे हे नक्की. ओबामा यांनी सरकार, विरोधी पक्षाचे नेतृत्व आणि देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या लोकांशी त्यांनी चर्चा केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमेरिकेचे सरकार जरी आता धिमेगतीने का होईना भारताच्या जवळ येऊ लागले असले तरीही अमेरिकेतील प्रसार माध्यमे मात्र भारताच्या विरोधात नेहमीच प्रचार करीत असतात. त्यांचा दृष्टीकोन काही अजूनही बदललेला नाही. ओबामाच्या यांच्या दौर्‍याबाबत त्यांनी जे दिवे पाजळले आहेत ते पाहता त्यांची किव करावीशी वाटते. ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत दौ-यामुळे त्यांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी काढला. दिल्लीचा जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत समावेश होतो. दिल्लीतील वायूप्रदुषणाच्या आधारे अमेरिकेतील एका ख्यातनाम वृत्तवाहिनीने ओबामा यांच्या आरोग्यावर झालेले परिणाम यावर वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३ मधील अहवालानुसार दिल्लीतील हवेत टॉक्सिकचे प्रमाण सर्वात जास्त असते. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, ह्रदविकार आणि अन्य आजार बळावतात असे अहवालात म्हटले आहे. संबंधीत वृत्तवाहिनीने या अहवालाच्या आधारेच ओबामा यांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचे म्हटले आहे. गणराज्यदिनाच्या निमित्ताने भारताच्या लष्करी सामर्थ्याचे व त्यात अलीकडे भर पडलेल्या स्त्रीशक्तीचे जे प्रदर्शन या संचलनाने घडविले ते कमालीचे उत्साहवर्धक होते. भारताच्या लष्करी सामर्थ्याला अनेक मर्यादा आहेत. मात्र आपल्या शस्त्रागारात आता १०० हून अधिक अण्वस्त्रे सज्ज आहेत. शिवाय भारताची क्षेपणास्त्रेही अतिशय लांब पल्ल्याची व कमालीची शक्तिशाली आहेत. महत्वाचे म्हणजे याचे तंत्रज्ञान आपण स्वत: विकसीत केले आहे. दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरीस हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना बेचिराख करणारे जे दोन छोटे बॉम्ब अमेरिकेने १९४५ मध्ये वापरले त्यांच्याहून हजारो पटींनी अधिक संहारक शक्ती असलेली नऊ हजारांवर अण्वस्त्रे अमेरिकेच्या तर आठ हजारांवर अण्वस्त्रे रशियाच्या शस्त्रागारात आहेत. अण्वस्त्रे हा आत्मविश्वास बळावणारा प्रकार आहे. मात्र त्या बळावर जगातल्या कोणत्याही देशाला आता आक्रमक होता येणे शक्य नाही याचे भान सार्‍यांनीच राखले पाहिजे. आपणही नेहमीच शांततामय सहजीवनाचा जागतिक राजकारणात पुरस्कार केला आहे. अणुताकद ही हिंसक नव्हे तर उर्जेसाठी वापरली गेली पाहिजे याचा आपण नेहमीच पुरस्कार केला आहे. भारताची राज्यघटनाही अशीच माणुसकीचा गौरव सांगणारी आहे. हा गौरव आपण जपला पाहिजे असे सांगत असताना ओबामांनी भारताच्या धर्मबहुल लोक व्यवस्थेचा आवर्जून उल्लेख केला. जोपर्यंत विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धार्मिक प्रवृत्तींचा आदर करतात तोपर्यंतच अशा देशातली शांतता व सुव्यवस्था टिकते. ज्या दिवशी या देशांत धार्मिक तेढ वाढीला लागेल त्या दिवशी हा देशही अमेरिकेसारखाच टिकणार नाही ही बाब बराक ओबामा यांनी आपल्या दिलेला सल्ला फारच महत्वाचा ठरणारा आहे. अमेरिका हा त्यांचा देश एकेकाळी कृष्णवर्णियांचा द्वेष करणारा व त्यांना गावकुसाबाहेरची वागणूक देणारा होता. त्याच देशाने ओबामांना आपला अध्यक्ष निवडले तेव्हा त्याने एक ऐतिहासिक प्रायश्चित्तही घेतले. आता अमेरिकेत वर्णविद्वेषकमी झाला आहे. नेमकी हीच गोष्ट ओबामांनी भारताला सांगितली आहे. आपल्या देशात सध्या धार्मिक तेढ दिवसेंदिवस अधिकाधिक धारदार होत आहे. धर्मांतर, घरवापसी किंवा शुद्धीकरणाच्या मोहिमा जोरात होत आहेत. लहानसहान कारणांवरून अल्पसंख्यकांच्या मनात भयगंड उभा होईल अशी भाषा स्वत:ला बहुसंख्यकांचे कर्मठ लोक वारंवार उच्चारत आहेत. ज्या टोकाची मुस्लिम धर्मांधता जगाला त्रासदायक ठरत आहे तसाच हा टोकाचा हिंदू अभिनिवेश धोक्याचा ठरणार आहे. हा प्रकार वाढीला लागला तर त्याची काय परिणती होऊ शकेल याची जाणीवच बराक ओबामा यांनी त्या भाषणात करून दिली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारखा जागतिक नेता देशाला जेव्हा सर्वधर्मसमभावाचे व सार्‍यांनी गुण्यागोविंदाने व एकोप्याच्या भावनेने नांदावे असे म्हणतो तेव्हा त्याची तळमळ मोठी असते व ती तशीच समजून घ्यायची असते. धार्मिक ऐक्य देश टिकवेल आणि धार्मिक दुरावा देशाचे विघटन करील हे साधे सत्य एवढ्या मोठ्या माणसांना सांगावे लागावे हेच आपले दुर्दैव होय. आणखी एक दुदैवाची बाब म्हणजे सध्याचे राजकारणी हेच राजकारण करीत सत्तेत आले आहेत. त्यांना एकप्रकारे चांगला सल्ला देऊन ओबामांनी मन की बात सांगितली हे बरेच झाले. आपल्याला जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने पडत आहेत, स्वप्ने पाहणे केव्हाही चांगले मात्र त्यासाठी आपल्यात जे बदल केले पाहिजेत त्याची आपली तयारी नाही. आपण आजही जाती, धर्माच्या, उच्चनिच्चच्या सापळ्यातून काही बाहेर पडत नाही. त्यातून आपण जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपली प्रगती शक्य नाही ही ओबामांची मन की बात सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे.
-------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel